आम्हा घरी धन

नंदिता धुरी

समृद्धतेचा खराखुरा अनुभव भावलेल्या पुस्तकांशी आपलं एक गूढ नातं तयार होतं आणि ही पुस्तकं पुढच्या वाटेवर आपली सोबत करत राहतात. त्यांच्या ओळखीच्या खुणा कायमच्या आपल्यात मुरतात. वाचनाने समृद्ध होणं म्हणजे हेच. या समृद्ध होण्याची गोडी मला लहानपणापासूनच लागली. पुस्तकं दिसली की हुरळून जायचे. वाचनाचा हा आनंद घेत असतानाच आपल्याला नेमकं काय आवडतंय आणि नेमकं काय वाचायला पाहिजे हेही उमजू लागलं. खास पुस्तकांची यादी यातूनच तयार झाली असावी. आवर्जून वाचावीत अशी अनेक पुस्तकं आहेत. या पुस्तकांनी त्या त्या क्षणाला मला आधार दिला. त्यातल्या शब्दांना माणूस म्हणून माझ्या संवेदना जागया ठेवल्या आणि खरं जगणं काय असतं हेही पुस्तकांनीच शिकवलं. म्हणूनच पुस्तकांशिवायच्या जगाचा मी विचारच करू शकत नाही.

आवडत्या पुस्तकांच्या बैठकीत अनेक पुस्तकांनी हजेरी लावली असली तरी त्यातली मोजकी पुस्तकं मला पुन्हा पुन्हा खुणावतात. त्यातलंच एक म्हणजे रारंगढांग. प्रभाकर पेंढारकरांचं हे पुस्तक तुम्हाला एका अनोख्या जगात घेऊन जातं. प्रभाकर पेंढारकरांची ही कथा मनाला भिडते. मानकी भाकभाकना, निसर्गाचा स्कच्छंदीपणा आणि आर्मी असे अनेक पैलू उलगडत लेफ्टनंट किश्कनाथ मेहेंदळे याच्या भोकती फिरणारी ही कथा मनात घर करून राहते. ही कथाच मुळात माणसाच्या, निसर्गाच्या मैत्रीची आणि संघर्षाची आहे. याबरोबरच हिमालयातल्या वास्तवाचं चित्रमय दर्शन या कादंबरीतून होतं. कादंबरी आवडण्याचं हे आणखी एक महत्त्वाचं कारण. अशीच एक चित्रमय दर्शन देणारं कादंबरी म्हणजे ‘मृत्युंजय’. महाभारतातल्या कर्णाच्या व्यक्तिरेखेला खरा न्याय कोणी दिला असेल तर तो शिवाजी सावंत यांनी. कर्णाच्या माध्यमातून महाभारतातलं वैचारिक सार ही कादंबरी देते आणि कर्णाबाबत न संपणारी हुरहुर मनात ठेवून जाते. रामायण, महाभारत ही महाकाव्यं निरनिराळ्या रूपाने आपल्यासमोर आली आहेत. साहित्याच्या कोनातून या महाकाव्यांचा, त्यातील विचारांचा वेध घेणाऱया काही मोजक्या साहित्यकृतींमध्ये मृत्युंजय गणली जाते. त्यामुळे मृत्यंजयची लोकप्रियता पुढची कितीतरी वर्षे कायम टिकणारी आहे. या कादंबरीचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यातलं शब्दलालित्य. यामुळेच हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी मोहात पाडतं.

आवर्जून वाचावीत अशी अनेक पुस्तकं आपल्या मनात घोळत असतात. त्यातलं अढळ स्थान मिळवलेलं पुस्तक म्हणजे वीणा गवाणकर यांचं ‘एक होता कार्व्हर’. शालेय वयात पहिल्यांदा वाचलेल्या या पुस्तकाची कितींदा पारायणं झाली असतील, याची गणती नाही. खरंतर हे पुस्तक मुलांच्या अभ्यासक्रमात असावं इतकी त्याची महती आहे. या पुस्तकाने माझ्यावर विलक्षण जादू केली आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत हे केवळ शब्द न राहता त्याचं खरं रूप आपल्यासमोर उभं राहतं. माणूस घडवणाऱया जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचं कार्य एकदा तरी जाणून घ्यायलाच हवं. अशीच भुरळ पाडणारं आणि माझ्यातल्या व्यक्तिमत्त्वाला घडवू पाहणारं एक पुस्तक म्हणजे सिक्रेट. हे अनेकांचं आवडतं पुस्तक आहे.

सकारात्मकता म्हणजे काय आणि वाट स्वत: कशी चोखाळली पाहिजे, याचा पाठ हे पुस्तक घालून देतं. आपली मानसिक बैठक चांगली होण्यासाठी काही पुस्तकं आपल्याला मदत करतात. त्यापैकीच हे एक पुस्तक. आवडत्रा यादीतलं ‘इट प्रे लव्ह’ या पुस्तकाने मला व्यक्ती म्हणून समृद्ध केलं. एका प्रवासाची कथा सांगणाऱया या पुस्तकातल्या अनुभवांबरोबर तुम्हीही भटकंती करत राहता. या भटकंतीत स्वत:वर प्रेम करणं म्हणजे काय, जगणं म्हणजे काय या प्रश्नांची उत्तरं लेखिकेबरोबर आपल्यालाही मिळतात. ही सारीच पुस्तकं जगणं म्हणजे काय हे शिकवणारी आहेत. त्यांच्यासोबतच समृद्धतेचा खराखुरा अनुभव मला घेता येतो.