अतुल परचुरे यांचे निधन, अष्टपैलू अभिनेत्याची चटका लावणारी ‘एक्झिट’

अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर नाटक, मराठी, हिंदी चित्रपट आणि छोटा पडदा गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. उपचारानंतर ते बरे झाले होते आणि रंगभूमीवर पुन्हा कमबॅकसाठी  सज्ज होते. आजारपणाशी लढा देत त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला होता. आज हा प्रवास थांबला. अतुल परचुरे यांनी ‘एक्झिट’ घेतली. त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी कलाकार, मनमिळावू सहकारी आणि जिवाभावाचा दोस्त हरपल्याची भावना सिनेनाटय़सृष्टीतून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी सोनिया परचुरे आणि मुलगी असा परिवार आहे.

बालकलाकार म्हणून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केलेल्या अतुल परचुरेंनी अनेक मालिका व चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नाटकातला ‘मुकंदा’ असो किंवा  ‘नातीगोती’ नाटकातला ‘बच्चू’ हा गतीमंद मुलगा असो,  ही दोन अत्यंत वेगळी परस्पर भिन्न पात्रं सहजसुंदर अभिनयाने जिवंत केली. ‘कापूस कोंडय़ाची गोष्ट’ या नाटकातील त्यांच्या अद्वितीय अभिनयाने रसिकांनी हे नाटक अक्षरशः डोक्यावर घेतले. परचुरे यांनी पु. ल. देशपांडे यांच्यासमोर त्यांचीच व्यक्तिरेखा ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. ‘गेला माधव कुणीकडे’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘बे दुणे पाच’, ‘प्रियतमा’, ‘वासूची सासू’, ‘डोळे मिटून उघड उघड’ अशा अनेक नाटकांमध्ये त्याने विविधरंगी भूमिका करून रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं. अखेरपर्यंत ते रंगभूमीशी जोडलेले होते. कर्करोगावर मात करत त्यांनी ‘खरं खरं सांग’ या नाटकाचे प्रयोग सुरू केले होते. तर ‘सूर्याची पिल्ले’ मध्ये काम करणार होते. मात्र त्याआधीच त्यांचा प्रवास थांबला. दरम्यान, अतुल परचुरे यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सिनेसृष्टीवर सहजसुंदर अभिनयाची छाप

चित्रपटसृष्टीत  ‘नारबाची वाडी’, ‘हाय काय नाय काय’, ‘झकास’, ‘आम्ही सातपुते’,   ‘पेइंग घोस्ट’ अशा अनेक मराठी, तर, ‘चोरोंकी बारात’, ‘जिंदगी 50-50’, ‘लव्ह रेसिपी’, ‘छोडो कल की बाते’, ‘खट्टा मिठा’, ‘ऑल द बेस्ट’, ‘डिटेक्टिव्ह नानी’, ‘ईट्स ब्रेकिंग न्यूज’, ‘पार्टनर’, ‘आवारापन’, ‘सलाम ए ईशक’, ‘कलयुग’, ‘यकीन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘बेदर्दी’, ‘जुडवा 2’ ‘पार्टनर’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून परचुरे यांनी आपली ओळख बनवली.  ‘बिल्लू’ चित्रपटातील परचुरेंच्या अभिनयाने कमाल केली. ‘जागो मोहन प्यारे’ आणि ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकांद्वारे ते घराघरात पोहोचले. ते कपिल शर्मा शोमध्ये दिसले होते. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा होता.

दोन झुरळांनी स्टेजवर एंट्री घेतली… अतुल परचुरेंनी सांगितला होता भन्नाट किस्सा

रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अलीकडेच अतुल परचुरे यांचा झी नाटय़गौरव पुरस्कार सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला होता. यावेळी त्यांनी नातीगोती या नाटकाचा प्रयोग सुरू असताना आलेल्या गमतीदार अनुभव त्यांनी सांगितला होता.

अतुल परचुरे म्हणाले “नातीगोती नाटकाचा नगर किंवा कुठेतरी असा प्रयोग होता, तेव्हा तिथल्या थिएटरचा पडदा तीन महिने वगैरे उघडलेला नव्हता. तो पडदा उघडला गेल्यानंतर त्याच्यात झुरळ, पाली, डास वगैरे होते. ते साफ करून आमचा प्रयोग सुरू झाला. ‘नातीगोती’मध्ये स्वाती चिटणीस जी माझ्या आईची भूमिका करत होती. ती साडी कपाटातून बाहेर काढते आणि नेसायला जाते, असा एक प्रसंग होता. त्यामुळे तिने साडी कपाटातून बाहेर काढली आणि त्याच्यात दोन मोठी झुरळं होती. स्वातीने ती साडी दिली फेकून ती आत निघून गेली. या झुरळांबरोबर स्टेजवर मी काम नाही करू शकत, असं सांगितलं’’  पुढे ते म्हणाले, मी त्या नाटकात मतिमंद मुलाचं काम करत होतो. मी स्टेजवर बसलो होतो. ती झुरळं माझ्या दिशेने यायला लागली. मी झुरळांना ढकलायचा प्रयत्न करत होतो. शेवटी ती झुरळं माझ्याकडे येताच मी देखील उठून आत गेलो. बॅकस्टेजवाल्या सहकाऱ्याने तिथे येऊन ती झुरळं मारली आणि पुढचा प्रयोग सुरू झाला. व्यावसायिक नाटक हे तुम्हाला नुसते मनोरंजन देत नाही तर नाटक प्रसंगाना तोंड द्यायला शिकवते.’’

त्यांनी रंगवलेल्या भूमिका कायम लक्षात राहतील

आपल्या चतुरस्र अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत झालेले आणि मराठी माणसाच्या हृदयात स्थान मिळवलेले अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी अतिशय वेदनादायी व अस्वस्थ करणारी आहे. त्यांनी रंगवलेल्या भूमिका कायम लक्षात राहतील. देव त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुŠख सहन करण्याचे बळ देवो अशी प्रतिक्रीया शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर दिली आहे.

जवळचा मित्र गमावला

अतुल आणि माझा अनेक वर्षांचा परिचय. लहान असल्यापासून तो नाटकात काम करायचा. मला आठवतंय नववीत असताना त्याने माझ्यासोबत टिळक आणि आगरकर या नाटकात काम केले होते. तेव्हापासूनची आमची घट्ट मैत्री होती. कर्करोगावर मात करून अतुलने रंगभूमीवर दमदार कमबॅक केले होते. सूर्याची पिल्ले या नाटकासाठी तो रिहर्सल करत होता. तब्येत बिघडल्याने पाच दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयात दाखल केले. तो परत येईल असे वाटत होते. पण माझा जवळचा मित्र आज मला कायमचा सोडून गेला, अशा भावना अभिनेते जयवंत वाडकर यांनी व्यक्त केल्या.

खलनायकएकदाच 

आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेते अतुल परचुरे यांनी माझा होशील ना या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारली होती. जेडी असे त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव होते.

त्याचं जाणं सतत मनाला जाणवत राहील  

खूपच दुःखद घटना. माझा अत्यंत जवळचा आणि आवडता मित्र होता. अतुलसारख्या उत्कृष्ट नटाच्या जाण्यामुळे मराठी सिने नाटय़सृष्टीचे मोठे नुकसान झाले. ‘खिचडी’ या चित्रपटात त्याने माझ्या लहानपणाची भूमिका साकारली होती, हे मी विसरुच शकत नाही. त्याचे जाणे सतत मनाला जाणवत राहील, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.