हिंदू नववर्षाचे आज दणक्यात स्वागत

23

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदू नववर्ष स्वागताची गुढी उद्या मुंबईत ठिकठिकाणी उत्साहात उभी राहणार आहे. जागोजागी लेझीम, ढोल पथक गुढीपाडव्याचा उत्साह आणखी वाढवणार असून रस्तोरस्ती नऊवारी साडी नेसलेल्या तरुणी आणि सदरा, कुर्ता, फेटे परिधान केलेले तरुण दिसतील. बुलेटवरून दिमाखात दिंडी सोहळय़ाचे प्रतिनिधित्व करणाऱया रणरागिणी आणि खास मराठमोळे वातावरण, भव्य शोभायात्रा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा असे विलोभनीय चित्र मुंबईकरांचे खास आकर्षण ठरणार आहे.

दादर-प्रभादेवी-माहीममध्ये भव्य शोभायात्रा
शिवसेनेच्या वतीने दादर-प्रभादेवी-माहीम परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. प्रभादेवी माता मंदिर येथून सकाळी ९ वाजता सुरू होणारी ही शोभायात्रा म्हणजे परिसरातील नागरिकांसाठी सांस्कृतिक पर्वणीच ठरणार आहे. यामध्ये पारंपरिक वाद्ये, ढोलताशा पथकांबरोबरच विविध कलापथके सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर परिसरात भगवे झेंडे, भगव्या पताका उभारून भगवा माहोल तयार करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. प्रभादेवी माता मंदिरापासून माहीम चर्चपर्यंत निघणाऱ्या या शोभायात्रेत नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विभागप्रमुख-आमदार सदा सरवणकर यांनी केले आहे.

उमरखाडी येथे छत्रपती शिवाजी
महाराजांचा पालखी सोहळा
हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समिती डोंगरी-उमरखाडी-नूरबाग यांच्या वतीने उद्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा आणि स्वागतयात्रेचे आयोजन केले आहे. त्यानुसार सकाळी ८ वाजता श्री शनैश्वर महाराज मंदिर-डोंगरी येथून या शोभायात्रेची सुरुवात होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या