
अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सलग 17 दिवस बेमुदत उपोषण केले. अशक्तपणामुळे ते गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत होते. नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा ते मैदानात पोहोचले असून 40 दिवसांत मराठा आरक्षण मिळाले नाही तर आम्ही कशी फजिती करतो, हेच पाहा अशा शब्दांत त्यांनी मिंधे सरकारला अल्टीमेटम आणि थेट इशारा दिला आहे.
तुम्ही आतापर्यंत सगळे डाव टाकले, आता डाव टाकण्याची वेळ आमची आहे. आमचा डाव पडला तर तुमची कशी फजिती करतो, ते पाहाच, असे जरांगे पाटील म्हणाले. तुम्ही आधी सांगितले की, आमचे आंदोलन विरोधी पक्षाने उभे केलेय. नंतर तुम्हाला काहीच सापडले नाही. आता वेगळेच सांगितले जातेय की, हे आंदोलन सत्ताधायांनीच उभे केलेय. पण, असे कधी होऊ शकते का? त्यांचे सगळे डाव आता सर्वसामान्यांनी ओळखले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.