नियोजित मराठी साहित्य संमेलन – काही अपेक्षा

93

<< अशोक आफळे >>

सुगी संपल्यावर बळीराजा काहीसा निःश्वास सोडतो आणि शेतीव्यतिरिक्त अन्य कामांत लक्ष घालणे त्याला शक्य होते. ‘नवान्न पौर्णिमा’ ज्याला ग्रामीण बोलीत ‘नव्याची पुनव’ म्हणतात. या दिवसास अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळय़ा आईची मनापासून सेवा करून मिळविलेले धान्य भक्ती आणि कृतज्ञता याचे प्रतीक म्हणून ईश्वरचरणी अर्पण करणे हा ‘नव्याची पुनव’ या सणाचा उद्देश. बळीराजा या दिवशी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्या शेतात पिकलेली कणसे ‘तोरण’ म्हणून बांधतो.

‘साहित्य संमेलन’ ही सरस्वती उपासकांची नवान्न पौर्णिमाच असते. वर्षभरात आपण निर्माण केलेल्या साहित्यकृती या व्यासपीठाद्वारे रसिकांसमोर सादर करणे हा या सांस्कृतिक सोहळय़ाचा उद्देश असतो. यासाठी अर्थातच महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात असलेल्या नवोदित लेखक-कवी मंडळींना या संमेलनात सहभागी करून घेतले पाहिजे. आपली कलाकृती रसिकांपुढे आणण्यास ते उत्सुक असतात, पण जे प्रभावी व्यासपीठाच्या अभावी आजही उपेक्षित आहेत अशा होतकरू गुणवंतांचा शोध घेऊन त्यांना निमंत्रित केले पाहिजे. यातूनच कदाचित उद्याचे गदिमा, वामनराव चोरघडे, व्यंकटेश माडगूळकर, कुसुमाग्रज, शंकरराव खरात, दया पवार, इंद्रजीत भालेराव, ग्रेस आदी तयार होतील.

प्रबोधन तसेच लोकशिक्षणाचे अतिशय प्रभावी माध्यम असणाऱ्या भारूड, भेदिक, सोंगी भजन, चक्री कीर्तन आदी पारंपरिक कला झपाटय़ाने लोप पावत आहेत. त्या सादर करणारे कलाकार आजही खेडोपाडी आहेत. या कलाकारांना संमेलनात अगत्यपूर्वक पाचारण करावे असे मनापासून वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे पर्यावरणाचा सतत होत असलेला ऱ्हास, सर्व स्तरावर कर्करोगासारखा पसरलेला भ्रष्टाचार, वाढत्या लोकसंख्येने निर्माण केलेल्या समस्या, जातीधर्मातील विद्वेष (लोकसंख्येने निर्माण केलेल्या समस्या), अंधश्रद्धेचे वाढते प्राबल्य यासंबंधी जनजागृती करण्यासाठी या पारंपरिक कला आजच्या संगणकीय युगातही प्रभावी आहेत. कारण हे कलाकार लोकांची भाषा बोलतात.

मागच्या पिढीतील अनेक नामवंत साहित्यिक विस्मृतीच्या पडद्यामागे जात आहेत. त्यांची दर्जेदार निर्मिती व अल्प परिचय आजच्या युवा पिढीस व्हावा यासाठी स्वतंत्र दालन असावे.
ग्रामीण – सामाजिक आशय असलेले विविध सामाजिक समस्यांसंबंधी लोकजागृती करणाऱया साहित्यकृतींची स्वतंत्रपणे दखल घेतली जावी.
व्यंगचित्रकार हादेखील एक साहित्यिकच आहे. जो आशय अनेक परिच्छेद लिहून व्यक्त होत नाही तो व्यंगचित्रकार चार रेघा मारून प्रभावीपणे व्यक्त करतो. या मंडळींनाही संमेलनात उचित स्थान देऊन या कलेस प्रोत्साहन मिळेल असा दृष्टिकोन ठेवावा.

सर्वात महत्त्वाची आणि कळकळीची विनंती म्हणजे, संमेलनाध्यक्षांची निवड एकमताने व्हावी आणि दरवर्षी निर्माण होणारे वाद व कटुता टाळावी. कविवर्य कै. विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर यांना हा बहुमान लाभलेला नाही. हे योग्य नाही. यासाठी जरूर तर घटनेत बदल करावेत. थोडक्यात, ज्येष्ठांचा सन्मान, नवोदितांना प्रोत्साहन, पारंपरिक साहित्यकृतींचे पुनर्जीवन तसेच वाङ्मयाशी निगडित असलेल्या अन्य कलाकृतींना पाठबळ देणारे हे संमेलन असावे अशी माझ्यासारख्या सामान्य साहित्यप्रेमींची अपेक्षा आहे.
साहित्यिकांची – सारस्वतांची ही ‘नवान्न पौर्णिमा’ उत्साहाने तसेच आनंदाने संपन्न व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त करून लांबलेल्या पत्रास विराम देतो.

आपली प्रतिक्रिया द्या