पश्चिम महाराष्ट्रात प्रवेशोत्सवाचा जल्लोष! बालगोपाळांच्या स्वागतासाठी डोरेमॉन; औक्षणासह खाऊ अन् भेटवस्तू

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर शहरासह ग्रामीण भागातील शाळांमध्ये आज ‘प्रवेशोत्सवा’चा जल्लोष करण्यात आला. बालगोपाळ आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. उन्हाळी सुट्टी संपून शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात मुलांनी शाळेत प्रवेश केला. गप्पागोष्टी आणि मज्जा करून शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा झाला. शहर आणि परिसरातील शाळांमध्ये बालगोपाळांचा किलबिलाट सुरू झाला.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये फुग्यांची कमान, रंगीबेरंगी झिरमिळ्या, औक्षणाचे तबक, सनई, बालगीते यांमुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी डोरेमॉनने हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांचे औक्षण करून पेढे, खाऊ तसेच औषधे झाडांचे वाटप करून मुलांचे स्वागत करण्यात आले. मुलांना मोफत पाठय़पुस्तके देण्यात आली.

बैलगाडीतून मिरवणूक

n करमाळा तालुक्यातील उत्तर वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत दाखल विद्यार्थ्यांची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शाळेला फुग्यांची सजावट करण्यात आली होती.

महाराष्ट्रात सर्वाधिक पटसंख्या असलेल्या शाळेत आनंदोत्सव

n महाराष्ट्रात नगरपरिषदेच्या शाळांमध्ये सर्वाधिक पटसंख्या असणाऱया कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3मध्ये शाळेत पहिल्या दिवशी आनंदोत्सव करण्यात आला. फुले देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिलीचे 400पैकी 400 विद्यार्थी उपस्थित होते. नगरपालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी मोठय़ा प्रमाणात रांगा लागलेल्या असतात.

नगर शहरासह जिह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नगर शहरातील कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत तुतारीच्या निनादात विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. ‘डोरेमॉन’ने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पेपर ब्लास्टर, हवेत उडणारे चमकीचे रंगीबेरंगी कागद व विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. कोल्ड फायरने आतषबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील श्रमिकनगरच्या मार्कंडेय शाळा, सरस्वती प्राथमिक विद्यालय, केडगावमधील लंडन किड्स शाळा, महाराष्ट्र बालक मंदिर शाळा, मुकुंदनगरमधील सावित्रीबाई फुले उर्दू शाळा, श्री संत सावताश्रम शिक्षण संस्था महात्मा फुले विद्यामंदिर या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

जिह्यात पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन, एम. एम. निऱहाळी, गुरुकुल इंग्लिश स्कूल, फ्लाइंग बर्ड, वसंतदादा विद्यालय, श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर, जनता विद्यालय, तसेच देवळाली प्रवरा येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद शाळा, निघोज जिल्हा परिषद शाळा, राहुरी येथील खंडाबे खुर्दमधील जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.

विद्यार्थी वर्गात बसताच सीलिंगचे तुकडे कोसळले

नगर तालुक्यातील भातोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्वागत झाल्यानंतर विद्यार्थी वर्गात जाऊन बसताच, एका खोलीतील सिलिंगचे तुकडे कोसळले. यामुळे विद्यार्थ्यांची पळापळ झाली. प्रसंगावधान साधून ग्रामपंचायत सदस्य विक्रम गायकवाड आणि आदिनाथ शिंदे यांनी सिलिंगचे पापुद्रे खाली पाडून विद्यार्थ्यांना धीर दिला. या घटनेने खळबळ उडाली असून, ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विक्रम गायकवाड,  शालेय समितीचे अध्यक्ष शरद पवार, आदिनाथ शिंदे उपस्थित होते.