सण – उत्सवांचं मराठी वर्ष!

चकोट

काय नाना, मराठी नववर्षात म्हणजे चैत्रात कोणते नवे संकल्प सुरू करणार आहात?

– आता या वयात कसले संकल्प करणार! पण मराठी वर्षात मराठीला चांगले दिवस येऊद्या एवढंच आपण फार तर म्हणू. आजच्या मुलांना मराठी महिन्यांची नावंही धड माहीत नसतात. विचारा त्यांना चैत्र, वैषाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण भाद्रपद… नीट सांगता येतील की नाही शंका वाटते.

– त्यापेक्षा इंग्रजी महिन्यांची, वारांची नावं विचारा धडाधड सांगतील.

– अहो, आज इंग्रजी आपल्या देशात इतकं रुळलंय की कोणतेही वाक्य बोलताना त्यात इंग्रजी शब्द अपरिहार्यपणे येतातच. काही मराठी शब्दांपेक्षा त्यांच्या काही शब्दातून ते पटकन सांगता येतं. तसेच मराठीतही असे काही शब्द आहेत की तिथे इंग्रजी शब्दांची मात्रा चालू शकत नाही. शब्द कोणत्याही भाषेतील असो, त्या शब्दांत जर आपले विचार दुसऱ्याला सांगण्याची ताकद असेल तर ते शब्द वापरण्यास हरकत नसावी, असे मला वाटते. उगाच भाषाभेद करून कोणत्याही शब्दांचा वृथा अभिमान धरू नये, असं मला वाटतं.

– तुमचं म्हणणं अगदीच चुकीचं नाही. इंग्रजीतील ‘टेबल’ मराठीत जसेच्या तसं आलं. त्याला मराठी प्रतिशब्द शोधण्यात अर्थ नाही. आता अनेक मराठी शब्द इंग्रजीत नव्हे तर जागतिक भाषेच्या कोशात स्थान पटकावून बसलेत. त्या त्या शब्दाला त्या त्या संस्कृतीचा वास असतो. पण काही शब्द कोणत्याही भाषेत अगदी फिट्ट जाऊन बसतात. तिथे संस्कृतीच्या नावाने बोंब मारण्यात अर्थ नाही.

– हे मात्र खरं. तरीही मराठी नववर्षातील सणांची मजा काही औरच. ती हिंदुस्थानी संस्कृतीशी निगडीत आहे. आपली संस्कृती शेतीप्रधान देशातील आहे. त्यामुळे आपले मराठी सणही शेतकरी ज्या उत्साहाने आणि आपुलकीने साजरे करतात, तो जिव्हाळा शहरी संस्कृतीत आढळत नाही. शहरात जास्त करून उत्सवाची धामधूम करण्यावर आणि बाह्य दिखावटीवर अधिक भर असतो. तरुण पिढीचा उत्साह अगदी ओसंडून वाहात असतो. ग्रामीण भागात उत्सवाचा तेवढा धूमधडाका नसतो. पण उत्सवाचं खरं महत्त्व तेच लोक जाणतात. आपण कुठल्याही उत्सवाचं मार्केटिंग करतो. त्या अनुषंगाने मग उत्सवाचं स्वरूप पालटत जातं.

– याबाबतीत महाकवी कालिदासाने काय म्हटलंय ते माहीत आहे का? तो म्हणतो, ‘उत्सवप्रिय खलु मनुष्यः’ सण-उत्सवातून आपली संस्कृती साकार होते. संस्कृती म्हणजे राष्ट्रांचा चेहरा. आपल्या हिंदुस्थानात दर महिन्यात जे सण उत्सव येतात ते बहुतांशी त्या महिन्यात, ऋतुत असणाऱया हवामानाला चालीरीतींना पौराणिक कक्षांना, येणाऱया पीक-पाण्याला धरून नटविले, सजविले जातात. अशा तऱ्हेने विचारप्रणाली व जीवनप्रणालीच्या धारेत वाहत जाणाऱ्या सण, उत्सवांचे बोट धरून, त्यांना कवेत घेऊन शक्तिप्रधान हिंदुस्थानी संस्कृती अजून ताठ मानेने उभी आहे. या सर्व सण-उत्सवात आपल्या कृषी-ग्रामीण संस्कृतीचा सिंहाचा वाटा आहे, हे मान्यच करावे लागेल.

– मला वाटतं, सण म्हणजे आनंदाचा सहजसुंदर क्षण होय. संगीतातील स्वर, लय, ताल, नाट्यरूपातील अभिनय, चित्रातील आकार, नृत्यातील आकृतिबंध, शिल्पातील भाव, काव्य व साहित्यातील शब्द व आशय या सर्वांना एकत्रित करून सण, उत्सव उजळत व उक्रांत होत गेले आहेत.

