लाडक्या बाबाची कहाणी

फुलोरा टीम

बाबा… पप्पा… डॅडी… डॅड… अनेक नावं आहेत या नात्याला… पण नात्याचे बंध मात्र जेवढे नाजूक तितकेच अतूट… आणि मजबूत… मायलेकरांच्या नात्याशी इतर कोणत्याच नात्याची बरोबरी होऊ शकत नाही. खूप… खूप घट्ट आणि केवळ रक्ताचं नातं असतं ते… जन्माच्याही कित्येक महिने आधीपासूनच… पण बाबाचं नातं… वरवर कठोर, अलिप्त दिसणारा बाबा आपल्या लेकरांच्या बाबतीत आतून अगदी भिजलेल्या अंतःकरणाचा असतो. अत्यंत हळव्या मनाने तो त्याच्या लेकरांना दिसामाशी मोठं होताना पाहत असतो… निरखत असतो. महेंद्रसिंह धोनी. क्रिकेटचा सुपरस्टार. आपल्या लाडक्या लेकीत झिवामध्ये तितकाच गुंतलेला… गुरफटलेला… तिच्याबरोबर लाडू खाताना, गाणं म्हणताना, नाचताना, तिच्या आणि त्याच्यामधील विविध भावस्पर्शी क्षण नेहमीच या ना त्या माध्यमांतून समोर येत राहतात… आणि त्यातील निर्व्याज्य पण मनास भिडतेदेखील… कसोटी क्रिकेटमधून मिळालेला वेळ धोनी मनमुरादपणे आपल्या लेकीबरोबर घालवतो आहे. नुकतेच त्याने झिवाच्या शाळेत वार्षिक दिवसाला हजेरी लावली. आपले मराठमोळे सेलिब्रेटी बाबा आपल्या लेकींसाठी कसा वेळ काढतात… त्यांचं बाबापण कसं निभावतात पाहूया…

siddhrdh-jadhav-with-daught

स्वरा, इराचा मस्त बाबा व्हायचंय…सिद्धार्थ जाधव

ज्यावेळी घरी गेल्यावर माझ्या लेकी मला येऊन मिठी मारतात त्यावेळी कितीही थकलेला असलो तरी सगळा थकवा त्यांच्या मिठीने नाहीसा होतो. अगदी जादूची झप्पी दिल्यासारखे वाटते.

स्वरा आणि इरा या दोघीही माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहेत. दोघींबाबत माझी वेगळी ओढ आहे. तृप्तीच्या पोटातून स्वराला जगात येताना मी पाहिले आहे, त्यावेळी त्या डिलिव्हरी रूममध्ये होतो. त्यामुळे तिच्याशी माझे वेगळे बॉण्डिग आहे. इरा झाल्यानंतर तिच्यासोबत माझी जास्त धमाल होते. इरा फार उत्साही आहे.

घरी असल्यावर इरा-स्वरा दोघींसोबत फोटो काढत असतो. इरासोबत व्हिडीओज करतो ते इन्स्टावर टाकतो. स्वरा पहिलीला आहे आणि इरा प्ले ग्रुपला आहे. दोघींबरोबर जेवढा वेळ मिळेल तेवढा घालवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण मी जगत असतो. आम्ही तिघे असलो की घरी जाम दंगा घालतो आणि तृप्ती खूप ओरडते.  पण त्या क्षणाची मी वाट पाहत असतो ज्यावेळी घरी गेल्यावर माझ्या लेकी मला येऊन मिठी मारतात. त्यावेळी कितीही थकलेला असलो तरी सगळा थकवा त्यांच्या मिठीने नाहीसा होतो. अगदी जादूची झप्पी दिल्यासारखे वाटते. अलीकडे व्यस्त असल्यामुळे त्यांना जास्त वेळ देता येत नाही. पण जेव्हा असतो तेव्हा पूर्णवेळ देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या दोन्ही मुलींबाबत मी खूप भावूक आहे. आधी मी ऍक्शन वगैरे करायचो तेव्हा कसली फिकीर नसायची पण स्वरा-इरा झाल्यावर थोडे हे करणे टाळतो. आता एक बाबा म्हणून माझी वेगळी जबाबदारी आहे. त्यामुळे आरोग्याला जास्त जपतो. त्यांचा बाबा होण्यापेक्षा मी त्यांचा मित्र झालोय. स्वराच्या वेळी मी ते क्षण मिस केले, पण इराच्या वेळी ते जगतोय.

