स्वागत दिवाळी अंकांचे – १३

श्री दीपलक्ष्मी

मान्यवरांचे दर्जेदार साहित्य असलेला हा दिवाळी अंक यंदाही कथांचे विविध प्रकार, ललित लेख, आठवणी, व्यक्तिचित्रण आदी भरगच्च मजकूर घेऊन प्रकाशित झाला आहे. एअर इंडियाच्या खासगीकरणाने कोणते परिणाम होतील याचा सविस्तर आढावा घेणारा संजीव पाध्ये यांचा ‘झाले मोकळे आकाश’ माहितीपूर्ण लेख व कॅडबरी चॉकलेटचा इतिहास सांगणारा शशिकांत सावंत यांचा ‘एक स्वीट स्टोरी’ हा लेख वैशिष्टय़पूर्ण झाला आहे. ५०-६० वर्षांपूर्वी करमणुकीचा सर्वोत्तम आनंद देणारी ‘सर्कस’ यावर श्रीकांत मुंदरगी यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे. याशिवाय अमेरिकेतील तीन व्हाईट हाऊसेस (डॉ. अनंत लाभसेटवर), पत्रकारितेतील आठवणी (दिलीप चावरे), टी.व्ही- एक मोहजाल (अपर्णा पाडगावकर), मधु मंगेश कर्णिक यांच्या कारकीर्दीचा रविप्रकाश कुळकर्णी यांनी घेतलेला आढावा हे विशेष उल्लेखनीय लेख आहेत. याशिवाय गूढकथा-पु. रा. रामदासी, दीर्घ कथा-गुरुनाथ तेंडुलकर, प्रदीर्घ कादंबरी- पंकज कुरुलकर, व्यंगकथा (ह. मो. मराठे) वाचनीय आहेत. संपादक : हेमंत रायकर मूल्य : ३००/-, पृष्ठे : ३२०.

देवदुर्ग
यंदाच्या या दिवाळी अंकातील कालाय तस्मै नमः (यशवंत कोले), आजचे विद्यार्थी जीवन (डॉ. आर. एम. पोकळे), आचऱ्यातील पारंपरिक जन्माष्टमी (प्रमोद कांदळगावकर), कागदविरहित कार्यालय (डॉ. सुधीर रशिंगकर), माहितीचा अधिकार (डॉ. श्रीनिवास जोशी), कोकणातील गाबित शिमगोत्सव (आनंद लोके), भविष्यावर बोलू काही (अर्पिता सनये), परात्पर गुरू डॉ.आठवले (भाग्यश्री खाडिलकर), स्वातंत्र्यदेवता (बॅ. शरद पालव) आदी लेख वाचनीय आहेत. याशिवाय जयपाल पाटील, मंदाकिनी गोडसे, मिलिंद जामसंडेकर, अनंत दाभोळकर, मंगला घाडी, दिवाकर मोरजकर, शरद अत्रे, हर्षिता रेडकर आदींच्या कविताही आहेत. गजानन महाराजांचे प्रसन्न मुखपृष्ठ अंकाला उठाव देणारे. संपादक : आनंद लोके मूल्य : १००/-, पृष्ठे : १३१.

धगधगती मुंबई
धारावीचा विकास – संजय शिंदे, तरच अच्छे दिन… डॉ. शांताराम कारंडे, टी. एन. शेषन – योगेश त्रिवेदी, शैक्षणिक धोरणात बदल – दिलीप जाधव, राजर्षी शाहू महाराज – अशोक सुतार, एक पत्रकार – नीलेश बामणे, मराठमोळी नऊवारी – प्रमोद तरळ, मुंबई विद्यापीठाचे निकाल – अनंत दाभोळकर, देशाची अर्थव्यवस्था – अशोक सुतार, प्रियदर्शनी इंदिराजी – दादासाहेब शिंदे, मुंबईकरांना सलाम – विष्णू लिंगायत आदी या अंकातील लेख उल्लेखनीय आहेत. संपादक : भीमराव धुळप  मूल्य : ८०/-, पृष्ठे : ९६.

चौफेर साक्षीदार
या अंकात पत्रकारितेचं विद्यापीठ – योगेश बंडाळे, समर्थांची निर्भीड विनोदी रचना – नामदेव सदावर्ते, गुरुशिष्य परंपरा – सुहासिनी वनमाळी, मिशन कारगील – मीना कर्नाटकी, रंजनाची प्रतिमा – शशिकांत काळे, कला कोल्हाटीण – अरुण सावळेकर, व्यासंगी संपादक गोविंद तळवलकर – वामन देशपांडे, अग्रलेखाबाहेरचे गोविंदराव – गिरीश कुबेर, तुझ्याचसाठी रं बळीराजा – योगेश त्रिवेदी आदी विविध विषयांवरील लेख वाचनीय आहेत. कविता विभाग शशिकांत काळे, वृषाली आठल्ये, निर्मला देशपांडे, राम मोरे, शाहीर कुंदन कांबळे आदी कवींनी सजवला आहे. संपादक : सत्यवान तेटांबे मूल्य : १८०/-, पृष्ठे : २७२.

साहित्यरंजन
विनोदी मुखपृष्ठापासून विनोदी साहित्याची रेलचेल असलेल्या या अंकात विनोदी कथा, लेख, कविता, एकांकिका असा भरगच्च मजकूर आहे. दत्तू बांदेकर, प्रा. विठ्ठल सदामते, निर्मला मठपती, रेखा नाबर, मधुकर गोलामडे, व्यंकटेश बोर्गीकर, ह. शि. खरात, डॉ. सुभाष नाईक, सुरेश देहेरकर, प्रकाश सैंदाणे आदींच्या २५ हून अधिक कथा, लेख आहेत. चिंतामण देशपांडे यांचे सविस्तर वार्षिक राशीभविष्य दिले आहे. संपादक : सत्यवान तेटांबे, मूल्य : १५०/-, पृष्ठ : १६०.

सिने नाट्य
सिनेमा-नाट्य जगताशी संबंधित अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारे मान्यवरांचे लेख हे या दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य यात रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शनवरील एक जाणता कलाकार डॉ. मोहन आगाशे, प्रा. नंदकुमार कुलथे, अभिनयनिपुण नृत्यांगना वैजयंतीमाला – प्रकाश सरदेसाई, मराठी चित्रपट एकांकिका होतोय! – ह. शि. खरात, लावणीसम्राज्ञी – शेखर जोशी, गिरीश कर्नाड – प्रा. रूपा शहा, साहित्य समीक्षक प्रा. वि. शं. चौघुले, पंढरीनाथ तामोरे, मराठी सिनेमातील बालगीते – श्रीकांत नरूले हे लेख वाचनीय आहेत. याव्यतिरिक्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – माधवी पोफळे, जिम्नॅस्टिक आणि नृत्य – फुलवा खामकर, मी फिट आणि फाईन – उज्ज्वला जोग हे लेखकही आहेत. संपादक : सत्यवान तेटांबे, मूल्य : १५०/-, पृष्ठे : १२८.

साभार पोच
शहर टाइम्स
संपादक : प्रकाश नागणे मूल्य : १००/-, पृष्ठे : ७२