पुढच्या अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडू!

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

मराठा समाजाने संपूर्ण राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढल्यानंतर भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी एकही पाळलेले नाही. त्यामुळे मराठा समाजात असंतोष पसरला आहे. येत्या १० फेब्रुवारीपर्यंत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडू, गुजरातमधील पटेल समाजाच्या धर्तीवर भाजच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मराठा समाजाच्या वतीने पनवेल येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मराठा समाजाने राज्यात काढलेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर भाजप सरकारने जी आश्वासने या समाजाला दिली होती त्यापैकी एकही पाळले नाही. त्यामुळे पुढील आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक आज पनवेल येथे पार पडली. या बैठकीला राज्यातील २९ जिह्यांमधील मराठा प्रतिनिधी उपस्थित होते.

लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून भाजप सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही त्यामुळे यापुढील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विविध मांगण्यांसंदर्भात सरकारने येत्या १० फेब्रुवारीपर्यंत तातडीने निर्णय घ्यावा. जर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत तर गुजरातमधील पटेल समाजाच्या धर्तीवर राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेराव घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

प्रमुख मागण्या
– मराठा समाजाला आरक्षण मिळावे
– ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात यावा
– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करावी
– मराठा समाजासाठी जिह्याच्या ठिकाणी वसतिगृहे बांधण्यात यावीत
– शेतमालाला हमीभाव देण्यात यावा

शिवजयंतीपासून आंदोलन तीव्र
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने अशीच चालढकल पुढे चालू ठेवली तर मराठा समाज शांत बसणार नाही. शिवजयंतीपासून भाजप सरकारविरोधातील आंदोलन संपूर्ण राज्यात तीव्र करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा समाजाचे पनवेल समन्वयक विनोद साबळे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या