नुकताच स्वराच्या शाळेत ऍन्युअल डे झाला. तेव्हा मी पुण्यात होतो आणि त्या दिवशी पाऊस पडला. डेट पुढे गेली. त्यावेळेला माझे दोन प्रयोग पुण्यात होते आणि दुसऱया दिवशी आणखी एक प्रयोग पुण्यात होता. रात्रीचा माझा प्रयोग संपला. मी पहाटे चारची शिवनेरी पकडली, ८ वाजता षण्मुखानंद सभागृहात पोहोचलो तिथे स्वरा होती. तृप्तीला ती विचारतच होती बाबा येणार का? आणि मी तिथे जाऊन तिला सरप्राइज दिले. ती खूश झाली. मी गेल्याने तिच्या चेहऱयावर खुलणारे हसू मनाला समाधान देऊन गेले. आणखी काय हवे? मला जेव्हा वेळ असेल तेव्हा माझ्या मुलींना भरवतो, त्यांना झोपवतो. आता त्यांना फिरवावे लागते. खेळता खेळता पण झोपतात. मी माझ्या बाबांएवढा कधी मोठा होऊ शकत नाही. पण निदान स्वरा-इरा मोठय़ा झाल्यावर माझा बाबा खूप मस्त आहे एवढे बोलल्या तरी मला आनंद होईल. मला अभिमान आहे मी स्वरा आणि इराचा बाबा आहे.

swapnil-joshi

मायरा माझी परी…स्वप्नील जोशी

मायराचा जन्म झाला तेव्हा दोन महिने मी सुट्टी घेतली होती. दोन महिने घरी होतो. माझा फोन बंद होता. त्यावेळी २४ तास मी मायरा आणि बायकोबरोबर होतो. मी तिचं सगळं केलंय. मला तिचं शी शू काढता येतं, तिला अंघोळ घालता येते, तिला झोपवता येतं, जेवण भरवता येतं, तिच्याशी खेळता येतं… तिच्या दिनचर्येत जे जे काही आहे त्या लंगोट बदलण्यापासून ते डायपर बदलण्यापर्यंत सगळं मी त्यावेळी केलं आणि आताही वेळ असेल तर मी करतो. करेन. मुळात ही वेळ पुन्हा येत नाही. बाळाबरोबरचे हे दिवस परत कधी येणार नाहीत. ती एकदा मोठी झाली की तिच्याकडेच आपल्यासाठी वेळ नसणार… बस बाई माझ्याजवळ म्हटलं तर ती म्हणेल, बाबा मला मैत्रिणींबरोबर जायचंय… ती छोटी असते तेव्हा आपल्याला तिच्यासोबत मिळणारा वेळ आपल्याला जतन करायचा आहे.

माझी छकुली मायरा… खूप गोड आहे, द्वाड आहे, खोडकर आहे… २० महिन्यांची आहे. या वयाची मुलं जशी असतात तशीच आहे. अतिशय लाडकी आहे माझी…

