सिंधुताईंच्या संस्थेच्या नावाने अनेकांची फसवणूक, अनाथ मुलींची लग्न लावण्याच्या बहाण्याने उकळले जातायत पैसे

अनाथ मुलींच्या लग्नासाठी पैसे जमविण्याचे भावनिक आवाहन करून दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावे अनके नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यभरात मुंबई, पुणे, मध्यप्रदेशातील इंदोरमध्येही अशी फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ संस्थेकडून नागरीकांनी फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन विनय सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे. त्याशिवाय अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचेही त्यांनी सांगितले आहे.

माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेतून बोलत असल्याची बतावणी करीत लोकांकडून पैसे उकळले जात आहेत. दरम्यान याप्रकरणी संस्थेने पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. नागरिकांनी अशा कुठल्याही फसवणुकीस बळी पडू नका, कारण माईंच्या कुठल्याही संस्थेकडून मुलींच्या लग्नासाठी पैसे मागितले जात नाही. त्याशिवाय बाँड पेपरवर सह्या घेतल्या जात नाहीत. सध्या अजून चार ते पाच वर्ष संस्थेत लग्नाच्या वयाच्या मुली नाहीत. अशी कुठल्याही प्रकारची फसवणुक झाल्यास त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन विनय सपकाळ यांनी केले आहे.

पुण्यातही अनेकांची फसवणूक, कारवाई करण्याची मागणी

माई सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने पुण्यातही फसवणूक करण्यात आल्याची माहिती विनय सपकाळ यांनी दैनिक सामनाला दिली आहे. संस्थेतील मुलीचे लग्न करण्याची बतावणी करून आरोपीने संबंधित व्यक्तीला 11 हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. त्याशिवाय संस्थेच्या नावाने अन्न धान्य मागितले जात असल्याचेही उघडकीस आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अशा फसवणूकीला बळी पडू नये, असे आवाहन संस्थेने केले आहे.

माई सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेतील मुलींच्या लग्नाची बतावणी करून नागरिकांची ऑनलाइनरित्या पैसे घेऊन फसवणूक केली जात आहे. प्रामुख्याने हडपसर, कोथरूड, जळगाव, संभाजीनगर याठिकाणी फसवणूक झाल्याचे आतापर्यंत समजले आहे. त्याशिवाय मुंबईत माईंच्या नावे पैसे आणि धान्य गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे फसवणूक झालेली असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. – विनय सिंधुताई सपकाळ