नोटाबंदीचा नक्षलवाद्यांवर काहीही परिणाम नाही, कागदपत्रांमुळे उघडकीस आली बाब

25
फाईल फोटो: पीटीआय

सामना ऑनलाईन । रायपूर

नोटाबंदीमुळे नक्षलवादी आणि दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सत्ताधारी भाजपतील बहुतांश नेतेमंडळी करताना दिसतात. या दाव्याचा बुरखा फाडणारी नक्षलवाद्यांची काही कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली आहेत. या कागदपत्रांमध्ये नोटाबंदीच्या काळात २ लाख रूपये बँकेत जमा केल्याचं म्हटलंय, तसंच ५०० आणि १००० च्या जुन्या नोटाही बदलून घेतल्याचं म्हटलं आहे. या वर्षी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झालं, त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ७ नोव्हेंबरला नक्षलवाद्यांशी झारखंडमध्ये चकमक झाली होती. या चकमकीनंतर पोलिसांनी हस्तगत केलेल्या कागदपत्रातून हा खुलासा झाला आहे.

इंडीनय एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने झारखंडमधील नक्षलवाद विरोधी मोहीमेचे विशेष पोलीस महासंचालक डी.एम.अवस्थी यांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटलंय की नक्षलवाद्यांकडून गेल्या काही वर्षातील जमा खर्चाचा ताळेबंद असलेली २० पानी कागदपत्रे नारायणपूर इथल्या अबूजमाड इथल्या जंगलातून पोलिसांना मिळाली आहेत. याच ठिकाणी झालेल्या चकमकीत पोलिसांनी ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं, ही कागदपत्रे त्यांच्याकडूनच हस्तगत करण्यात आली आहेत.

स्वत:ला जनता सरकार म्हणवणाऱ्या नेलनार इथल्या जनता सरकार या नक्षलवाद्यांचा हा ताळेबंद आहे, त्यांनी या ताळेबंदामध्ये म्हटलंय की नोटबंदीच्या काळात २ लाख रुपये बँकेत जमा करण्यात आले. विशेष पोलीस महासंचालक डी.एम.अवस्थी यांनी म्हटलंय की या नक्षलवाद्यांनी गावकरी आणि जंगलात काम करणाऱ्या ठेकेदारांच्या माध्यमातून जुन्या नोटा बदलून घेतल्या असाव्यात. मात्र या प्रकरणात घाईघाईने कारवाई करणं चुकीचं आहे कारण हा संवेदनशील विषय आहे. बँकांना आम्ही माहिती दिली आणि हा सगळा पैसा जप्त केल्याचं अवस्थींचं म्हणणं आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना अजूनही अवस्थी म्हणतायत की नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांना लगाम बसला आहे.

ही माहिती नेलनार इथल्या जनता सरकार या नक्षलवाद्यांच्या कागदपत्रातून उघड झाली आहे, जनता सरकार अनेक भागांमध्ये आहेत, त्या आणि इतर नक्षलवाद्यांच्या गट अशाच पद्धतीने हिशोब ठेवत असतात, त्यांच्या हिशोबाचा अजून अंदाज नाहीये. मात्र या सगळ्यांनी नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटा बदलून घेतल्या असाव्यात आणि रक्कम बँकेतही भरली असावी असा संशय आहे. त्यामुळे नोटाबंदीचा नक्षलवाद्यांच्या मोहिमेवर फारसा फरक पडलेला दिसत नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या