
मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यावरून सुरू असलेले राजकारण यामुळे राज्यातील वातावरण सध्या तापले आहे. त्यातच आता काही ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून देण्यास विरोध केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला आहे. या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांच्यावर भुजबळ सडकून टीका करत आहेत. मनोज जरांगे देखील छगन भुजबळ यांना थेट प्रत्युत्तर देत आहेत. अशातच म्हातारा माणून आहे म्हणून काही बोलत नाही. परंतु, मराठा आरक्षणाला विरोध केला तर काही खरे नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता दिला आहे.
ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केला. मराठ्यांच्या लेकरांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. इतरांना आरक्षण देताना मराठा समाजाने कधीही विरोध केला नव्हता. पण आता आम्ही आरक्षण मागितले तर का विरोध होत आहे, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. हे आंदोलन सरकारशी समेट घालायला नाही, तर मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे. म्हातारा माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही. पण मराठा आरक्षणाला विरोध केला तर मग मात्र काय खरे नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिला.
छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते. पण व्यक्ती म्हणून कधीच त्यांना विरोध नव्हता. मात्र आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठ्याची आलेली त्सुनामी कोणीच रोखू शकत नाही. मराठ्यांची मुले शेतातच राहिली. आरक्षण नसल्याने ही मुले त्यांची स्वप्न पूर्ण करू शकली नाहीत. आम्ही मराठे आरक्षणाच्या सगळ्या सवलती घेणार आहोत. माझाकडे एक मंत्री आले होते. मला म्हणाले तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही. मराठ्यांची पोटजात का होऊ शकत नाही, तर तो म्हणाला साहेबाना विचारून येतो, तो परत आलाच नाही, या शब्दांत मनोज जरांगे यांनी सरकारवरही हल्लाबोल केला.