माझ्या मराठीची बोलू कौतुके

ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी कुलश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. त्यांच्या जयंतीदिनी  ‘मराठी भाषा दिन’ साजरा केला जातो. या समसमान संयोगाला उपमा द्यायची झाली तर सर्वार्थाने एकच श्रेष्ठ उपमा आहे, ‘ज्योतिने तेजाची आरती.’

मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत बोलीभाषेतून झाला असल्याचं मानलं जातं. पैठण प्रतिष्ठानच्या सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात प्रथम वापर केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा आणि संस्कृतीची भरभराट झाली. इ.स.1988 साली मुकुंदराज या कवीने ‘विवेकसिंधू’ या काव्यग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुड लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदी ग्रंथांची भर घातली. शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. 1947 नंतर मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. 60 मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीला राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. 90 च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला गेला. मराठी भाषेचे वय हे साधारण 1500 वर्षं मानलं जातं. या काळात समाजजीवनातल्या बदलानुसार भाषा बदलत राहिली असं मानलं जातं.

एखादी भाषा मरते तेव्हा एक संस्कृती संपते, तिच्या निर्मिती आणि संवर्धनासाठी शेकडो वर्षे लाखो लोक राबलेले असतात. महाराष्ट्रात ज्यादिवशी बुद्धिजिवी मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाने मराठीचं बोट सोडलं त्या दिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला. त्यांना मराठीची गरज वाटत नाही. मराठी बोलीभाषांची विविधता हे मराठीचं खरं वैभव असून त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. अभिजात मराठी भाषा म्हणजे श्रेष्ठ मराठी भाषा. अनेक जातीधर्माचे लोक मराठी बोलतात. अनेक पंथ, धर्म, प्रांत, संस्कृती यांना मराठीने पोटात सामावून घेतले आहे. मराठी भाषा ही ज्ञानवंतांची भाषा आहे, ही श्रमाची-घामाची, निर्मितीची भाषा आहे. मराठी ज्ञानभाषा, धर्मभाषा,  अक्षरभाषा आणि अजरामर भाषा आहे. अमृतातेही पैजा जिंकणारी, स्वतःचे राज्य आणि श्रेष्ठ साहित्य असलेली मराठी ही जगातील चौथ्या क्रमांकाची राजभाषा आहे तर मराठीतले कोश वाङ्मय तर जगातले दुसऱ्या क्रमांकाचे कोश वाङ्मय आहे.

सरतेशेवटी हे म्हणावेसे वाटते, की भाषा-व्यवहाराशी संबंधित अध्यापक, पत्रकार, संपादक, लेखक, समीक्षक, मुद्रितशोधक, प्रकाशक, विक्रेते वगैरे सर्वांनीच आपले काम जास्तीत जास्त चांगले करणे हा भाषेचा आणि साहित्य यांच्या संवर्धनाचा उत्तम मार्ग आहे व त्यासाठी तंत्रज्ञानातील बदलत्या प्रवाहांचा आपापल्या कामात  उपयोग करून घेता येईल याचा त्यांनी सतत वेध घेत राहिले पाहिजे.

  • जयराम देवजी
आपली प्रतिक्रिया द्या