
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ‘रंगकर्मी नाटक समूह’ सज्ज झाला आहे. शनिवारी या पॅनेलच्या 14 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. प्रशांत दामले, अजित भुरे, विजय केंकरे, सयाजी शिंदे आदी नाटय़सृष्टीचा प्रदीर्घ अनुभव असणारे रंगकर्मी या पॅनलचे उमेदवार आहेत.
नाटय़ परिषद ही मराठी नाटय़सृष्टीची शिखरसंस्था असून रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा म्हणून परिषद काम करते. नाटय़ परिषदेची पंचवार्षिक निवडणूक 16 एप्रिल रोजी पार पडणार असून त्यातून नियामक मंडळाचे 60 सदस्य निवडले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘साद प्रेमाची, आस परिवर्तनाची’ म्हणत रसिक, रंगकर्मी आणि नाटय़ व्यवसायाला भेडसावणाऱ्या समस्या यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी ‘रंगकर्मी नाटक समूह’ हे नाटय़सृष्टीतील दिग्गज मान्यवरांचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे.
असे आहे रंगकर्मी नाटक समूहाचे पॅनेल
– मध्यवर्ती शाखा ः विजय केंकरे, दिलीप जाधव, अजित भुरे, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, प्रशांत दामले, विजय गोखले, सयाजी शिंदे, सविता मालपेकर, विजय सूर्यवंशी
– बोरिवली शाखा ः नितीन नेरुरकर, उदय राजेशिर्कें, संजय देसाई, हेमंत बिडवे
नाटय़सृष्टीचा चेहरामोहरा बदलणार
ज्येष्ठ, कनिष्ठ रंगकर्मींना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल उपाययोजना, चांगल्या आणि व्यावसायिक नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेत निर्मात्यांना पाठिंबा देणे, नाटक व्यवसाय मोठा होण्यासाठी तसेच राज्यातील नाटय़गृहांच्या सुधारणांच्या दृष्टीने पाऊल उचलणे, प्रायोगिक नाटकांना राज्यस्तरावर सपोर्ट सिस्टम उभी करणे, नाटय़गृहांचे व्यवस्थापन आणि देखभालसंबंधी विचार आणि कृती आराखडा तयार करणे, नाटय़ प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करीत नवनव्या नाटकांची बँक तयार करणे, नाटय़कर्मींसाठी आरोग्य विमा योजना आणि वैद्यकीय सुविधा, नाटय़संकुल पुन्हा उभारण्याचा प्रयत्न, नाटय़ संमेलनात नावीन्य आणणे, नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आदी रंगकर्मी नाटक समूहाची उद्दिष्टय़े असल्याची माहिती ज्येष्ठ नाटय़कर्मी अजित भुरे यांनी दिली.