मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यपालांविरोधात 7 डिसेंबरला जालना जिल्हा बंदची घोषणा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमानजनक एकेरी उल्लेख केला होता. तसेच महात्मा जोतीबा फुले यांचाही जाणीवपूर्वक अवमानजनक बोलून अपमान केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का बसला असून, त्यांची हकालपट्टी करावी म्हणून मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 7 डिसेंबरला जालना जिल्हा बंदचे आयोजन करण्यात आले आहे.

3 डिसेंबर रोजी रायगडावर उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन होणार असून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक संजय लाखे पाटील यांनी दिली. या बैठकीत बोलताना आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोशारी हे जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांचे हकालपट्टी झाली पाहिजे. यासाठी होत असलेल्या 7 डिसेंबरच्या जालना बंदमध्ये मी पूर्ण ताकदीनिशी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांसोबत आहे.

या बैठकीला आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील, जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे डेव्हिड घुमारे, बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे सुरेश मुळे, कल्याण दळे, बबलू चौधरी,राजेंद्र राख, परमेश्वर नाईकवाडे, रमेश गजर, शितल तनपुरे, ममता पवार, अशोक साबळे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.