मराठा क्रांती मोर्चाचा मंत्रालयात सचिवांच्या दालनात ठिय्या

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण पुकारले होते. उपोषण सोडताना सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही असा आरोप करीत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मंत्रालयात सचिवांच्या दालनात आज अचानक दोन तास ठिय्या आंदोलन केले. अखेर उद्या गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी बैठक घेण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी दुपारी बारा ते पंधरा जणांचे शिष्टमंडळ सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या दालनात गेले होते. भांगे यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही म्हणून संतप्त झालेल्या या आंदोलकांनी त्यांच्या दालनातच ठिय्या मांडला. अकस्मात सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनाने प्रशासन व पोलिसांची धावपळ उडाली. अंकुश कदम, संजीव भोर, धनंजय जाधव, रघुनाथ चित्रे यांच्यासह ईसीबीसीमधून नेमणूक झालेले, पण नियुक्ती न मिळालेले काही विद्यार्थीदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते.

मराठा समाजातील नेमणुका झालेल्या विद्यार्थ्यांना ‘सुपर न्युमररी’ पद्धतीने नियुक्त्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यभरातील 23 जिह्यांत वसतिगृहांची उद्घाटने झाली नाहीत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 15 लाख करणे, सारथी संस्थेच्या सहा उपपेंद्रांची स्थापना करून सारथीच्या कामाची गती वाढवणे या प्रमुख मागण्या सरकारने 15 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन संभाजीराजे छत्रपती यांना दिले होते. या आश्वासनानंतर त्यांनी आझाद मैदानावर केलेले उपोषण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोडले होते. मात्र एप्रिल महिना संपत आला तरी त्यावर योग्य ती कार्यवाही झाली नसल्याचा दावा करीत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आक्रमक होते. त्यांनी भांगे यांच्या दालनात त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत सरकार मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसत असल्याचा आरोप केला. दरम्यान, सुपर न्युमररीच्या बाबतचा प्रस्ताव तयार असून मंत्रिमंडळाच्या समोर मांडण्यात येणार आहे, तर इतर मागण्यांबाबतची पूर्तता जवळपास पूर्णत्वास आली असल्याची माहिती सचिव सुमंत भांगे यांनी दिली.