दमदार 2nd Inning!!

37

नितीन फणसे

दुसरी दमदार इनिंग… अमिताभ बच्चन. वय सत्तरच्या पुढे…तरुणांना लाजवेल इतके काम त्यांच्या हातात आहे. आपले मराठी नाटय़ कलावंत तरी कुठे मागे आहेत… रंगभूमी, चित्रपट, मालिका… प्रत्येक माध्यमातून त्यांचा तरुणाईला मागे टाकणारा संचार सुरू आहे. तरुण पिढीबरोबर जुळवून घेतानाच स्वत:ची तत्त्वे सांभाळत ते पुढचा प्रवास करत आहेत. कधी नव्यांना सल्ला देत, तर कधी आपल्या खणखणीत अनुभवी अभिनयाने याच नव्या पिढीला निरुत्तर करत त्यांची सेकंड इनिंग सुरूच आहे. या तीनही माध्यमांत स्वैर मुशाफिरी करणाऱया या कलाकारांना मानाचा मुजरा…

तीनही माध्यमं एन्जॉय करतो….सुनील तावडे

नाटक असो, सिनेमा असो की अगदी मालिका… तीनही माध्यमं मी एन्जॉय करतो. म्हणूनच आजपर्यंत टिकून आहे. मी कुठेही अनकम्फर्टेबल नसतो. कारण तीनही माध्यमांत क्रिएटिव्हिटी आहे. वेगवेगळ्या भूमिका करायचा माझ्यामध्ये किडाच आहे म्हणा ना… तीनही माध्यमांत खेळता येतं. ते एन्जॉय करतो. आजकालचे लोक खूप टॅलेंटेड आहेत. आताची कॉमेडी थोडीशी बोल्ड टाइपची आहे. पूर्वी मार्मिक विनोद असायचे, पण आता संतोष पवार वगैरे नव्या पिढीतले लोक आहेत. अनेक नवे लेखक येत आहेत. अपेक्षेपेक्षा वेगळी अशी विनोदाची स्टाइल आली आहे. ती मला खूप आवडते. सगळ्यांबरोबर काम केल्यामुळे रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं.

पूर्वी केलेली नाटकं परत येताहेत. तो ट्रेंडही खूप चांगला वाटतो. त्यावेळी लक्ष्याने केलेल्या ‘शांतेचं कार्ट चालू आहे’मधले विनोद आणि आता प्रियदर्शन जाधव किंवा भाऊ कदम करतोय ते विनोद यात खूप फरक आहे. मला वाटतं लोक हेही एन्जॉय करतात. प्रेक्षक आताच्या कलाकारांबरोबरही पूर्वीची नाटकं आवडीने बघतात. पूर्वीचे आणि आताचे यात जो बदल झालाय तो हवाच. कारण तोचतोचपणा राहिला तर कंटाळा येईल. बदल होतच असतो. सृष्टीमध्येही बदल होत असतो. बदल हा स्थायिभाव आहे. तो स्वीकारलाच पाहिजे. पूर्वीच्या लोकांना मेलोड्रामा आवडायचा… आता आवडत नाही. काळ बदलला असला तरी अजूनही बिनधास्त वागतो. पण आता शरीर तेवढं साथ देत नाही. ही शारीरिक बंधनं सोडली तर बदलत्या काळातही इनिंग सुरूच आहे. मी पूर्णपणे निर्व्यसनी आहे. सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच खातो, त्यानंतर काहीही खात नाही. दारू, सिगारेट, तंबाखू काहीच खात नाही… व्यायाम करतो.

मी फिट आणि फाइन…उज्ज्वला जोग

या इंडस्ट्रीत ३५ वर्षांहून जास्त काम केलं. तेव्हा नाटक हेच माध्यम जास्त असायचं. सिनेमा थोडाफार आला होता. पण आता मालिकांमुळे सगळ्याच अभिनयासाठी चांगला वाव मिळतो. त्यात जे आधी हातात येईल ते करते. आपल्याला कामच करायचंय. व्यक्तिरेखेला किती महत्त्व आहे हे मी पाहते. सीन्स पंचवीसच हवेत असं माझं म्हणणं नसतं. भूमिका चांगली असली पाहिजे. तेव्हाचा अनुभव आताच्या पिढीबरोबर काम करताना उपयोगी पडतो. पण त्यांना मी जास्त सांगायला जात नाही. कारण बऱयाचदा त्यांना आपण सांगितलेलं आवडत नाही.

