
मी खात्रीने सांगू शकते की, काही काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात विनाकारण येत नाहीत, तर त्यांच्या येण्याचे, किंबहुना त्या व्यक्तींना नियतीने आपल्याकडे पाठवण्याचे एक प्रयोजन असते. ती व्यक्ती रक्ताच्या नात्याची नसली तरी तुमचे आणि तिचे एक अनोखे नाते जुळते, रक्ताच्या नात्यांपेक्षाही जास्त घट्ट, गडद!
आजसुद्धा तो दिवस मला लख्ख आठवतोय 2018 सालचा. ‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवर मला भेटायला राजेंद्र कांबळे आले होते. वय वर्षे 55च्या आसपास. त्यांना पाहताक्षणी मला वाटले की, अरे या व्यक्तीला मी आधी कधी भेटले आहे असे का वाटतेय? कारण नक्की नाही माहिती, पण वाटले खरे.
यानंतर त्यांनी मला एका त्यांच्या प्रोजेक्टमधील सिनेमाची कथा ऐकवली आणि मुख्य भूमिकेसाठी विचारणा केली. मला ती भूमिका, ती संहिता नाही आवडली म्हणून त्यांना ताबडतोब मी नकार दिला, पण गमतीचा आणि आश्चर्याचा भाग असा की, नकार दिल्यानंतरसुद्धा जवळ जवळ तासभर आम्ही वेगवेगळय़ा विषयांवर गप्पा मारल्या. तशी मी फार लगेच कुणामध्येही मिसळणारी किंवा मोकळी होणारी व्यक्ती नाही. यांच्याशी मात्र का, कसे, कोण जाणे, पण मी भरभरून गप्पा मारत गेले. आमची भेट संपताना फोन नंबरांची अदलाबदल केली आणि त्यानंतर पुढे आमच्यात संभाषण होत गेले. ही भेट होण्याच्या जवळ जवळ दोन महिने आधीच माझे वडील वारले होते. मी खूप डिप्रेस मूडमध्ये होते. जगण्याचे कारण आता काय, या विचाराने गोंधळले होते. प्रत्येक बाबतीत मी बाबांवर अवलंबून होते. त्यामुळे ते आयुष्यात नाहीत हा विचारच मला अतोनात दुखावणारा होता. अशा कालावधीत माझी यांच्याशी भेट झाली.
जसजसे माझे आणि राजेंद्र कांबळे यांचे संभाषण होत गेले, भेटीगाठी होत गेल्या, तसतसे ते मला दर भेटीगणिक नव्याने उमगत गेले. जणू माझ्या बाबांनीच माझ्यासाठी हा ‘देवदूत’ पाठवलाय आहे आणि मी त्यांना ‘सातारमामा’ कधी म्हणायला लागले हे माझे मलाही कळले नाही.
नुकताच माझा 28 वर्षांचा भाऊ अचानक वारला. पुन्हा मी पूर्ण ब्लँक झाले. पाच वर्षांपूर्वी वडील आणि आता भाऊ… एक पोकळी निर्माण झाली आमच्या कुटुंबात. पुन्हा मामा मदतीला धावून आले. धावून आले असे मी म्हणणारच नाही. कारण आज मी कुठेही पाहिले तरी चहुबाजूला मला तेच दिसतात. मला खात्री असते की, मी किती अडखळले, पडले तरी मला ते सावरून घेतील. पुष्कळदा काही न बोलतासुद्धा नजरेने ‘मी आहे ना अपू’ ही बोलणारी त्यांची नजर मला बळ देते हजारो हत्तींचे.
ते मला इतके अचूक ओळखतात, अगदी माझ्या आईइतकेच. मी नुसती शांत जरी बसले तरी ताबडतोब विचारतात, ‘‘काय गं, काय चाललंय डोक्यात?’’
‘बिग बॉस’ची ऑफर आली तेव्हा मी त्यांना सांगितले की, ‘‘मला आईची पुष्कळ काळजी वाटते आहे.’’ तेव्हा त्यांनी मला शब्द दिला की, ‘‘तू शंभर दिवसांनी येशील ना, तेव्हा तुझी आई जशी आहे ना, तशीच तुला दिसेल. तिची मी माझ्या सख्ख्या बहिणीसारखी काळजी घेईन.’’ त्यांच्या या एका आश्वासनावर मी ‘बिग बॉस’मध्ये जाऊन आले.
माझे हट्ट, माझे मूड स्विंग्स, माझी चिडचिड सातारमामा सांभाळतात, किंबहुना सहन करतात. नुकतेच मी ठाण्याला नवीन घर घेतले आणि तुम्हा साऱ्यांना फार अभिमानाने आणि आनंदाने सांगू इच्छिते की, शेजारी मामांनीसुद्धा घर घेतलेय. इतके आम्ही एकमेकांच्या जवळ आलोय की, आता शेवटपर्यंत एकमेकांच्या सोबत असणार आहोत ही भावना सुखावणारी आहे आणि हवीहवीशी वाटणारी आहे.
पॉझिटिव्हिटी म्हणजे काय असावे हे सातारमामांकडे नुसते बघितले तरीही कळते. कुठल्याही नैराश्याच्या, आनंदाच्या, विजयाच्या, दुःखाच्या क्षणी ते माझ्या सोबत असतात. मला वेळोवेळी ते भावनिक आधार देतात आणि त्यामुळे माझ्या मनाला जी उभारी मिळते, ती उभारी मला पुन्हा नव्याने जगण्याचे बळ देत राहते.
मामा म्हणतात, ‘‘अगं, हरू नकोस, धीर सोडू नकोस. तुला आयुष्यात काहीतरी नवीन हवं ना? मग तू सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करत सतत खणत रहा. पण दमलीस तरी ती मोहीम सोडू नकोस. एक घाव, दोन घाव असे घावांवर घाव घालत रहा. न जाणो, पुढच्याच घावाला तू जे शोधतेस तेच अचानक सापडेल आणि नक्कीच सापडेल.’’ त्यांच्या या आणि अशा अनेक पॉझिटिव्ह गोष्टींमुळे मला सकारात्मक प्रेरणा येत राहते.
म्हणूनच मी नव्या जोमाने, नव्या ऊर्जेने आणि निर्धास्तपणे आयुष्याची वाट चालते आहे आणि चालत राहीन.
शब्दांकन ः निनाद पाटील