आम्ही खवय्ये: साधेसुधे खाणे

74

>> पॅडी कांबळे 

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय?

‘जगण्यासाठी खाणं’

खायला काय आवडतं?

वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, यामध्ये सुरण, गवार, पालेभाज्या जास्त आवडतात. मांसाहारात बटर चिकन, मासे हे पदार्थ आवडीचे. शिवाय चटपटीत खाण्यापेक्षा साधं जास्त आवडतं.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?

सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता एवढं मर्यादित ठेवून रात्री जेवणं टाळतो. कारण आमच्या व्यस्त दिनक्रमामुळे रात्री-अपरात्री खाल्लं जातं. यामुळे अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते असा अनुभव आला आहे.

आठवड्यातून किती वेळा बाहेर खाता?

खूप वेळा बाहेर खाणं होतं. महिनाभर नाटकाच्या तालमी असतात. त्यानिमित्ताने बाहेरच खाल्लं जातं. पण मला घरचं जेवण खूप आवडतं. मित्राच्या घरी गेल्यावरही पोळीभाजी, वरणभात आवर्जून मागून खातो.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता?

मी जिथे बोरिवलीत राहतो तिकडे बेब्यू नावाचं हॉटेल आहे. तिथले पदार्थ छान असतात. बर्‍याचदा कुटुंबीयांना मासे खायचे असतील तर तिथे जातो.

कोणतं पेय आवडतं?

कोल्ड्रिंक पितच नाही. त्यातूनही फळाचं सरबत आवडतं.

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता?

तेव्हा शक्यतो शाकाहार करण्यावर भर असतो. यामध्ये दहीभात, दालखिचडी, दालफ्राय-रोटी हे पदार्थ खातो. प्रयोगाच्या आधी खाणं जमत नाही, प्रयोग संपल्यावरच खातो.

स्ट्रीट फूड आवडतं का?

हल्ली त्याच्या भेसळीचे व्हिडीओज बघून ते पदार्थ खाण्याबाबत साशंकता वाटते. असं असलं तरी काही ठिकाणं अशी आहेत जिथली स्वच्छता आणि खरेपणाबाबत माहिती आहे. अशा ठिकाणी पाणीपुरी खायला आवडते.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?

माझी पत्नी  काळ्या चण्याची वाटण घातलेली भाजी छान बनवते.

उपवास करता का?

आवर्जून करत नाही. कामामुळे झाला तर उपवास होतो. बर्‍याचदा कामाच्या धकाधकीत खाणं होत नाही. तोच उपवास.

स्वतः बनवू शकता अशी डिश आणि त्याची रेसिपी?

वरण-भात, पालेभाज्या, चहा, ऑम्लेट, भुर्जी अशा पुरुषांना सोयीसाठी जे सोपे पदार्थ यायला हवेत, ते मी उत्तम बनवतो. याव्यतिरिक्त वेगळी रेसिपी येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या