बाबा झालो तेव्हा नेमकं काय वाटलं हे मला नाही सांगता येणार… आयुष्यात असे काही क्षण असतात जे कुणालाच शब्दात मांडता येत नाहीत. त्या क्षणांमधला तो एक क्षण होता… त्या  क्षणाची गोडीच अशी असते की कुणी ती शब्दात मांडण्याचा प्रयत्नही करू नये असं वाटतं. मायराचा जन्म हा माझ्यासाठी तसा क्षण आहे. कुठलंही मूल जेव्हा जन्म घेतं तेव्हा ते फक्त मूल म्हणून जन्म घेत नाही, तर एक अख्खा परिवार वेगळा जन्म घेत असतो. कारण मुलाबरोबर त्या मुलाची आई जन्म घेते. तोपर्यंत ती फक्त एक पत्नी असते. पण आई त्या मुलाबरोबर होते. त्या मुलाबरोबर एक बाप जन्माला येतो. खूप नवनवीन नाती जन्माला येतात. आजी-आजोबा, काका-काकी, मामा-मामी, आईकडचे आजी-आजोबा.. खूप खूप… त्यामुळे एक छोटा जीव जर एवढं परिवर्तन करत असेल तर तो आनंद देणाराच असेल ना…

लहानपणी आपण ऐकायचो.. एक परी असते. तिच्याकडे जादूची छडी असते. ती सगळं गायब करते. मला वाटतं लहान मुलं ही आपल्या आयुष्यातली तीच जादूची छडी आहेत. किमान मायरा तरी माझ्यासाठी तशीच आहे. तुम्ही कितीही त्रासलेले, वैतागलेले असाल तेव्हा जेव्हा तुम्ही दार उघडून आत येता तेव्हा ती तुमच्याकडे बघून हसते, धावत येऊन बिलगते त्या क्षणी सगळं एका क्षणात दुःख नाहीसं होतं. मग वाटतं अशापेक्षा जास्त चांगलं आयुष्य नाही. मायराने मला पहिल्यांदा ‘बाबा’ म्हटलं होतं तो क्षण… म्हणजे मी तो दिवस आयुष्यात कधीच विसरणार नाही.

माझी मुलगी मायरा खूप गुणी आहे… माझी मुलगी आहे म्हणून सांगत नाही, पण ती शहाणी मुलगी आहे. लोक तिचं कौतुक करतात ते ऐकायला आवडतं. माझ्या आईवडिलांना माझ्याबद्दल त्यावेळी काय वाटत असेल याची जाणीव होते. आम्ही मायरासाठी रात्र रात्र जागतो, त्रास घेतो ते पाहून माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी किती केलंय याची कल्पना येते. मायरामुळे मला आपल्या आईवडिलांबद्दल एक वेगळाच आदर निर्माण झाला आहे. त्यांनीही माझ्यासाठी किती रात्री जागल्या असतील. त्याग केला असेल याची जाणीव होते. माझ्या बाळांनी चांगलं माणूस व्हावं असं वाटतं. त्यांनी नाव काढावं आईवडिलांचं… चांगल्या अर्थाने…

bhau-kadam-family

 माझी मुलं मला भरभराट देत गेली…भाऊ कदम

कामामुळे परदेशात जाणे होते. तिथे लहान मुलांसाठी अनेक गोष्टी असतात त्या पाहिल्या की मुलांची आठवण आल्यावाचून राहत नाही. माझ्या मुलांनी इथे मजा केली असती असा मनाला चटका लागतो. पण एवढे कुटुंब घेऊन परदेशात जाणे शक्य नाही. ते खूप खर्चिक आहे. त्यामुळे त्यांना इथे राहून जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न करत असतो. मला मृण्मयी ही पहिली मुलगी झाली आणि फार आनंद झाला. खरं तर माझ्या प्रत्येक मुलीने काहीना काही दिलेच आहे. माझी मुलं मला भरभराटच देत गेली. त्यामुळे जे काही आहे, जे काही करतोय ते माझ्या मुलांसाठीच करतोय. माझ्यासाठी माझे काम मला समाधान देते,  पण जे व्यावहारिक आहे ते केवळ त्यांच्यासाठी आहे. त्यांच्या भविष्याची तरतूद आहे.

