मराठी चित्रपटांना ग्रामीण कोकणची ‘हाक’

जे . डी . पराडकर । संगमेश्वर

कोकणच्या निसर्गसौंदर्याची भुरळ केवळ देश-विदेशातील पर्यटकांनाच आहे असं नव्हे, तर मराठी चित्रपट कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांना देखिल कोकणच सौंदर्य नेहमी साद घालतं . कोकण ही जन्मभूमी असणारे ख्यातनाम कलाकार अरुण नलावडे आणि कोकणवर विशेष प्रेम करणारे दिग्दर्शक रमेश मोरे यांच्या कल्पकतेतून साकारलेला ‘ हाक ‘ हा चित्रपट १२ मे रोजी प्रदर्शित होत असून कोकणातील कलाकारांना अभिनयाची संधी उपलब्ध करुन देणारा हा चित्रपट पूर्णत: रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यात चित्रीत झाला आहे , हे हाकचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोकणचा ग्रामीण भाग असो वा येथील जीवन , यासर्वाची मराठी चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणासाठी ही ‘ हाक ‘ असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे .

अंजली नलावडे निर्मित हाक या चित्रपटात अरुण नलावडे , ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त , सुहासिनी देशपांडे , अनिल गवस , निता गोखले , वरूण उपाध्याय , अशोक परब याबरोबरच कोकणातील प्रथितयश कलाकार डॉ . भगवान नारकर , सौ.अनुराधा नारकर लांजाचे अमोल रेडिज , शेखर जोशी , श्रीकांत पाटील , शरद चव्हाण , मंगेश डोंगरे , सावंत , श्रीमती पांचाळ , डॉअश्विनी नारकर आणि बालकलाकार अपूर्व खातू यांनी आपल्या भूमिका दर्जेदारपणे सादर केल्या आहेत . रमेश मोरे या निर्माता दिग्दर्शक व्यक्तीमत्वाचे कोकणवर विशेष प्रेम आहे . आजवर त्यांनी कोकणच्या विविध भागात चित्रीकरण करुन एका पेक्षा एक दर्जेदार चित्रपट , लघुपटांची निर्मिती करुन कोकण चित्रपटाच्या माध्यमातून सातासमुद्रापार नेलं आहे . राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निर्माते , दिग्दर्शक रमेश मोरे यांनी कोकणची सांस्कृतिक परंपरा असलेल्या ‘ नमन ‘ या ग्रामीण तरीही लोकप्रियतेच्या अफाट शिखरावर असणाऱ्या नृत्याविष्कारावर नुकताच एक लघुपट तयार केला असून तो देखिल लवकरच प्रदर्शित होणार आहे . कोकणवर नितांत प्रेम असणाऱ्या रमेश मोरे यांच्यावरच ‘ हाक ‘ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे .

या चित्रपटाबाबत बोलताना ख्यातनाम कलाकार आणि संगमेश्वर तालुक्याचे सुपूत्र अरुण नलावडे म्हणाले की , कोकणचं ग्रामीण जीवन साधं तरीही निटनेटकं आणि अगत्याचं असल्याने कोकणात विशेषता ग्रामीण भागात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचे आम्ही ठरवले . कोकणातील कलाकारांकडे मूळातच अभिनयाची उत्तम कला असल्याने येथील कलाकारांना देखिल आपला अभिनय सादर करण्याची संधी मिळावी अशी आमची मनोमन इच्छा होती . कोकणातील जवळपास १५ पेक्षा अधिक कलाकारांना या चित्रपटात अभिनयाची संधी देण्यात आली आहे . डॉ . भगवान नारकर , अमोल रेडिज यांच्या उत्तम अभिनयासह बालकलाकार अपूर्व खातू याचे अरुण नलावडे यांनी विशेष कौतूक केले .

ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त हे ‘ हाक ‘ चित्रपटात विशेष भूमिका करत असून त्यांची ही भूमिका हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य असल्याचे निर्मात्या अंजली नलावडे यांनी सांगितले . हा चित्रपट कोकणवासीयांच्या मनात , तर घर करणारच आहे मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षक ‘ हाक ‘ च्या प्रेमात पडेल असा विश्वास अरुण नलावडे यांनी व्यक्त केला आहे . दिग्दर्शक रमेश मोरे असोत वा कोकणचे अभिनयसम्राट सुपूत्र अरुण नलावडे हे दोघेही आपल्या चित्रपटांतून कोकणचे सौंदर्य सर्वदूर पोहचवून येथील पर्यटन व्यवसायात वृध्दी करत आहेत याबरोबरच स्थानिक कलाकारांना अभिनयाची संधी देवून नवनवीन कलाकार घडवत असल्याची प्रतिक्रीया बारा पेक्षा अधिक चित्रपटांतून छोट्या मोठ्या भूमिका करणाऱ्या कडवई येथील डॉ. भगवान नारकर यांनी व्यक्त केली .

आपली प्रतिक्रिया द्या