मराठा आरक्षण : भाजप आमदाराची स्वपक्षाच्या नेत्याविरोधात तक्रार, पोलिसांकडून चौकशी

योगेश पाटील । हिंगोली

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सोशल मीडियावर पाठवण्यात आलेल्या पोस्टचा आधार घेऊन हिंगोलीचे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भाजपचे स्थानिक नेते रामरतन शिंदे यांची चौकशी केली आहे. यामुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पेटले होते. या दरम्यान सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरत होत्या. “मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या न करता आमदार-खासदारांना जाब विचारावा”, अशी पोस्टही फिरवण्यात आली. दरम्यान, हिंगोलीचे भाजपा जिल्हाध्यक्ष आणि आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोलीच्या पोलीस अधीक्षकांकडे मराठा आरक्षणा दरम्यान सोशल मीडियावर आलेल्या या पोस्टच्या आधारे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत आमदार मुटकुळे यांनी जीवितास धोका असल्याचे नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या आडून काही समाजकंटकांनी चिथावणीखोर पोस्‍ट फिरवल्याचा आक्षेपही मुटकुळे यांनी घेतल्याचे सांगण्यात आले. या तक्रारीसोबत मुटकुळे यांनी भाजपच्या जि. प. सदस्या संगीता शिंदे यांचे पती व भाजपचे स्थानिक नेते रामरतन शिंदे यांच्या पोस्टचा स्क्रीन शॉट देखील जोडला आहे.

पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी आमदार मुटकुळे यांच्या या तक्रारीची चौकशी हिंगोली शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांच्याकडे सोपविली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने मदने यांनी चौकशी सुरू केली. भाजपा नेते रामरतन शिंदे यांना देखील चौकशीसाठी सोमावारी बोलावण्यात आले होते. भाजप आमदाराच्या तक्रारीवरून भाजप नेत्याची चौकशी पोलिसांकडून झाल्याने या प्रकाराची चर्चा आज सायंकाळी उशिराने हिंगोलीत सुरू झाली.

पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी “दैनिक सामना”शी बोलताना आमदार मुटकुळे यांची तक्रार प्राप्त झाल्याचे सांगितले. तसेच हिंगोली शहराच्या पोलीस उपाधीक्षकांकडे चौकशी सोपवल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. तर चौकशी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक राहुल मदने म्हणाले की, ‘आमदार मुटकुळे यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू आहे. रामरतन शिंदे यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट तक्रारीसोबत जोडण्यात आल्यामुळे रामरतन शिंदे यांना चौकशीसाठी बोलावले होते.’

रामरतन शिंदे यांच्याकडे याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी पोलिसांनी चौकशीत या पोस्ट बाबत विचारपूस केल्याचे सांगितले. या पोस्टमध्ये कुठल्याही आमदार अथवा खासदाराच्या नावाचा उल्लेख केलेला नव्हता. मी मराठा समाजाचा असल्यामुळे ही पोस्ट टाकल्याचे शिंदे म्हणाले. या तक्रारनाट्यावरून भाजपातील गटबाजीचा तमाशा समोर आला आहे. याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आमदार मुटकुळे यांचा संपर्क होऊ शकला नाही.