मऱ्हाठी साज, मऱ्हाठी बाज!

>>ज्योत्स्ना गाडगीळ

‘‘मराठी आहे, मराठीतच बोलणार,

नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार!’’

हा संदेश ३१ डिसेंबरला सोशल मीडियावर फिरत होता. संदेश वाचून मराठी मनाला उभारी आली. पण दुसऱ्यांचा हिरमोड कसा करायचा, म्हणून ३१ डिसेंबरच्या रात्री जागून इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत करणारी आजची पिढी नव्या उत्साहाने आता हिंदू नववर्षाच्या स्वागतालाही सिद्ध झाली आहे. भव्य शोभायात्रा, स्वागतयात्रांचे सूचना फलक मुंबईच्या गल्लीगल्लीतून, चौकाचौकातून झळकू लागले आहेत. मोकळ्या मैदानात ढोल-ताश्यांचे पडघम कानावर पडू लागले आहेत. सोशल मीडियावर ‘फिलिंग एक्सायटेड फॉर शोभायात्रा’ असे इंग्लिश संदेश फिरू लागले आहेत. एकूणच काय, तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबापुरी आणि मुंबईकर सज्ज झाले आहेत.

गेल्या वीस वर्षांपासून गुढीपाडवा आणि शोभायात्रा हे नवीन समीकरण मुंबईत रुजू झाले आहे. ह्यापूर्वी गुढीपाडव्याला मराठमोळ्या घरांत गुढी उभारली जायची, श्रीखंड-पुरीचे जेवण केले जायचे, नवीन वस्तूंची खरेदी केली जायची, तसेच चैत्रोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी केली जायची. ह्याउपर गुढीपाडव्याच्या दिवशी काही विशेष घडल्याचे आठवत नाही. मात्र आताचा काळ ‘सेलिब्रेशन’चा आहे. लोक उठसूट कसल्याही शुभेच्छा पाठवत असतात. व्हॉट्स ऍपवर अगदी ‘शिवरात्री’च्या शुभेच्छांचेही संदेश फिरले! म्हणजेच काय, कोणताही दिवस ‘साजरा’ करण्याकडे लोकांचा कल असल्याचे दिसू लागले आहे. त्यात गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक! हिंदू नवीन वर्षाची सुरुवात, मग शुभेच्छा आल्याच! ‘मांगल्याचे तोरण, झेंडुची फुले…’ वगैरे वगैरे काव्यात्मक संदेश त्या दिवशी एकमेकांना पाठवले जातात. एकवेळ दाराला तोरण आणि खिडकीत किंवा अंगणात गुढी उभी राहिली नाही, तरी ‘नेटकरां’ची गुढी सोशल मीडियावर सर्वप्रथम उभारली जाते. अशा ह्या वातावरणात एखाद्याचा उत्साह नसला, तरी त्यालाही राहून राहून ह्या ‘सेलिब्रेशन’चा एक भाग व्हावेसे वाटते. आणि ह्या वाटण्यातून (‘फीलिंग’मधून) गुढीपाडवा सणाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली.

नववर्षाच्या निमित्ताने शोभायात्रेचा पायंडा पडला तो १९९९ मध्ये. त्यावर्षी डोंबिवलीच्या गणेश मंदिराचा हीरक महोत्सव होता. त्यानिमित्त मंदिराचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक आबासाहेब पटवारी ह्यांनी शोभायात्रेची संकल्पना मांडली. समितीच्या सदस्यांच्या पुढाकाराने, सामाजिक संस्थांच्या हातभाराने तसेच तरुणांच्या सहभागाने पहिली शोभायात्रा दिमाखात निघाली. ढोल-ताशे-लेझिमच्या ठेक्यात पारंपरिक वेशभूषा केलेले मराठी बांधव भगवा झेंडा उंचावत शोभायात्रेत सहभागी झाल़े तो सोहळा एवढा नेत्रदीपक ठरला, की तिथून पुढे दरवर्षी शोभायात्रा काढायची असा नेमच झाला. डोंबिवलीकरांचा आदर्श घेऊन मुंबई परिसरात ठिकठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रेची सुरुवात झाली. आता ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापुर, दादर, गिरगाव, मुलुंड, बोरिवली, दहिसर, वसई, विरार, सफाळे, डहाणू अशा अनेक भागांतून दरवर्षी शोभायात्रा निघते.

