जाणिवांचा उत्सव

16

डोंबिवली येथे सध्या जागतिक मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांच्याशी केलेली बातचीत..

मूळचे नागपूरच्या वरुड गावचे असणारे डॉ. अक्षयकुमार काळे यांनी कवितेचे समीक्षक म्हणून ख्याती मिळवली आहे. सुक्तसंदर्भ, कविता कुसुमाग्रजांची, मर्ढेकरांची कविता- आकलन, ग्रेसविषयी, गालिबचे उर्दू काव्य विश्व-अर्थ व भाष्य ही त्यांची काही ग्रंथसंपदा आहे. स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील प्रवाह या विषयामध्ये पीएच.डी. केली आहे.

संमेलनाध्यक्ष म्हणून आपली भूमिका मांडताना डॉ. अक्षयकुमार काळे सांगतात की, वेगवेगळया ठिकाणी होणारी मराठी साहित्य संमेलने हे मराठी माणसांचा एकत्र येण्याचा, मराठी माणसांच्या विचारांना समृद्ध करणारा, जाणिवा निर्माण करणारा एक उत्सव आहे. या मराठी संमेलनामुळे एक वेगळी सकारात्मक ऊर्जा तयार होते असते आणि त्यामुळे असे साहित्य संमेलने विचारप्रवाह एकत्र आणण्याचे काम करीत असतात असे वाटते. मराठी भाषा आणि समाजापुढे आज वेगवेगळे प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी वेगवेगळी व्यासपीठे आहेत. संमेलनात साहित्यबाह्य विचार नको तर नेमका साहित्याचाच विचार व्हावा असा माझा आग्रह असेल. मराठी साहित्य व संस्कृतीपुढे वेगवेगळी आव्हानं उभी आहेत. साहित्याला महत्ता कशी लाभेल त्या दिशेने प्रयत्न अपेक्षित आहेत असे मला वाटते आणि हेच नेमके या संमेलनाच्या निमित्ताने एक अध्यक्ष म्हणून मी मांडणार आहे.

आज मराठी भाषा लोप पावत चालली आहे असे म्हटले जाते याविषयी बोलताना डॉ. काळे म्हणतात की, मराठीच्या अस्तित्वाला कधी धोका नव्हता, कधीही नाही आणि यापुढेही नसेल. मुळातच मराठीवर यापूर्वीच अरबी, फारसी, हिंदी, कन्नड अशा भाषांची आक्रमणे झाली होती. पण तसे असतानाही मराठीने आपले वेगळेपण, अस्तित्व टिकवून ठेवले आहे. त्यामुळेच मराठी भाषेची संवादक्षमता कोठेही कमी झालेली नाही उलट ती वाढतच आहे असे मला वाटते. मराठी भाषेवर जरी आक्रमणे झाली किंवा होतील त्यामुळे मराठी भाषा बदलत जाईलही पण यामुळे मराठी भाषेचे महत्व कमी होणर नाही.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे व्यासपीठ मला लाभले हे माझे भाग्य मानतो. आज बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेचे, साहित्याचे, संस्कृतीचे प्रश्न वेगळे आहेत. ते समजून घेऊन त्यादृष्टीने काम करणे यावरच माझा भर राहिल. साहित्य संमेलन यांचे महत्व म्हटले तर खूप आहे कारण असे साहित्य संमेलने म्हणजे भाषा आणि संस्कृती यांचा मिलाफ आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष् म्हणून काम करीत असताना महाराष्ट्रातील साहित्य संस्था, विविध विद्यापीठांचे मराठी विभाग यांना प्रत्यक्ष भेटी देऊन मराठी भाषेची, वाडमयाची सद्यस्थिती जाणून घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा मानस आहे. मराठी वाडमयातील लोकांनी मराठी भाषेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे, पण हे प्रयत्न अपुरे न राहता किंवा वैयक्तिकपणे न करता संघटित व्हावे हीच इच्छा आहे. तसेच मराठी वाडमयाची संस्कृती टिकून राहावी तसेच यामध्ये सर्वसामान्यांचा सहभाग असावा यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. मराठी वाडमयीन संस्कृती नेमकी समजून घेत असताना ही संस्कृती अधिक सशक्त करण्याचा यापुढचा माझा प्रयत्न असणार आहे.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माझ्या भावना मांडताना मी मराठी भाषेविषयीचे वेगवेगळे कंगोरे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी विचार, मराठी भाषा, मराठीची सद्य:स्थिती या सर्व विषयांचा धांडोळा घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. कला आणि साहित्य अश्या दोन्ही प्रांतात आघाडीवर असलेल्या डोंबिवली नगरीत होणाऱया ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनात वाचकांना सहभागी करुन घेणे, मराठी भाषेविषयी ऊर्जा निर्माण करणे हाच प्रयत्न असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या