म्हाडाच्या गृहनिर्माण भवनात शुक्रवारी दुपारी तीन तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे उकाडय़ाने अधिकारी, कर्मचाऱयांसह विविध कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्यांचा घामटा निघाला. संगणक बंद असल्याने अनेकांची कामे खोळंबली. म्हाडाच्या मुख्यालयात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक येथील वीज पुरवठा खंडित झाल्याने लिफ्टमध्ये दहा ते बाराजण अडकून पडले. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ धाव घेत लिफ्ट उघडून अडकलेल्यांची सुटका केली. सायंकाळी साडेसहा वाजता वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या मिनी पिलरमध्ये बिघाड झाल्याने म्हाडा मुख्यालयातील वीजपुरवठा खंडित झाला होता.