मराठी चित्रपटांना कोकणची ‘हाक’, १२ मे रोजी प्रदर्शित

सामना ऑनलाईन, संगमेश्वर

कोकणच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ केवळ देश-विदेशातील पर्यटकांनाच आहे असं नव्हे, तर मराठी चित्रपट कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांनादेखील कोकणचे सौंदर्य नेहमी साद घालते. कलाकार अरुण नलावडे आणि दिग्दर्शक रमेश मोरे यांच्या कल्पकतेतून साकारलेला ‘हाक’ हा चित्रपट १२ मे रोजी प्रदर्शित होत असून कोकणातील कलाकारांना अभिनयाची संधी उपलब्ध करून देणारा हा चित्रपट पूर्णतः रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यात चित्रीत झाला आहे.

अंजली नलावडे निर्मित हाक या चित्रपटात अरुण नलावडे, ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त, सुहासिनी देशपांडे, अनिल गवस, नीता गोखले, वरुण उपाध्याय, अशोक परब याबरोबरच कोकणातील प्रथितयश कलाकार डॉ. भगवान नारकर, अनुराधा नारकर, लांजाचे अमोल रेडीज, शेखर जोशी, श्रीकांत पाटील, शरद चव्हाण, मंगेश डोंगरे, डॉ. अश्विनी नारकर आणि बालकलाकार अपूर्व खातू यांनी आपल्या भूमिका सादर केल्या आहेत. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त निर्माते, दिग्दर्शक रमेश मोरे यांनी कोकणची सांस्कृतिक परंपरा असलेल्या ‘नमन’ या ग्रामीण तरीही लोकप्रियतेच्या अफाट शिखरावर असणाऱया नृत्याविष्कारावर नुकताच एक लघुपट तयार केला असून तोदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

अरुण नलावडे म्हणाले की, कोकणचे ग्रामीण जीवन साधे तरीही नीटनेटके आणि अगत्याचे असल्याने कोकणात विशेषतः ग्रामीण भागात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचे आम्ही ठरवले. कोकणातील कलाकारांकडे मुळातच अभिनयाची उत्तम कला असल्याने येथील कलाकारांनाही आपला अभिनय सादर करण्याची संधी मिळावी अशी आमची मनोमन इच्छा होती. कोकणातील जवळपास १५ पेक्षा अधिक कलाकारांना या चित्रपटात अभिनयाची संधी देण्यात आली आहे. डॉ. भगवान नारकर, अमोल रेडिज यांच्या उत्तम अभिनयासह बालकलाकार अपूर्व खातू याचे अरुण नलावडे यांनी विशेष कौतुक केले. ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त हे ‘हाक’ चित्रपटात विशेष भूमिका करीत असून त्यांची ही भूमिका हे या चित्रपटाचे खास वैशिष्टय़ असल्याचे निर्मात्या अंजली नलावडे यांनी सांगितले. हा चित्रपट कोकणवासीयांच्या मनात तर घर करणारच आहे, मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षक ‘हाक’च्या प्रेमात पडेल असा विश्वास अरुण नलावडे यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या