मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

मराठा आरक्षणाला सर्वेच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे नोकरभरती व शैक्षणिक सवलतींमध्ये आरक्षणाचा कोणताही लाभ मराठा मुलामुलींना मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष असून आपल्या मागण्यांसाठी मराठा समाजाने येत्या 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. पूर्ण ताकदीनिशी तो बंद यशस्वी करा असे आवाहन मराठा आरक्षण संघर्ष समितीने गुरुवारी केले.

तीन दशकांपासून लढा, 58 मूक मोर्चे, 42 समाजबांधवांचे बलिदान असा प्रदीर्घ संघर्ष केल्यानंतर मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले. परंतु सर्वेच्च न्यायालयाने त्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर प्रत्येक जिह्यामध्ये वेगवेगळी आंदोलने होत आहेत. कोल्हापुरात मराठा संघटनांच्या गोलमेज परिषदेत 16 मागण्यांचे प्रस्ताव मांडले गेले. मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली गेली आहे असे मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेशदादा पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी समितीचे भरत पाटील (कोल्हापूर), दीपक पाटील (कर्जत), सुशांत पाटील (नवी मुंबई), वंदना मोरे (रायगड) आदी उपस्थित होते.

समितीच्या मागण्या…

  • मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने प्रभावी पावले उचलावीत.
  • आरक्षणाला अंतरिम स्थगिती असल्याने मराठा मुलामुलींच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक फीचा परतावा शासनाकडून मिळावा.
  • मराठा आरक्षणाबद्दल अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही भरती करू नये.
आपली प्रतिक्रिया द्या