गिरीश महाजनांच्या ताफ्यासमोर सकल मराठा समाजाची निदर्शनं, काळे झेंडे दाखवत तुफान घोषणाबाजी

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमत्ताने नांदेड येथे झेंडावंदनास पोहोचलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. गिरीश महाजन यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत मराठा समाजाच्या तरुणांनी तुफान घोषणाबाजी केली. यामुळे गोंधळ उडाला होता.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले होते. मात्र सरकारने एका महिन्यात आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिल्याने जरांगे यांनी उपोषण तुर्तास स्थगित केले असले तरी राज्यभर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नांदेड येथे झेंडावंदनाला येऊ नये, असा इशारा मराठा समाजाने दिला होता. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल मराठा समाजाची एक बैठकही झाली होती. यावेळी प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते.

सरकारच्या आवाहनानंतरही गिरीश महाजनांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ताफा झेंडावंदनासाठी जात असताना मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. ‘जय जिजाऊ जय शिवराय’, ‘आरक्षण आमचे हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’, ‘मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झालाच पाहिजे’, ‘चले जावो चले जावो पालकमंत्री चलेजावो’, ‘सरकारचे करायचे काय’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, यावेळी नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलनकर्ते संतोष गव्हाणे, राजेश मोरे, संकेत पाटील, दशरथ कपाटे, भुजंग पाटील, विठ्ठल पावडे, शाम वडजे, शिवाजी पावडे, धनंजय सुर्यवंशी, भगवान कदम, सुभाष कोल्हे, गजानन कहाळेकर, सुनील कदम, स्वप्नील सुर्यवंशी, अंकुश कोल्हे, नवनाथ जोगदंड, गोपाळ कदम, शाम कोकाटे यांच्यासह इतरांना ताब्यात घेतले व शिवाजीनगरातील पोलीस स्टेशन येथे नेले.