शोभायात्रेमुळे हिंदू नववर्षाचा प्रचार :

इतकी वर्षे गुढीपाडवा मराठी घरांत साजरा होत होता. शोभायात्रांमुळे हा सण सार्वजनिक झाला आहे. अमराठी लोकांनाही गुढीपाडवा हिंदूंसाठी महत्त्वाचा सण असल्याची जाणीव होऊ लागली आहे. शोभायात्रा बघण्यासाठी अनेक अमराठी लोकही गर्दीत हजेरी लावतात. त्या चैतन्यमय सोहळ्याचे फोटो काढतात. शुभेच्छा देतात. मराठी माणसाचा मराठी साज, पेहराव बघतात. शोभायात्रेत त्यांना शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक इ. मराठी संस्कृतीला वळण देणाऱ्या थोर पुरुषांची प्रतिमा एकत्रित बघायला मिळते. मराठी माणसाला त्यांच्याबद्दल असलेला आदर बघायला मिळतो. त्यांच्या जयघोषात अमराठी माणूसही आपसुक जयजयकार करू लागतो. ह्या सर्व बाबींमुळे मराठी संस्कृतीशी मराठी तरुणांची आणि अमराठी लोकांचीही नाळ जोडली जाते.

शोभायात्रेमुळे संघटन

एरवी संघटित न होणारा मराठी माणूस उत्सवासाठी राग-लोभ विसरून एकत्र येतो, हा इतिहास आहे. हे लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. तेच संघटन ह्या शोभायात्रांमध्ये बघायला मिळते. अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, कला-क्रीडा संस्था शोभायात्रेत सहभागी होतात. सामाजिक संस्थांतर्फे ‘पाणी वाचवा’, ‘वृक्षसंवर्धन’, ‘स्त्री संरक्षण’ इ. विषयांबद्दल जनजागृती केली जाते. राजकीय पक्षांकडून अर्थसहाय्य केले जाते. धार्मिक संस्थांकडून भजन-कीर्तन सादर करून शोभायात्रेची शोभा वाढवली जाते. शैक्षणिक संस्थांतर्फे शालेय मुलांना ढोल-ताशांचे-लेझिमचे प्रशिक्षण दिले जाते. शालेय गणवेशातले विद्यार्थी मोठ्या माणसांच्या बरोबरीने शोभायात्रेत सहभागी होऊन आपल्या शिस्तबद्ध सादरीकरणातून आपले वेगळेपण दाखवून देतात. अनेक कलापथके सुंदर, आकर्षक, प्रबोधन, जनजागृती करणारे फलक तयार करतात. ‘संस्कार भारती’तर्फे गालिचा रांगोळी काढून शोभायात्रेचा मार्ग सजवला जातो. मल्लखांब, दांडपट्टा, तलवार, भाला यांचे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी आपल्या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपराही शोभायात्रेत दाखवून देतात. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या संघटना आणि पर्यायाने वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी शोभायात्रेच्या निमित्ताने परस्परांशी जोडली जातात.

ढोल-ताशे-लेझीम आणि रांगोळ्या…

पूर्वी लग्न-कार्यात मिरवणुकीत वाजवले जाणारे ढोलताशे ही मुळात रणवाद्य म्हणून ओळखली जाणारी वाद्ये शोभायात्रेत वीरश्री निर्माण करण्याचे काम करतात. गणेशोत्सवात तसेच लग्नाच्या मिरवणुकीत ह्याच ढोलताशांवर बँजो वाजवून चालणारा धांगडधिंगा सहन करावा लागतो. मात्र गुढीपाडव्याला शोभायात्रेत ढोल पथकांतर्फे होणारे सादरीकरण अतिशय शिस्तबद्ध असते. ढोलवादनासाठी आजवर पुणे आणि नाशिक ढोल पथकांची ख्याती होती. मात्र मुंबईकरांनीही आता ढोलवादनात ‘मास्टरी’ मिळवली आहे. त्यासाठी ह्या वादकांचा महिनाभर आधी सराव चालते. शाळा, महाविद्यालय, नोकरी, प्रपंच सांभाळून अनेक उत्साही मंडळी सरावसत्राला वेळेत उपस्थित असतात. काटकुळी शरीरयष्टीची मंडळीही कमरेला ढोल बांधून सर्व ताकदीनिशी ढोलावर थाप देताना दिसतात. त्या सर्वांनी घाम गाळून केलेल्या मेहनतीचे फलित म्हणजे, शोभायात्रेत त्यांची कामगिरी भल्याभल्यांना ठेका धरायला लावते.

