विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात हजारो उत्तरपत्रिका धूळ खात, प्रशासनाचा निष्काळजीपणा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या निष्काळजीपणामुळे रत्नागिरी येथील विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या आवारात 18 ते 20 हजार जुन्या आणि नवीन उत्तरपत्रिकांचे गठ्ठे धूळ खात पडून आहेत. या उत्तरपत्रिकांचा आगामी परीक्षांसाठी वापर होणार असल्याने उत्तरपत्रिकांचे बॉक्स बंद खोलीत ठेवणे गरजेचे आहे. पण विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला कुणी वालीच नसल्याने हे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे उघडय़ावर पडून आहेत.

युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, मिलिंद साटम, कैलाश पालकर यांनी आज रत्नागिरी उपकेंद्राला अचानक भेट दिली. तेव्हा त्यांना उपकेंद्राच्या आवारात उत्तरपत्रिकांचे गठ्ठे जमिनीवर उघडय़ावर ठेवलेले आढळले. या प्रकरणी तातडीने कुलगुरू, परीक्षा नियंत्रक यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तसेच उत्तरपत्रिकांबाबत निष्काळजीपणा दाखविलेल्या अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणीही केली.

पूर्ण वेळ संचालक नेमा; युवासेनेची मागणी
रत्नागिरी उपकेंद्राला पूर्ण वेळ संचालक नाहीत. या केंद्राचा कार्यभार प्रभारी संचालक डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्याकडे आहे. ते महिन्यातून केवळ दोन दिवस उपकेंद्रात येतात. पूर्ण वेळ संचालक नसल्यामुळे उपकेंद्राकडे दुर्लक्ष होत असून पूर्ण वेळ संचालक नेमण्याची मागणी युवासेनेने केली आहे.

…तर उत्तरपत्रिकांचा गैरवापर झाला असता
या उत्तरपत्रिकांचा वापर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील अनेक कॉलेजमध्ये केला जातो. तसेच रत्नागिरी उपकेंद्रात अनेक विद्यार्थ्यांची ये-जादेखील सुरू असते. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याकडून या उत्तरपत्रिकांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच विद्यापीठाने जुन्या उत्तरपत्रिकेवरील विद्यार्थ्यांच्या नावाचा रकाना व्हाईटनिंगने काढून टाकून त्याचा आगामी परीक्षांमध्ये पुनर्वापर करणार असल्याचे म्हटले होते. पण निधी मंजूर न झाल्याने उत्तरपत्रिकांवर व्हाईटनिंग लावण्याचे काम पूर्ण न झाल्याची माहिती उपकेंद्रातून मिळाल्याचे युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.