पूर्वी आम्ही नाटकासाठी दोन-दोन महिने तालमी करायचो. त्यामुळे र्हस्व, दीर्घ यावर भर द्यायला आम्हाला सांगितलं जायचं. तोच आमचा स्वभाव झालाय. त्याचीच सवय पडलीय. आजकालच्या मुलांना ८-१० दिवसांत नाटक उभं करावं लागतं. आम्ही दोन दोन महिने तालमी करायचो. तसं तर मीही रिप्लेसमेंटमध्ये बरीच कामं केलीत. अचानक उद्या नव्या नाटकात एखाद्याच्या ऐवजी काम करायचं असायचं. तेही केलंय. तीन तीन नाटकं एकेका दिवशी केली आहेत. आता तर काय पूर्वीची नाटकं परत येताहेत. पूर्वी मी ‘शांतेचं कार्टं..’ केलं होतं. त्याच्या पहिल्या प्रयोगापासून मी होते. आता तेच नाटक करताना तरुण पिढी जे करताना दिसली त्यात विशेष वेगळं काही वाटलं नाही. लोकांना नाटकापेक्षा मालिका बघणं जास्त महत्त्वाचं वाटायला लागलंय. पूर्वी नाटक आणि फार फार तर सिनेमा एवढीच माध्यमं होती. आता कसं झालंय, मालिकांचीही त्यात भर पडली आहे. मग कशाला कोण बाहेर जाऊन मनोरंजन शोधेल? यातून आरोग्य सांभाळावं लागतं. ‘जाऊबाई जोरातच्या वेळी एक अपघात झाला होता. तो वगळता फिट आणि फाइन आहे.

आम्ही पॅशन म्हणून काम करतो…डॉ. गिरीश ओक

अभिनयावरच्या  प्रेमामुळेच दुसऱया इनिंगमध्येही उत्साहात काम करतोय. काळ बदलला आहे, पण या बदलाचा साक्षीदार असल्याचं जाणवतं.  प्रयोग केल्याचं एक समाधान असतं. आम्ही पॅशन म्हणून काम करतो. एका टेक्निशियनच्या जागी दुसरा चालतो. म्हणून ते पेड वर्कर्स आहेत. आमच्या बाबतीत तसं नसतं. व्यावसायिक नट असलो तरी अर्धा पैसा आणि अर्धं समाधान आम्हाला हवं असतं.

नवीन पिढी फोकस्ड आहे. हुशार आहे. फिजिकलीही सुपर्ब आहे. आजकालचे तरुण कधी पोट सुटलेले दिसणार नाही. फक्त त्यांना खूप लवकर प्रसिद्धी मिळाल्यामुळे ते ती पचवू शकतील का ही भीती वाटते. माध्यमं वाढलीत म्हणून प्रसिद्धीही लवकर मिळते. पण ती टिकणारी नाही. पूर्वीचे कलाकार बरीच बरीच वर्षे टिकून राहिली. तसं होईल की नाही असं वाटतं. पूर्वीची नाटकं नव्या रूपात येऊ लागली आहेत. पण ती इतकी चांगली आहेत की त्यांचे काळाचे संदर्भ बदलले नाहीत तरी चालू शकेल. ‘तुझं आहे तुझपाशी’ असो किंवा ‘ती फुलराणी’… आजच्या काळातही ती परफेक्ट वाटतात. पण ‘काचेचा चंद्र’सारखी काही नाटकं मात्र आजच्या काळानुसार वाटत नाहीत. पूर्वीचं नाटक आज केलं तर ते रिलीव्हंट वाटत नाही. कारण काळ खूप पुढे गेलेला आहे. काही गोष्टींचं रूपांतर केलं तरी जुनी नाटकं तशाच स्वरूपात यावीत असं मला वाटतं.

मी कोणत्याही काळात रमतो… अनंत जोग

तरुण पिढीबरोबर काम करायला मजा येते. पहिली इनिंग संपून दुसरी इनिंग सुरू झालेली असली तरी त्यात काही चुकीचं वाटत नाही. कारण ‘सेकंड जनरेशन इज बेटर दॅन अर्लियर जनरेशन’ असं जे म्हणतात ते मला पटतं. आधीची पिढी खरं तर ते मान्य करत नाही, मी मान्य करतो. आजची मुलं चांगली आहेत, हुशार आहेत, वक्तशीर आहेत. त्यातली काही चांगली नसतील, पण हाताची सगळी बोटं सारखी नसतात. जोपर्यंत मला करता येईल, माझी विस्मृती गेलेली नाही, हातपाय काम करत आहेत तोपर्यंत मी काम करत राहणार… जुनी नाटकं नव्या रूपात येताहेत हेही चांगलंच आहे. सुताराने एखादं टेबल बनवलं. तेच टेबल बघून दुसऱयाला तसंच टेबल बनवावंसं वाटलं तर त्यात गैर काय…?

परिवर्तन हा जगाचा नियमच आहे. परिवर्तन नसेल तर इंटरेस्ट निघून जाईल. त्यामुळे आधीचा रंगमंच, चित्रपट आणि आताचा रंगमंच, चित्रपट असे त्यांचे स्वरूप बदलले असले तरी ते योग्यच आहे. बदल हा व्हायलाच पाहिजे. पाणी वाहातं राहायला हवं. एकाच जागी थांबून राहील तर ते खराब होईल. काळाचंही तसंच आहे. तो सतत बदलतो आणि आपण तो बदल स्वीकारायला हवा. मी बदल स्वीकारतो म्हणूनच दुसऱया इनिंगमध्येही टिकून राहिलोय. मी शक्य असेल तेव्हा व्यायाम करतो. आनंदी राहतो. काही लोक मराठी नीट बोलत नाही. ते खटकतं, पण त्याला आपला काही इलाज नसतो.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या