जशी ढोल-पथकांची तयारी चालते, तसाच रांगोळ्यांचाही सराव सुरू होतो. संस्कार भारती रांगोळी, गालिचा रांगोळी काढणारा ‘रंगावली’सारखा कलासंच महिनाभर रांगोळ्यांचा सराव करतो. शिबिरे भरवतो, कलाकार घडवतो. दाराबाहेर दोन बोटे रांगोळी काढण्याचीही उसंत नसणारे मुंबईकर शोभायात्रेच्या निमित्ताने रस्त्यांवर मुठीने सुबक रांगोळी घालताना दिसतात. विविध रंगांची उधळण करतात. वेगवेगळी नक्षी काढून रांगोळी सुशोभित करतात. डोंबिवलीच्या ‘रंगावली’ परिवाराने तर आजवर गालिचा रांगोळीचे एकापेक्षा एक विक्रम रचले आहेत. त्यांची रांगोळी शोभायात्रेचा मार्गच नाही, तर भव्य पटांगणेही सुशोभित करते. ७५ फुटांची, ८० फुटांची, ११० फुटांची भव्य रांगोळी बघणाऱयाला मंत्रमुग्ध करते. त्यांच्या ह्या उपक्रमामुळे आपली सांस्कृतिक ठेव जपली जात आहे, तसेच नवनवे कलाकार त्यातून घडत आहेत.

आबालवृद्धांचा सहभाग

शोभायात्रेत सर्व वयोगटातील मंडळी सहभागी होतात. अनेक हौशी बालकलाकार शिवाजी महाराजांचा, लोकमान्य टिळकांचा, झाशीच्या राणीचा, भारतमातेचा, श्रीरामाचा पेहराव करून शोभायात्रेत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात. ढोलपथकात सहभागी झालेली मुले-मुली पांढरा सदरा-लेंगा आणि भगवा फेटा बांधून ढोलवादनात सहभागी होतात. कपाळावर ठळक लाल गंध किंवा चंद्रकोर, हातात-गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, हाताला गुंडाळलेले उपरणे आणि गळ्यात अडकवलेला आणि कमरेला बांधलेला ढोल असा ह्या ढोलपथकाचा पेहराव असतो.

एरव्ही पाचवारी साडीत कम्फर्टेबल वाटत नाही असे म्हणणाऱ्या मुली चक्क नऊवारी साडी नेसून शोभायात्रेत सहभागी होतात. त्यांनी केलेला मराठमोळा साज आणि मराठमोळा बाज आपल्या मराठी संस्कृतीचे दर्शन घडवतो. नथ, ठुशी, हार, मोहनमाळ, तोडे, वाकी, बाजूबंद, बांगड्या, पाटल्या, कानातले, मोत्यांचे वेल, केसांचा खोपा त्यावर मोगऱ्याचा गजरा, पायात पैंजण आणि काठापदराची नऊवारी असा बायका-मुलींचा वेश पाहता मुंबईच्या रस्त्यांवर पेशवाई अवतीर्ण झाल्यासारखी वाटते. तेवढे कमी म्हणून की काय, ह्या सगळ्या जणी स्कूटर, बाईकवरच नाही तर रॉयल एनफिल्डसारख्या बोजड गाडय़ांवर स्वार होऊन रणरागिणीसारख्या शोभायात्रेत सामील होतात. कोणाच्या हातात झेंडा, कोणाच्या हाती लेझिम, कोणाच्या हाती टाळ तर कोणाच्या हाती फोटोग्राफीसाठी, शूटिंगसाठी मोठमोठय़ा लेन्सचा कॅमेरा असतो. ह्या सगळ्या बिनधास्त मुली न लाजता नाचत-गात शोभायात्रेचा आनंद घेतात. ढोल-ताशावर पदन्यास करतात, फुगड्या घालतात, जयघोष करतात आणि हिंदू धर्माचा ध्वज उंचावत शोभायात्रेचे नेतृत्व करतात. स्त्रीयांच्या अशा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आधुनिक, स्वावलंबी आणि कर्तृत्ववान स्त्रीयांचे शोभायात्रेतून दर्शन घडते.

तीच बाब पुरुषांची! ३१ डिसेंबरच्या रात्री मदहोश होऊन नाचणारा तरुण शोभायात्रेत शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवून, कपाळावर गंध लावून ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या आवेशपूर्ण घोषणा देतो. तसेच, शोभायात्रेचे शिस्तबद्ध नियोजन करत असताना कुठेही दगा-फटका होऊ नये याची काळजी घेत जबाबदारीने वावरतो, तेव्हा मराठी संस्कृतीची परंपरा सांभाळण्यासाठी आजचा मराठी तरुण सक्षम आहे, ह्याची जाणीव होते

