मुंबई पोर्ट ट्रस्टच्या प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करणार

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीबरोबरच कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानीय लोकाधिकार समितीच्या शिष्टमंडळाने पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांची भेट घेत चर्चा करून निवेदन दिले. त्यानुसार  मुंबई पोर्ट ट्रस्टच्या दैनंदिन कामकाजामध्ये मराठी भाषेची  त्रिभाषा सूत्रानुसार प्रभावी अंमलबजावणी व प्रचार, प्रसार करणार असल्याचे आश्वासन राजीव जलोटा यांनी दिले.

मुंबई पोर्ट ट्रस्टची ढासळलेली आर्थिक स्थिती ढसळली आहे. याबाबत बोलताना खासदार अनिल देसाई म्हणाले, ट्रस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्व स्तरांवर कठोर उपाययोजना करून जास्तीत जास्त निधी संकलन करावे. कर्मचाऱयांच्या निवासी सदनिकांसाठी पोर्ट ट्रस्टच्या जागेत भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही भूमिका देसाई यांनी मांडली. पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयाचे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हस्तांतरण झाल्यानंतर ट्रस्टचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना प्राधान्याने चांगल्या दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावेत, रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांच्या सेवाशर्तींमध्ये कोणतेही बदल केले जाऊ नयेत असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. यावेळी न्यू इंडिया इन्शुरन्स स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, कार्याध्यक्ष नंदू राणे, संजय माधव, कोषाध्यक्ष प्रमोद दळवी, उपाध्यक्ष शिवराम सारंग, शशी सहाणे, दत्ता खोत, विलास रेडेकर, अजित  झाझम, अमोल म्हात्रे, अनंत जाधव,  नितीन कासले, विजय काशिलकर, निशा बोरगावकर, माधव कौलगी, धोंडू लांजेकर, सहदेव नागडे, दिनकर सागवेकर, गणेश म्हशिलकर, राजेश मयेकर, संजय मयेकर उपस्थित होते.

कंत्राटी प्रकल्पांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य द्या

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये सध्या चालू असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या कंत्राटी प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने संधी देण्याबाबत कंत्राटदारांना बंधनकारक करावे. अग्निशमन दलामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती न करता नियमित भरती करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यानुसार कंत्राटी प्रकल्पात स्थानिक तरुणांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत तत्काळ सर्व खातेप्रमुखांना निर्देश देणार असल्याचे पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी आश्वासन दिले. अग्निशमन दलातील रिक्त पदे भरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या