
मराठी नववर्ष जल्लोषात साजरे करण्यासाठी आपण सारे सज्ज आहोत. आजच्या गुढीपाडव्यानिमित्त छोट्या पडद्यावरील कलाकारांनी जागवलेल्या गोड आठवणी…
यंदाचा गुढीपाडवा मी कुटुंबीयांसोबत साजरा करणार आहे. हा सण नव्या पर्वाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे. त्यामुळे अनेक नव्या गोष्टींना गुढीपाडव्यापासून सुरुवात होते. नव्या कामाचा शुभारंभ, नवीन खरेदी वगैरे. यंदा मी काहीतरी नवे शिकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते म्हणजे श्रीखंड आणि पुरणपोळी कशी बनवायची ते. हे मला जमेल, अशी मी आशा करते. सर्व प्रेक्षकांना उत्तम आरोग्य लाभो, अशी शुभेच्छा व्यक्त करते.
– अनुष्का मर्चंडे (मैं हूँ अपराजिता)
लहानपणापासूनच गुढीपाडवा सणाच्या माझ्या गोड आठवणी आहेत. सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा हा सण आहे. आम्ही पहाटे लवकर उठून घरी गुढी उभारतो. हा वर्षाचा पहिला दिवस असून वसंत ऋतूची सुरुवात या दिवसापासून होते. या दिवशी आम्ही कडुनिंबाचे एक छोटे पान खातो. असे म्हणतात की, त्यामुळे आपल्या शरीरातील सर्व अशुद्ध गोष्टी दूर होतात आणि आपण निरोगी शरीराने नवीन वर्षाचे स्वागत करतो.
– मुग्धा चाफेकर (कुमकुम भाग्य)
गुढीपाडवा हा माझ्या सर्वात आवडत्या सणांपैकी एक आहे. गुढी सर्व वाईट गोष्टींना घरापासून दूर ठेवते आणि चांगल्या गोष्टींना आकर्षित करते, अशी समजूत आहे. पूजेनंतर दरवर्षी मी आणि माझी आई विविध लज्जतदार पदार्थ बनवितो आणि आम्ही सर्वजण एकत्र बसून जेवण करतो. इतर दिवशी सर्वांना एकत्र जेवायला वेळच मिळत नाही ना. यंदा मी हा सण माझ्या कुटुंबीयांबरोबर साजरा करणार आहे.
- कीर्ती नागपुरे, (प्यार का पहला नाम राधा मोहन)