प्रसार माध्यमांचा सहभाग

‘जिथे तरुणांची गर्दी, तिथे मीडियाचे दर्दी’ असा सध्याचा प्रकार आहे. प्रसार माध्यमांना दिलखेचक बातम्या हव्या असतात. अशा वेळी ‘तरुण’ हे मीडियाचे टार्गेट असते. शोभायात्रेच्या निमित्ताने एकगठ्ठा जमणारे तरुण म्हणजे प्रसार माध्यमांसाठी पर्वणी! चैतन्यमय सोहळ्याचे प्रक्षेपण, वृत्तांकन, फोटो, व्हिडीओ शूट ह्या प्रसार आणि प्रचारामुळे शोभायात्रांचा मोठ्या प्रमाणात बोलबाला झाला. तरी अजून मुंबईबाहेर शोभायात्रेचे लोण पसरले नाही, एकदा का महाराष्ट्राच्या विविध भागात शोभायात्रा निघण्यास सुरुवात झाली, की परदेशातील महाराष्ट्र मंडळांतूनही शोभायात्रा निघण्यास सुरुवात होईल. प्रसारमाध्यमांमुळे शोभायात्रेला ग्लॅमर आले आहे. म्हणून सिनेसृष्टीतली अनेक मंडळीदेखील गिरगाव, दादर, विलेपार्ले, अंधेरी येथील शोभायात्रांमध्ये हिरीरीने सहभागी होताना दिसतात. ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे, एक चांगली परंपरा देश-विदेशात पोहोचवली जात आहे.

सोशल मीडिया

मीडियाच्या बरोबरीने सोशल मीडियादेखील प्रसार माध्यमातील प्रभावी माध्यम बनले आहे. गेल्या काही दिवसांपासून फेसबुक वॉलवर शोभायात्रेसंबंधी पोस्ट झळकत आहेत. ढोल-ताशा पथकातील सरावसत्र फेसबुक-ट्विटर-इन्स्टाग्रामवर अपलोड करून अनेकांनी प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली आहे. गुढीपाडव्याचे संदेश, आकर्षक गुढ्यांची छायाचित्रे आणि शोभायात्रेचे लाईव्ह अपडेट्स ह्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सोशल मीडियावर मराठमोळे वातावरण निर्माण होणार हे नक्की! त्या निमित्ताने गुगलवर मोठ्या प्रमाणात मराठीतून शोध (सर्च) घेतले जातील, मराठी फॉण्ट किंवा युनिकोड वापरून मराठीतून कमेंट्स दिल्या जातील, मराठी संदेशांची देवाण-घेवाण केली जाईल आणि या सर्वांमुळे मराठी माणसाचे मराठी भाषेशी आणि मराठी संस्कृतीशी नाते आणखी दृढ होईल.

गुढीपाडव्याचे महत्त्व आणि समजुती

चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडका साडेतीन मुहूर्तापैकी एक मनाला जातो. रामाने राकणाचा बीमोड करून अयोध्येत प्रकेश केला तो हा दिकस. किजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. मात्र जल्लोषाने शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या आपल्या सर्व मराठी तरुणांना हे माहीत असेलच असे नाही. अर्थात ह्यात त्यांचाही दोष नाही. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या अनेक मराठी तरुणांना आजही गुढीपाडका हे आपले नककर्ष की किजयादशमी हा विचार गोंधळून टाकतो. गुढीपाडक्याला चैत्राची चाहूल लागते, चैत्र पालकी फुटते, चैत्रोत्सक सुरू होतो. आता काही जणांना चैत्राची चाहूल म्हणजे काय, असे किचारल्याकर, त्यांना तो मराठी चॅनेलचा शो असाका असे वाटू शकते! तर कोणाला गुढीपाडका म्हणजे ‘मे बी इट्स रिलेटेड टू गुडीज्’ अर्थात गुडीज् म्हणजे छानछान भेटकस्तू देण्याचा सणही वाटू शकतो. तर कोणाला गुढीपाडका म्हणजे गुड (चांगल्या) लोकांचा पाडका म्हणून गुढीपाडका असाही समज होऊ शकतो. शोभायात्रेमुळे तरुणांचे कुतूहल वाढते. मात्र शोभायात्रेतील विविध उपक्रमांमुळे त्यांना ह्या संस्कृतीची पार्श्वभूमी कळते, अर्थ उमगतो आणि तो कळल्यावर शोभायात्रेत सहभागी होण्याचा उत्साह द्विगुणित होतो.

शोभायात्रेच्या निमित्ताने गुढीपाडव्याचे महत्त्व वाढले आहे, मराठी संस्कृतीचे महत्त्व वाढले आहे. त्याबरोबरीने महाराष्ट्राचे वैभव, मराठी साज आणि बाज लोकांसमोर येण्यास मदत झाली आहे.