मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा; गद्दार खासदार लावणीत दंग!

जालन्यातील आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हय़ात वणवा पेटला आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील स्मशानभूमीत 4 दिवसांपासून 7 जण बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यातील एकाची तब्येत चिंताजनक असताना गद्दार खासदार हेमंत पाटील लावणी कार्यक्रमात दंग झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वणवा पेटलेला असताना गद्दार खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. पाटील यांनी शहरातील तिरुमला लॉन्स येथे 1982 ते 86 काळातील शासकीय वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात 8 सप्टेंबर रोजी कवी संमेलन व 9 सप्टेंबर रोजी ‘करते तुम्हास मुजरा’ या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान त्यांनी जिल्ह्यात एकाही मराठा आंदोलकाची भेट घेतली नाही. विशेष म्हणजे वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील स्मशानभूमीत 7 जणांनी सुरू केलेल्या उपोषणाला हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यांतील मराठा समाज बांधव शेकडोच्या संख्येने भेट देऊन पाठिंबा देत आहेत. तसेच हिंगोली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, अजित मगर या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र पाटलांनी त्यांची साधी भेटही घेतली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.