वटहुकूम काढल्यानंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम; सीईटीच्या अधिसूचनेवर लक्ष

सामना ऑनलाईन । मुंबई

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात राज्य सरकारने वटहुकूम काढून विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरक्षित केले आहेत, मात्र विद्यार्थ्यांना अद्यापही सरकारने काढलेल्या वटहुकुमाने मिळालेल्या सुरक्षेची हमी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात सीईटीच्या वेबसाइटवर ज्यावेळी अधिसूचना पडेल तेव्हाच आम्ही आंदोलनाबाबत निर्णय घेऊ अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे.

सुमारे 250 विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू करून 11 दिवस झाले. विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन आणि त्याला मिळालेली मराठा संघटनांची साथ यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले आरक्षण टिकविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. अखेर वटहुकूम काढण्यात आला, मात्र या वटहुकुमाला खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांनी   आव्हान देण्याची तयारी केली. यामुळे मराठा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

शेणॉय, मेसवानी, कटारियांना मराठा आरक्षणाचे वावडे का?

खुल्या प्रवर्गातून आरक्षणाला आव्हान देण्याच्या ज्यांच्याकडून बाता मारल्या जात आहेत ते आधी महाराष्ट्रातले आहेत का? शेणॉय, मेसवानी, कटारिया, खन्ना यासारख्यांना मराठा आरक्षणाचे वावडे का? आम्हालाही घटनेनुसारच आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावेळीच असा आवाज उठविणे हे न्यायाला धरून नसल्याची प्रतिक्रिया मराठा विद्यार्थी डॉ. सुयश पाटील यांनी दिली.

वटहुकूम न्यायालयात टिकेल काय

हा वटहुकूम न्यायालयात टिकेल काय, असा सवाल विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. सरकारकडूनही यासाठी तयारी करण्यात आली असली तरी ज्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया रद्द झाली त्यानुसार जर वटहुकुमालाही आव्हान मिळाले तर आम्ही जायचे कुणाकडे, असा सवाल विद्यार्थी करीत असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

सरकारने वटहुकूम काढला तरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे जशी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याची अधिसूचना सीईटीच्या वेबसाइटवर  आली त्याप्रमाणेच आमचे प्रवेश कायम झाल्याची अधिसूचना सीईटीच्या वेबासाइटवर झळकली तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.