आता आयपीएल फायनलची ‘कॉमेंट्री’ ऐका मराठीत

51

सामना ऑनलाईन । मुंबई

आयपीएलची फायनल कोण खेळणार याची उत्सुकता सगळ्या क्रीडा रसिकांना लागली आहे. मंगळवारी मुंबईत होणाऱ्या सामन्यानंतर फायनलमधील एका संघाचे नाव फिक्स होणार आहे. अवघ्या जगभरातील क्रीडा रसिकांचे लक्ष्य लागून असलेल्या आयपीएल फायनलची (२७ मे) ‘कॉमेंट्री’ मराठीमध्ये ऐकण्याची संधी प्रेक्षकांना असणार आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत ही कॉमेंट्री ऐकण्याची संधी प्रेक्षकांना आहे.

आतापर्यंत आयपीएलच्या चाहत्यांना हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, बंगाली आणि कन्नड भाषेमध्ये सामन्याची कॉमेंट्री ऐकण्याची संधी मिळाली होती. हिंदुस्थानातील तळागाळाच्या चाहत्यापर्यंत पोहचण्यासाठी स्टार प्रवाह आणि आशियाई मूव्हीज चॅनलद्वारे मराठी आणि मल्याळममध्ये आयपीएल सामन्यांची कॉमेंट्री या दोन भाषेंमध्येही सुरू करण्याची तयारी केली आहे. ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर आयपीएल २०१८ चा २७ मे रोजी होणारा अंतिम सामना क्रीडा रसिकांना पाहता येणार आहे.

विशेष म्हणजे अंतिम सामन्याच्या आधी होणाऱ्या खास कार्यक्रमात माधुरी दीक्षित आणि अभिनेता स्वप्नील जोशी सहभागी होणार आहेत. त्यानंतर मराठी कॉमेंट्रीसह अंतिम सामन्याचा आनंद घेता येईल. संदीप पाटील, सुनंदन लेले आणि चंद्रकांत पंडीत यांच्या खुमासदार शैलीने अंतिम सामन्याची रंगत वाढणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या