– हल्लीच्या शुष्क, रुक्ष व यांत्रिकी जीवन यांच्याखाली दबून गेलेल्या माणसाला सणामुळे मुक्त श्वास घेऊन एक अकृत्रिम मोकळेपणा मिळतो. तो बघितल्यावर सण-उत्सव आपल्याला मिळालेला ऑक्सिजन आहे असं वाटतं. मात्र त्यात प्रदूषण होऊ नये म्हणून आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे.

– आपण समाजात वावरत असताना आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या चालीरीती आणि त्यावर बेतलेले सारे सण यात ग्रामीण लोकजीवनाची गुंफण पाहायला मिळते. भारतीय सण-उत्सवांतून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक जबाबदारी आणि नव्या पिढीला चांगल्या संस्काराचं देणं मिळत राहाते. आपल्याकडील बहुतेक सगळे सण शेतीची निगडीत असल्याचे आपल्याला आढळेल. शेतीच्या चक्राशी त्याची बांधणी झालेली लक्षात येईल. पेरणीपासून काढणीपर्यंत त्यातील प्रत्येक टप्प्यावर तो तो सण येतो. शेतातील धान्यापासून ते आगाडी-हराळीपर्यंत आणि थंडीपासून पावसापर्यंत प्रत्येक सणांची रचना केलेली आढळते. यामध्ये अनेक गोष्टी साध्य झालेल्या दिसतात. आपलं आरोग्य, सामाजिक भान, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव वृद्धिंगत करण्याचे महत्त्वाचं काम या सणांच्या माध्यमातून होतं. या साऱ्याला शेकडो वर्षांची परंपराही आहे.

– म्हणून तर म्हणतात की, हिंदुस्थान हा सणांचा आणि उत्सवांचा देश आहे. प्रत्येक प्रांतानुसार सणांचं स्वरूप व ते साजरे करण्याच्या पद्धतीत बदल आहेत, पण त्या सर्वांचा आत्मा एकच आहे. जातीपातीच्या भिंती तोडून एकमेकांच्या सणांमध्ये शुभेच्छा देण्यासाठी लोक जातात, गळाभेटी घेतात, गोडधोड खाऊ घालतात. यातून आपल्यातील स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा मनोमन प्रयत्न केला जातो.

– आपल्याकडील प्रत्येक सण आपल्याला नवा उत्साह देऊन जातो. त्यामुळे नवी उमेद मिळते आणि जगण्याचे बळ सतत मिळत राहतं. म्हणूनच या सणांचं महत्त्व अधिक आहे. मराठी महिन्यापासून विविध तिथी ते कॅलेंडरमधील तारखांपर्यंत अशा पद्धतीने या सणांची रचना केलेली दिसते. आपली आई, सासू, मोठी भावजय, वडील, मोठा भाऊ, बहीण हे सारेजण आपल्या मुला-नातवंडांना सणांचे महत्त्व सांगत असतात. त्याप्रमाणे पुढची पिढी हे सण-उत्सव साजरे करीत असते.

– हे मात्र खरं. आज लोकजीवन अतिशय घाईचे झाले आहे. दुसऱ्याला देण्यासाठी कुणाकडेही वेळ नाही. जो तो आपल्या चक्रांच्या मदतीने धावतो आहे. शहरी भागात हे प्रकर्षाने जाणवते. शहरात सण-उत्सव फारच तोंडदेखले झालेले दिसतात; पण खेड्यात, गावात मनापासून हे सर्व चाललेले असतं. यापुढे तर त्याची नितांत गरज आहे. आज खेड्यात जेव्हा हे सण साजरे केले जातात तेव्हा शेतीशी निगडीत सणांचा उत्साह शेतकऱ्याला नवी उमेद देऊन जातो. पण नवी पिढी हे करताना का-कू करते. हे सण का साजरे करायचे हे नव्या पिढीला माहीत नसतं.

– सणांचा आणि मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे चैत्र महिना. शिशिराची मरगळ झाडून वसंत ऋतुचं आगमन होतं. झाडांना नवी पालवी फुटते. नवा बहर येतो. म्हणून तर झाडाला फुटलेल्या नव्या पालवीला चैत्रपालवी म्हणतात. पूर्वी तर चैत्र महिन्याला ‘मधुमास’ म्हणत. त्यावरूनच चैत्राचा गोडवा ध्यानात येईल. या महिन्याची पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा. ही वर्षप्रतिपदा मानली जाते. वसंत ऋतुचं आगमन आणि नव्या वर्षाचा प्रारंभ म्हणून चैत्र पाडवा साजरा होतो. या दिवशी गुढय़ा-तोरणं उभारण्याची परंपरा रुजल्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणतात.