मृण्मयी, संचिता, समृद्धी आणि आराध्य ही माझी चार अपत्ये. मालिका, नाटक आणि चित्रपट यामध्ये व्यस्त असतो. जेव्हा घरी असतो तेव्हा मी मुलांसोबत वेळ घालवतो. खरं तर, जेव्हा घरी असतो तेव्हा माझी मुलं शाळेत गेलेली असतात किंवा खेळत असतात. त्यामुळे फारसा वेळ देता येत नाही. पण व्यस्त वेळातही मी त्यांना अधूनमधून फोन करत असतो, त्यांचे मला फोन येत असतात. कधीतरी माझी समृद्धी फोन करते आणि कुठे आहात? काय करताय बाबा? कधी येणार? तिला उगाच फोनवर बोलायचे असते. त्यांना आठवण येत असते. माझी मोठी मुलगी मृण्मयी कॉलेजला आहे. आईने मारले, काका ओरडले की लगेच बाबांना फोन करतात आणि रडतात. त्यांच्या छोटय़ा-छोटय़ा गरजा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांच्या आनंदाच्या वेळी मी त्यांच्यासोबतच असण्याचा प्रयत्न करत असतो. पण सगळ्याच वेळी ते शक्य होत नाही. पण त्यांच्या आनंदाच्या वेळी त्यांच्यासोबत राहण्याचा माझा प्रयत्न असतो. मी जेव्हा घरी असतो तेव्हा मुलं शाळेत असतात आणि त्यांना सुट्टी असते तेव्हा मी शूटिंगमध्ये असतो. मग काही वेळा त्यांना मीच पिकनिकला जाण्याचा सल्ला देतो आणि त्यांचे फोटो पाहून समाधान मानतो.

नाटक, चित्रपट, मालिका करताना वेळ मिळतच नाही. पण एखादा दिवस मिळाला बाहेर जाण्यापेक्षा घरीच मुलांना वेळ देणं पसंत करतो, कारण बाहेर गेल्यावर सगळ्यांसोबत फोटो काढण्यातच अर्धा वेळ निघून जातो आणि मुलांना वेळच देता येत नाही. त्यापेक्षा घरी राहणं पसंत करतो. खाली गार्डनमध्ये मुलांना नेतो. त्यांच्या शाळेतील महत्त्वाच्या दिवसांमध्ये हजेरी लावता येत नाही त्याचे कधीतरी वाईटही वाटते. मुलांचे चांगले क्षण गमावल्याचे दुःखही वाटते पण मी त्यांच्या भविष्याच्या तरतुदीसाठीच धडपडतोय हे त्यांनाही आता कळायला लागले आहे.

सगळी कामं करत असताना खूप दमलेला असतो,  पण घरी आल्यावर मुलांना पाहिले की तो शीण निघून गेलेला असतो. घरी आल्यावर बायकोकडून जेव्हा त्यांची प्रगती ऐकायला मिळते तेव्हा वेगळा आनंद असतो.

मला वाटतं माझ्या मुलांनी खूप शिकावे, त्यांना आवडेल त्या क्षेत्रात काम करावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्यांनी कोणावर अवलंबून राहू नये इथपर्यंत त्यांनी सक्षम व्हावे एवढीच माझी इच्छा आहे.

अलीकडे फोटोचे वेड अनेकांना लागलेले आहे. खरे चाहते असतात ते भेटल्यावर कामाचे कौतुक करतात. फोटो वगैरे मागत नाहीत. पण अलीकडे रस्त्यात भेटणारी माणसे केवळ कलाकार म्हणून फोटोसाठी येत असतात. फोटो काढायचा आणि फेसबुकवर अपलोड करायचा त्यांना फोटो हवा असतो. मुळात ही माणसे आपल्या कलाकाराचे कार्यक्रम किती पाहतात हे महत्त्वाचे असते. पण लहान मुलांना मी फोटो देतो. ती निरागस असतात.