
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी उपोषणे, आंदोलने सुरू असतानाच काल मध्यरात्री कामारी येथे साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा युवक सूदर्शन ज्ञानेश्वर देवराये कामारीकर याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. यामुळे हिमायतनगर तालुक्यातील वातावरण तणावाचे बनले असून, हिमायतनगर बंदची हाक दिल्यानंतर जमाव आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रात आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. अंतरवाली सराटी जि. जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर याच मागणीच्या पुर्ततेसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. राज्यात विविध ठिकाणी साखळी उपोषणे सुरू असून, त्याच धर्तीवर गेल्या तीन दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे गेल्या पाच दिवसांपासून काही युवक साखळी उपोषणाला बसले आहेत. काल या उपोषणात सहभागी झालेल्या सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये याने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली.
हे वृत्त आज हिमायतनगर तालुक्यात वार्यासारखे पसरल्यानंतर हिमायतनगर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाज या तालुक्यात आक्रमक झाला असून, अनेक ठिकाणी घोषणाबाजी व टायर जाळून सदरच्या घटनेचा निषेध केला आहे. हिमायतनगर, किनवट हा महामार्ग पूर्णतः बंद असून, तेथील वातावरण तणावाचे बनले आहे.
देवराये यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहिले आहे. सदर देवराये या मराठा युवकाचा मृतदेह हिमायतनगर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून, पंचक्रोशितील गावकर्यांनी व सकल मराठा समाजाने मृतदेह पालकमंत्री यांनी प्रत्यक्ष येवून भेट दिल्याशिवाय ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सकल मराठा समाजाच्या समन्वयक सुजिता जोगदंड पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, शासनाच्या चालढकलीच्या धोरणामुळे देवराये याची आत्महत्या झाली आहे. त्यास शासनच जबाबदार असून, यामुळे मराठा समाज आणखी आक्रमक होईल, असा इशाराही दिला आहे.
दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुदर्शन देवराये यांनी केलेली आत्महत्या गंभीर असून, देवराये यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. शासनाने या घटनेची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे, त्यासाठी राजकीय व कायदेशीर पातळीवर लढा द्यावा लागणार आहे. सर्व तरुणांना व आंदोलनकर्त्यांना मी कळकळीची विनंती करत आहे की, हा प्रश्न आयुष्य संपवून नव्हे तर शासनावर लोकमताचा दबाव निर्माण करुन सुटणार आहे. त्यामुळे कुणीही टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करु नये, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.