मराठी चित्रपटांची सुवर्णवाट!

428

< क्षितिज झारापकर >

मराठी चित्रपटांनी नेहमीप्रमाणे मोठय़ा डौलात राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीचा झेंडा रोवला आहे. ‘कासव’, ‘दशक्रिया’, ‘व्हेंटिलेटरच्या अनुषंगाने एकूण मराठी चित्रपटांविषयी

मराठी चित्रपटांवर यंदा पाचव्यांदा सुवर्णकमळाची मोहर उमटली आहे. मराठी चित्रपटांचे आर्थिक ताळेबंद जरी वेगळे असले तरी अभिजातता आणि दर्जा या दोन गोष्टींमध्ये मराठी सिनेमा हा निर्विवाद वरचढ राहिलेला आहे. यासाठी ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही अशा अनेक चित्रपटांची नावे घेता येतील. अत्यंत सशक्त कथानक आणि पटकथा हा आपल्या मराठी चित्रपटांचा प्राण. उत्तम दिग्दर्शन आणि कथानकांसाठी मराठी साहित्यकृतींची निवड हे आपले वैशिष्टय़. यामुळे अनेक अमराठी बॉलीवूड स्टार्सनासुद्धा मराठी चित्रपटात निर्मिती करण्याचा मोह आवरलेला नाही. प्रियंका चोप्राची प्रथम निर्मिती असलेल्या मराठमोळ्या ‘व्हेंटिलेटर’ने हे पुरस्कारासहित सिद्ध केले आहे. बाबा भांड यांच्या साहित्यकृतीवर आधारीत असलेल्या ‘दशक्रिया’ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारासहित कान्स महोत्सवावरही आपली मोहोर उमटवली आहे.

सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर यांच्या ‘कासव’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून स्वतःचे वेगळे स्थान दाखवून दिले आहे. नैराश्यातून तरुणांनी बाहेर कसं यावं हे सांगणारा हा चित्रपट आहे. ‘कासव’ हा एक निरुपद्रवी प्राणी आहे. त्याला कोणत्याही संकटाची चाहूल लागली की लगेच ते स्वतःचे अवयव कवचात ओढून घेऊन स्वतःला मिटून घेतं. त्याचप्रमाणे निराश झालेली व्यक्तीही तशीच वागते. नैराश्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

आपल्या मराठी चित्रपटाचे सगळ्यात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची नावं. ‘कासव’, ‘दशक्रिया’, ‘व्हेंटिलेटर’… प्रत्येक नावाचे स्वतःचे वेगळेपण. एखाद्या प्राण्याचा स्वभावधर्म हेरून त्यातून मानवी मनोवृत्ती शोधण्याचा प्रयत्न ‘कासव’मार्फत होतो आहे. गेल्या वर्षीच्या ‘सैराट’नेही एका साध्याशा प्रेमकथेतून स्वतःचे वेगळेपण दाखवून दिले आहे.

वेगळेपणा या वैशिष्टय़ाच्या जोरावर मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांत बाजी मारतात. निवड झालेल्या ‘व्हेंटिलेटर’व्यतिरिक्त ‘कासव’ किंवा ‘दशक्रिया’ या चित्रपटांना खरे पाहिले तर कसलेही ग्लॅमर नाही. ‘व्हेंटिलेटर’च्या मागे प्रियंका चोप्रा हे मोठे नाव होते. पण या दोन चित्रपटांकडे सकस दृष्टीकोन आणि सशक्त कथा-पटकथा याखेरीज बाकी काही नाही. आजपर्यंत मराठी चित्रपट या अत्यावश्यक असलेल्या कलागुणांच्या आधारावरच झळाळून उठला आहे… आणि यापुढेही झळाळत राहील यात शंका नाही.

तरीही काही मुद्दे येथे मांडण्याचा मोह आवरत नाही.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट प्रदर्शित होण्यास विलंब का लागतो? किंवा ते प्रदर्शितच का होत नाहीत?

मुंबईसारख्या ठिकाणी मराठी चित्रपटांना प्रधान वेळ का मिळू नये?

मराठी चित्रपटांचे आर्थिक गणित जमवण्यास अजूनही अनेक प्रश्नांना का सामोरे जावे लागते?

मराठी कलाकारांना मिळणारे मानधन हाही कळीचा मुद्दा आहे.

या आणि अशासारख्या अनेक संकटांना पार करत मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीचा झेंडा फडकवत आहे आणि तो दिवसेंदिवस अधिकच तेजाने फडकत राहील… झळाळत राहील.

वास्तवावर परखड भाष्य

अदिती देशपांडे

जिद्द काहीही शक्य करुन दाखवू शकते हे या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमधल्या सर्वोत्कृष्ट ‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटाने दाखवून दिलंय. या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील हे नवोदित रंगकर्मी. ‘दशक्रिया’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट. सातत्याने दोन वर्ष ते या प्रॉजेक्टवर काम करीत होते. तेही आपल्याला हा चित्रपट करता येईल की नाही हे नक्की माहीत नसताना. कारण कादंबरीकार बाबा भांड यांनी त्याचे हक्क दुसऱया कुणाला तरी दिलेले होते.

स्वतः राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि ‘दशक्रिया’मधील अभिनेत्री अदिती देशपांडे ‘दशक्रिया’बाबत अभिमानाने सांगत होत्या. चित्रीकरणाच्या वेळीदेखील गारगोटीमधला अवेळी पाऊस, पाण्याची पातळी खाली गेलेलं धरण अशा असंख्य अडचणींवर मात करुन ‘दशक्रिया’ हा चित्रपट साकारला गेला असं त्या म्हणाल्या.

आपल्या अभिनयाबाबत सांगताना त्यांनी आधी ती कादंबरी वाचली नव्हती आणि त्यामुळे आपण सर्वतोपरीने चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक या दोघांवर अवलंबून होतो असं त्या प्रामाणिकपणे कबूल करतात. पण त्यामुळे कोणताही पूर्वग्रह किंवा कयास न बांधता त्या आपल्या पात्राला न्याय देऊ शकल्या. विशेषतः स्वतः दिग्दर्शक असल्याने काही कयास आधीच बांधले जाणं अत्यंत स्वाभविक आहे. इथे मात्र तसं झालं नाही.

‘दशक्रिया’ या चित्रपटातून मूळ विषय, श्रध्दा आणि अंधश्रध्दा यांच्यातलं द्वंद्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं जरुरी होतं. ज्या पद्धतीने संदीप पाटील यांनी चित्रीकरणापूर्वी त्यावर वर्क करून हे साध्य केलं. त्यामुळे ‘दशक्रिया’ हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे तयार होऊ शकला असं त्या म्हणाल्या.

प्रेरित करणारा व्हेंटिलेटर

राजेश मापुसकर

एखादी गोष्ट जेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्वतःला आवडते आणि प्रेरित करते तेव्हा आपण ती खऱया अर्थाने जगाला सांगू शकतो असं मत यंदाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी मांडलं.

हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी असलेले मापुस्कर जेव्हा ‘व्हेंटिलेटर’च्या कॉन्सेप्टवर काम करत होते तेव्हा अनेक विचार येत होते. त्यात दोन मुख्य प्रवाह होते असं ते सांगतात. एक विचार होता की ‘व्हेंटिलेटर’चा विचार खूप महत्वाचा असल्याने त्यांनी ही फिल्म करायलाच हवी. दुसरा विचार असा होता की हिंदीत यश पाहिल्यानंतर त्यांनी मराठीत पाऊल का टाकावं. पण काही कल्पना या हिंदी सिनेमाच्या नसतात, त्या प्रादेशिकच्याच असतात. ‘व्हेंटिलेटर’ बहुदा मराठीत सुचली असणार.

राजेश मापुस्कर यांचा ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमाने राष्टीय पुरस्कारांसोबतच बॉक्स ऑफिसदेखील काबीज केलं. हा चित्रपट थिएटरवर खूप चांगला धंदा करून गेला. इथे कदाचित मापुस्करांचा हिंदी चित्रपटसृष्टीचा अनुभव कामी आला असावा. एखादी गोष्ट सांगण्याच्या बऱयाच तऱहा असू शकतात. पण ऐकणाऱयाला गुंतवून ठेवणारी शैली निवडून ती गोष्ट सांगण्याचं कसब असावं लागतं. ‘व्हेंटिलेटर’मध्ये ते कसब होतं, म्हणून सामान्य प्रेक्षकांनीही तो उचलून धरला.

एखादी कथा जेव्हा आपल्याला मनापासून करावीशी वाटते तेव्हाच ती मनासारखी वास्तवात उतरते असं मापुस्कर सांगतात. ‘व्हेंटिलेटर’ काही काळ मापुस्करांना झोप लागू देत नव्हता आणि म्हणूनच ते हा चित्रपट झपाटून करू शकले असं ते सांगतात.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या