स्वाती साठे यांना तपासातून हटविले; कारवाई होण्याची शक्यता

9

सामना प्रतिनिधी । मुंबई

मंजुळा शेट्य़े हिच्या हत्या प्रकरणातील आरोपींची बाजू घेणे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्हॉटस्अॅपवरून प्रवृत्त करणे असे आरोप पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्यावर करण्यात आले आहेत. म्हणून या हत्याकांडाच्या तपासातून स्वाती साठे यांना हटविण्यात आले असून तुरुंग प्रशासनाच्या वतीने हा तपास पोलीस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

नागपाडा पोलीस ठाण्यात मंजुळा शेट्य़े हिच्या हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जेलर मनीषा पोखरकरसह सहा महिला पोलीस कॉन्स्टेबलना अटक करण्यात आली. आपल्या भगिनींना अटक झाली आता तरी मीडियाचा आत्मा शांत होईल का, असा सवाल करीत स्वाती साठे यांनी आरोपींच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहायलाच हवे असे आवाहन व्हॉटस्ऍपवरून पोलीस अधिकाऱ्यांना केले. इतकेच नाही तर त्यांच्या मदतीसाठी निधी म्हणून ५०० आणि १००० रुपये वर्गणी काढण्याचे आवाहन केले. तुरुंग प्रशासनाने नेमण्यात आलेल्या चौकशी पथकाच्या प्रमुख असतानाही साठे यांनी अशी भूमिका घेतल्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी याबाबत त्यांची लेखी तक्रार केली.

आपली प्रतिक्रिया द्या