…तर पुन्हा आंदोलन पुकारू, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र या बैठकीला एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाकडून त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी करावी. नाही तर पुन्हा आंदोलन पुकारण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी कोल्हापूर येथे केलेल्या मूक आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने संभाजीराजे व मराठा संघटनांच्या प्रतिनिधींसोबत 17 जून रोजी एक बैठक घेतली. या बैठकीत समाजाच्या प्रमुख मागण्यांविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मागण्यांची पूर्तता करण्याबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी मागितला होता. हा अवधी संपत आला तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याकडे संभाजीराजे यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

राज्य शासनाने समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य जरी केल्या असल्या तरी प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. संबंधित सर्व प्रशासकीय विभागांकडून मागण्यांबाबत झालेल्या निर्णयांचा कार्य अहवाल त्वरित मागवून या मागण्या मार्गी लावून त्यांची तत्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या