अशा प्रकारे हा सण ऋतू आणि काल यांच्याशी संबंधित आहे. ऋतू बदलाचं स्वागत करणारा हा सण आहे. रामनवमीचा उत्सव याच महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला साजरा केला जातो. या दिवशी मध्यान्ह काळी श्रीरामाचा जन्म झाला. या दिवशी मंदिरात रामजन्माचा सोहळा साजरा केला जातो. प्रसार म्हणून सुंठवडा वाटला जातो. चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती जैन धर्मीय मोठय़ा उत्साहात व आनंदात साजरी करतात. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जातं. मारुती म्हणजे बल, पराक्रम आणि भक्ती यांचा आदर्श आहे. रामभक्त हनुमान हे लोकदैवत आहे. त्याची जयंती देशभर उत्साहाने साजरी केली जाते. बौद्धधर्मीयांच्या जीवनात वैशाख पौर्णिमेला येणाऱया पौर्णिमेस बुद्धपौर्णिमा म्हणजेच बुद्धजयंती संबोधले जाते. या बुद्धपौर्णिमेच्या दिवशी बौद्ध बांधव आपापल्या घरी बुद्ध प्रतिमेसमोर मेणबत्ता किंवा दिवे लावतात. तसेच बुद्धविहारात जाऊन प्रार्थना करतात. या दिवशी गोडधोड केलं जाते.

ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेलाच वटपौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमा म्हणतात. या दिवशी सौभाग्यवती वडाच्या झाडाची पूजा करतात. सावित्रीची कथा ऐकतात व जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी आजकाल वडाच्या झाडाची फांदी तोडून तिची पूजा केली जाते. त्यामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणावर होते. फांदी तोडण्यापेक्षा वडाच्या रोपटय़ाची पूजा केल्यास वा वृक्षारोपण केल्यास त्यातून मोठा परिणाम साधला जाईल. त्यानंतर येते आषाढी एकादशी. पंढरपूरची वारी तिथे पोहोचते आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांची लगबग सुरू होते. साऱ्या महाराष्ट्रात विठ्ठल मंदिरात भक्तांची विठ्ठल दर्शनासाठी रांग लागते. नाचत, गात, टाळ-मृदुंगाचा गजर करीत भक्त मंदिराच्या दिशेने पायपीट करतात.

– गुरुविण नाही दुजा आधार रडता-पडता, कोठे अडता तो नेतसे पार. गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाते. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवसाला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. गुरु-शिष्याच्या नात्याचं महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस. त्यानंतर श्रावण महिन्यातील पंचमीला येते नागपंचमी. आजही खेडोपाडी हा सण उत्साहात साजरा केला जातो. ‘चल गं सखे वारुळाला। नागोबाला पुजायला।’ हे लोकगीत तर प्रसिद्ध आहे. साप किंवा नाग शेतात, असल्यास ते शेताचं रक्षण करतात या भावनेतून नागाची पूजा करून त्याच्याविषयी या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. १५ ऑगस्ट येणारा स्वातंत्र्यदिन सोहळा हासुद्धा संपूर्ण देशभर झेंडावंदन करून साजरा केला जातो. देशभक्तीला उजाळा देणारा हा सण देशाचे रक्षण करण्याची स्फूर्ती सर्व भारतीयांना देतो.

श्रावण महिन्यात पौर्णिमेला नारळीपौर्णिमा व रक्षाबंधन हे सण येतात. बहीण-भावाच्या नात्याला उजाळा देणाऱ्या या सणाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते व आपल्या रक्षणाची हमी मागते. कोळीबांधव या दिवशी समुद्राची यथासांग पूजा करतात आणि चार महिने किनाऱयावर बांधून ठेवलेली होडी सजवून तिला समुद्रात नेतात. नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, बैलपोळा, पतेती, गणेश चतुर्थी, ज्येष्ठ गौरी, नवरात्रोत्सव, विजयादशमी म्हणजेच दसरा, कोजागिरी पौर्णिमा, दीपावली, कार्तिकी एकादशी, रमजान ईद, तुलसी विवाह, गुरु नानक जयंती, नाताळ, मकर संक्रांत, रथसप्तमी, प्रजासत्ताक दिन, माघी गणेश जयंती, मोहरम ताझिया, महाशिवरात्री, बैसाखी, होळी, रंगपंचमी हे सण या वर्षात येतात. कॅलेंडरवर नजर टाकल्यास हे सर्व सण सर्वधर्मीयांचे असले तरी त्यामुळे देशात वर्षभर चैतन्याचं उत्साहाचं वातावरण कायम राहातं हे मात्र खरं.

– खूप चांगली म्हायती मिळाली. काय समाजलाव. नुसत्या चकाट्या पिटण्यापेक्षा काय तरी नवा ऐकलाव तर अकलेत भर पडेल.

– आमका सगळा म्हायत असा. तुकाच म्हायत नाय, त्येका आमी काय करनार? काय म्हटला मी?

– अगदी बरोबर.