सूत्रसंचालकाच्या भूमिकेत!

स्टार प्रवाहवर मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे दुसरे पर्व 10 जूनपासून सुरू होणार आहे. यानिमित्ताने लहानग्यांच्या सुरांची मैफल अनुभवता येणार आहे. अभिनेत्री वैदेही परशुरामी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. वैदेही म्हणाली, एका सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मी छोटे उस्तादच्या पहिल्या पर्वात सहभागी झाले होते. या मंचावरचे टॅलेंट पाहून मी भारावले होते. आता दुसऱया पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर आहे. इतक्या लहान वयात एवढा आत्मविश्वास पाहून खरंच मी भारावले आहे. सूत्रसंचालनाच्या आव्हानाविषयी ती म्हणाली, प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा मी पहिल्यांदा होस्ट केला होता. सूत्रसंचालन ही कला आहे. स्टार प्रवाहने माझ्यातला हा पैलू मला शोधून दिल्याबद्दल मी आभारी आहे. सूत्रसंचालन करताना प्रसंगावधान राखावे लागते. लहान मुलांसोबत जमवून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. यानिमित्ताने खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत.