स्पर्धात्मक नाटय़ाविष्कार – ‘आय विटनेस’, ‘काळा घोडा’!

1115

>> क्षितिज झारापकर

आय विटनेस’,  काळा घोडा’.  राज्य नाटय़स्पर्धेतील दोन नाटकं. अशा नाटय़ स्पर्धांना तरुणाईचा लाभणारा उदंड प्रतिसाद पाहिला की मराठी रंगभूमीचे भविष्य किती उज्ज्वल आहे याची खात्री पटते.

आय विटनेस

आपल्या महाराष्ट्रात एक अत्यंत सशक्त व्यासपीठ नाटय़कलेसाठी उपलब्ध आहे. राज्य नाटय़ स्पर्धा. गेली कित्येक वर्षे मराठी नाटय़कर्मी राज्य नाटय़ स्पर्धेत उत्साहाने आणि हिरीरीने भाग घेत आहेत. हिंदुस्थानातल्या अन्य कोणत्याही राज्यात नाटय़कलेकरिता असं कोणतंही व्यासपीठ नाही. म्हणायला ही महाराष्ट्रातली राज्य नाटय़ स्पर्धा हौशी नाटय़कर्मींसाठी आहे, पण या स्पर्धेकडे प्रथितयश आणि व्यावसायिक रंगकर्मींचं बारीक लक्ष असतं. ही स्पर्धा सगळ्यांकरिता महत्त्वाची आहे. विशेषतः प्रेक्षकांसाठी खूप चांगली संधी आहे ही राज्य नाटय़ स्पर्धा. महाराष्ट्रातील बहुसंख्य नाटय़गृहे ही सरकार अखत्यारीतली असल्याने ही स्पर्धा महाराष्ट्रभरातल्या नाटय़गृहांमध्ये भरते. प्रत्येक सेंटरला 25 पासून 100 पर्यंत नाटकं सादर होतात. ही सर्व नाटकं जुजबी तिकीट दरात म्हणजेच अवघ्या 15 अणि 20 रुपयांच्या तिकिटात रसिक प्रक्षक परीक्षकांसमवेत पाहू शकतात. नाटय़प्रेमी प्रेक्षकांकरिता ही पर्वणीच म्हणायला हवी. स्पर्धेतल्या नाटकांचे विषयही उत्तम अणि वैविध्यपूर्ण असतात. वानगीदाखल आपण इथे यंदाच्या राज्य नाटय़ स्पर्धेतील दोन नाटकं पाहणार आहोत. ही दोन नाटकं त्यांचे भिन्न आशय पाहता दोन टोकांवरची आहेत अणि म्हणूनच स्पर्धेच्या एकूण विस्ताराची सूचक आहेत.

अभिषेक कलामंच निर्मित ‘आय विटनेस’ हे एक सस्पेन्स थ्रिलर जातकुळीचं नाटक आहे. ज्येष्ठ नाटय़ समीक्षक आभास आनंद यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. सस्पेन्स नाटक हे लिहिण्यापेक्षा ते क्राफ्ट करणं हा भाग अधिक असतो. इथे लेखकाने दिग्दर्शक प्रदीप राणे यांना बरोबर ठेवून नाटक क्राफ्ट केल्याचं जाणवतं. आभासने ‘आय विटनेस’ हे हल्ली झपाटय़ाने प्रचलित होत चाललेल्या क्रीनप्ले फॉर्ममध्ये लिहिलेलं नाटक आहे. काही प्रवेश इंटरकट वाटावेत इतके छोटे आहेत. त्यामुळे नाटकाला एक आंतरिक गती मिळते. प्रदीप राणे यांनी अत्यंत कल्पक दिग्दर्शनातून हे सिनेमॅटिक स्टाईलचं लिखाण रंगमंचीय आविष्कारातून साकारलंय. गोव्याच्या पार्श्वभूमीवर ड्रग्ज अणि प्रॉपर्टीकरिता झालेला गुन्हा, खून, प्रेम आणि आत्मशोध या सगळ्याचं मिश्रण असलेलं कथानक म्हणजे ‘आय विटनेस’.

मुख्य पात्र सुझान हे साठी ओलांडलेल्या म्हातारीचं आहे जिच्या जावयाचा खून झालाय आणि मुलगी जेनी धोक्यात आहे. मानसी मराठे यांनी मनस्वी अभिनय करत एक रिव्हेटिंग परफॉर्मन्स देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. त्यांचा बोलण्यातला गोवन (कोकणी नव्हे) लेहजा लाजवाब आहे. या सगळ्याची उकल करणारा तरुण स्मित अभिषेक मराठेने खूपच नॅचरल साकारला आहे. त्याची प्रेयसी सारा झालेली कांचन शिंदे तडफदार आणि फोकस्ड वाटते. रॉबर्ट म्हणून आशीर्वाद मराठे रुबाबदार अणि पीटर परेरा झालेले आशुतोष घोरपडे हे तडफदार खलनायक शोभतात. उल्लेश खंदारे हे अग्रगण्य रंगभूषाकार इथे पोलिसाच्या भूमिकेत दिसतात. केवळ त्यांच्या चालण्यातून ते पोलीस असल्याचं जाणवतं. त्यांनी इथे रंगभूषेतून सुझानचं केलेलं व्यक्तिरेखा आरेखनही कौतुकास्पद आहे. या नाटकात संगीत महत्त्वाचं आहे. अजय नाईक हा गोव्याचा संगीतकार इथे खूपच प्रभावी ठरतो. ं‘आय विटनेस’ विजय आनंद पठडीतला सस्पेन्स रंगमंचावर साकारू पाहणारं नाटक आहे.

नाटक : आय विटनेस निर्मिती : अभिषेक कलामंच लेखक : आभास आनंद नेपथ्य : प्रदीप पाटील प्रकाश : शीतल तळपदे पार्श्वसंगीत : अजय नाईक रंगभूषा : उलेश खंदारे विशेष सहाय्य : प्रशांत दामले, विजय केंकरे, विश्वास सोहोनी, क्षितिज झारापकर सूत्रधार : प्रणित बोडके दिग्दर्शक : प्रदीप राणे  कलाकार : मानसी मराठे, कांचन शिंदे, आशीर्वाद मराठे, आशुतोष घोरपडे, त्रषीकेश शिर्के, अविनाश खेडकर, अभिषेक मराठे.  दर्जा : 

काळा घोडा

kala-ghoda

माध्यम कलामंच प्रस्तुत ‘काळा घोडा’ हे डॉ. अनिल बांदिवडेकर लिखित नाटक आहे. हे एक शुद्ध प्रायोगिक नाटक आहे. मानसिक विकारावर बेतलेलं, मनस्वी अभिनय आणि दिग्दर्शनाने नटलेलं ‘काळा घोडा’ आपल्याला प्रेक्षक म्हणून स्तंभित करून जातं. ं‘काळा घोडा’ उभं करताना दिग्दर्शनातून वापरलेला फॉर्म मिश्रित आहे आणि म्हणूनच आपण प्रेक्षक सतत सतर्क राहतो. काही कलाकार रंगमंचावर मागे बसून असतात अणि गरज पडेल तसं बेअरिंग घेऊन समोर येतात, तर काही पात्रं विंगेतून नेमक्या वेळी प्रवेश करतात. म्हणूनच नाटक प्रेडिक्टेबल न होता आपल्याला सतत सतर्क राहायला भाग पाडतं. ओमकार-अनिल यांचं दिग्दर्शन इथे प्रभावी ठरतं. रत्नाकर वर्दे यांचं सूचक नेपथ्य अत्यंत परिणामकारक आहे. सरकारी डॉक्टरची खोली आणि तबेला एकाच स्पेसमध्ये काहीही बदल न करता उभा राहतो हे विशेष आहे. शीतल तळपदे यांची प्रकाश योजना नेहमीप्रमाणे आशय अधोरेखित करणारी आणि नाटकाचं दृष्य स्वरूप अधिक भावणारं करणारी आहे. मोहिनी टिल्लू आणि हेमांगी शुक्ल यांनी योजलेली वेशभूषा कल्पक आणि पटणारी आहे. त्यांनी उभे केलेले सहा घोडे हायलाईट आहेत. मयुरेश माडगावकर यांचं संगीत नाटक अधिक प्रभावी करतं.

रोहित मावळेचा लालजी अणि मोहिनी टिल्लू यांची डॉ. विद्या ‘काळा घोडा’ आपल्या खांद्यावर वाहतात. रोहित पराकोटीचा मनोरुग्ण खूप अतिरंजित करून सादर करतो. तिथे डॉ. विद्याचा आब राखून अत्यंत संयतपणे मोहिनी टिल्लू समोर येतात. रामदास जाधव यांचा जगदीश अणि रणजित देवल यांचा मुस्तफा परिणामकारक झालेत. प्रतिमा कंटक, सुनीता रामटेके, हेमांगी शुक्ल, तनिषा वर्दे, सचिन कंटक, प्रमोद निकम, अक्षय कोकाटे, सृष्टी पन्हाळे, प्रेम राज या सर्वांनी ‘काळा घोडा’ व्यवस्थित पेलून धरलेलं नाटक आहे. त्रिपूट हा घोडा नाटकात विशेष लक्षात राहतो. विष्णू रोजतकर याने त्रिपूट अक्षरशः खऱया अर्थाने परसोनिफाय करून सादर केलाय. केवळ आंगिक अभिनयातून विष्णूने घोडा हा प्राणी रंगमंचावर उभा केलाय.

नाटक : काळा घोडा निर्मिती : माध्यम कलामंच लेखक : डॉ. अनिल बांदिवडेकर प्रकाश : शीतल तळपदे नेपथ्य : रत्नाकर वर्दे पार्श्वसंगीत : मयुरेश माडगावकर वेशभूषा : हिमांगी शुक्लरंगभूषा : राजन आवळेगावकर सूत्रधार : शरद वेटे  दिग्दर्शक : ओमकार बांदिवडेकर  कलाकार : मोहिनी टिल्लू, प्रतिमा कंटक, सुनिता रामटेके, रोहित मावळे, रामदास जाधव, सचिन कंटकदर्जा :

या दोन नाटकांच्या भिन्न पठडय़ा पाहिल्यावर लक्षात येतं की, राज्य नाटय़ स्पर्धेचा आवाका किती मोठा आहे आणि प्रेक्षकांना किती विविधता अल्प किमतीत पाहायला मिळते. दरवर्षी होणाऱया या सोहळ्याचा निश्चित फायदा रसिकांनी घ्यायला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या