
आरक्षण नसलेले मराठे संपवण्याचे कारस्थान सध्या सुरू आहे. मात्र राज्यात सर्वत्र हजारोंच्या संख्येने पुरावे सापडत असून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजातील लेकरा-बाळांच्या भविष्यासाठी आम्ही आरक्षण मिळवणारच. कोणी कितीही प्रयत्न केले तरी मराठय़ांची एकजूट कायम राहील, असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी आज महाडच्या सभेत केले. 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावागावात साखळी उपोषण करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले जरांगे-पाटील यांची आज महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा झाली. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सरकारने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीमार्फत पुरावे शोधण्याचे काम सुरू असून ते मोठय़ा प्रमाणावर सापडत आहेत. हे पुरावे पाहता आता मराठा समाजाला आरक्षणापासून कोणीच रोखू शकत नाही. मराठय़ांचे पुरावे 70 वर्षे कोणी लपवून ठेवले होते त्यांची नावे सरकारने आता जाहीर करावीत, अशी मागणी जरांगे यांनी केली.
जाती जातीमध्ये तणाव निर्माण करू नका
जाहीर सभेपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, आरक्षण नसलेले मराठे संपवण्याचे कारस्थान रचले जात आहे. घटनात्मक पदावर बसून कायदा पायदळी तुडवण्याचे काम सध्या सुरू आहे. जाती जातीमध्ये तणाव निर्माण होईल, अशी वक्तव्ये काही नेते करीत आहेत. मात्र आम्ही त्यांना काडीची पिंमत देत नाही. पूर्वी त्यांना वैचारिक विरोध होता. पण आता मात्र त्या व्यक्तीविषयी आमच्या मनात कोणतीही दया-माया नाही. त्यांनी कितीही विरोध करू दे, कितीही ताकद लावू दे, पण राज्यात अशांतता निर्माण होऊ देणार नाही, असेही जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.
रायगडावर अनवाणी कूच
महाडमधील सभेपूर्वी जरांगे-पाटील यांनी आज सकाळी रायगड किल्ल्यावर अनवाणी कूच केले. किल्ल्यावर आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच राजदरबार व होळीचा माळ येथेही भेट दिली.