शोध मराठी मनाचा 2020; सातासमुद्रापलीकडची मराठी नाळ!

314

>> पराग पोतदार

जागतिक मराठी अकादमीच्या वतीने नुकतंच अलिबाग येथे ‘शोध मराठी मनाचा’ हे विचार संमेलन आयोजित करण्यात आले होते. एक निखळ आनंद देणाऱ्या या संमेलनात जागतिक स्तरावरचे देशविदेशांत आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले अनेक मराठी भाषिक बांधव मोठय़ा आस्थेने उपस्थित राहिले होते. एकमेकांशी मनमोकळा संवाद हेच या संमेलनाचे खरे फलित म्हणायला हवे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान, बहरीन, दुबई, ऑस्ट्रेलिया आदी देशांतून आलेल्या मराठी बांधवांचे सातासमुद्रापलीकडे चालणारे उपक्रम या निमित्ताने जाणून घेता आले.

एखाद्या चांगल्या सूत्राभोवती झालेली विचारांची गुंफण एक वेगळे समाधान देऊन जात असते. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने या वर्षी अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शोध मराठी मनाचा’ या विचार संमेलनाने हा एक निखळ आनंद दिला.

जागतिक स्तरावरचे देशविदेशांत आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले अनेक मराठी भाषिक बांधव मोठय़ा आस्थेने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची संधी हे या संमेलनाचे खरे फलित होते. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान, बहरीन, दुबई, ऑस्ट्रेलिया आदी देशांतून आलेल्या मराठी बांधवांचे सातासमुद्रापलीकडे चालणारे काम या निमित्ताने जाणून घेता आले, समजून घेता आले. जागतिक स्तरावर विविध देशांत गेल्यानंतर तिथे आपली मुळे रुजवताना करावी लागणारी कसरत, त्याठिकाणचा भावनिक व वास्तवातील संघर्ष त्या सगळ्यावर मात करून जिद्दीने उमटवलेला ठसा आणि या सगळ्यांत टिकून राहिलेले मराठीपण असा सगळा प्रवास या निमित्ताने उलगडला. आपल्या देशातील महत्त्वाचे प्रवाह आणि जागतिक स्तरावर चाललेल्या घडामोडी अशा दोन्हीचा एक सुरेख मिलाफ यानिमित्ताने विविध मुलाखतींच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला.
संमेलनाध्यक्षपदी होते आघाडीचे मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे. भाषेचे संवर्धन होऊ द्यायचे असेल तर तिला कुठल्याही बंधनात अडकवण्याऐवजी मुक्त राहू द्यावे. ग्रामीण भागातच अस्सल मराठी जिवंत असते त्यामुळे तिथूनच तिला बहरू द्यावे. अभिव्यक्तीची भीती आणि संकोच दूर होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. पुष्कळदा भाषणांचा भडिमार झाल्याने संमेलने अनेकदा कंटाळवाणी होत असतात. उद्घाटनाचा अपवाद वगळता तीनही दिवस केवळ मुलाखतींतून या सर्व मान्यवरांचे जीवनकर्तृत्व आणि त्यांचे विचार उलगडत गेले.

अमेरिकेतील बृहन् महाराष्ट्र मंडळ ही तेथील शिखर संस्था आहे. त्याच्या अंतर्गत अमेरिकेत विविध ठिकाणी सुरू असणारी 60 महाराष्ट्र मंडळे व त्याच्याशी जोडलेले दीड लाख मराठी बांधव येतात. अशा या बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी यांची मुलाखत रंगली. त्यांनी अमेरिकेत मराठी भाषेच्या प्रसारासाठी चालणाऱया कामाची माहिती दिली. अमेरिकेत 57 मराठी शाळा सुरू झाल्या असून त्याला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बहरीन येथून आलेले दीपक घाणेकर हे आर्किटेक्ट. ते ज्या जागतिक कंपनीमध्ये कामाला होते त्या कंपनीला जागतिक स्तरावरची ‘काटे की टक्कर’ करून बहरीन येथील राणीचा पॅलेस उभारण्याचे मोठे काम मिळाले होते. हा पॅलेस बांधण्यासाठी घाणेकर यांची आर्किटेक्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा अद्भुत असा पॅलेस साकारण्याचे काम तब्बल 9 वर्षे सुरू होते. हे सारे विलक्षण अनुभव त्यांनी मुलाखतीतून उलगडले.
हिंदुस्थानी शैक्षणिक व्यवस्था, गुणवत्तेच्या पातळीवर आपली जागतिक स्तरावरची पीछेहाट आणि त्या पार्श्वभूमीवर जपानसारखा देश प्राथमिक शिक्षणापासून मुलांवर करीत असलेले प्रयत्न याचा एक अभ्यासपूर्ण लेखाजोखा जपानस्थित जगन्नाथ पाटील यांनी घेतला.

लातूर येथील आठ एकर जागा विकून अमेरिकेत राहायला गेलेल्या राजमाले दांपत्याची कथा तर निव्वळ प्रेरणादायी अशीच. आजच्या घडीला 800 कर्मचारी ज्यांच्या हाताखाली कार्यरत आहेत आणि कोटय़वधींची उलाढाल आहे अशा थक्क करणाऱया वाटचालीचे अनुभवकथन अमेरिकास्थित हेमा राजमाले यांनी केले. दुबईतील मराठी मंडळाच्या अध्यक्षा संजीवनी पाटील यांनीही दुबईमध्ये मराठी बांधवांसमवेत आणि तेथील लहान मुलांसाठी कशा पद्धतीने काम चालते हा प्रवास उलगडला. फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकण्यासाठी मराठी मुलांना उद्युक्त करावे आणि त्या माध्यमातून या दोन्ही देशांत भविष्यात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देता याव्यात यासाठी फ्रान्समध्ये राहणारे शशी धर्माधिकारी जे विशेष प्रयत्न करतात त्यांचाही आलेख त्यांनी मुलाखतीतून मांडला.

या खेरीज, ‘दृश्य माध्यमे अदृश्य सूत्र’ या परिसंवादात ‘सकाळ’चे ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे व ‘आयबीएन लोकमत’चे संपादक महेश म्हात्रे यांनी माध्यमांतील बदलत्या प्रवाहांचा व भविष्यातील आव्हानांचा वेध घेतला. भंडारा जिह्यातील एका छोटय़ाशा गावात शिक्षणाचे अद्वितीय असे मॉडेल उभ्या करणाऱया मुबारक सय्यद या शिक्षकाची मुलाखत म्हणजे तर या संमेलनातील सर्वांत सुंदर भाग होता. शिक्षक, विद्यार्थी आणि युवा वर्ग यांची उत्तम उपस्थिती हे या संमेलनाचे आणखी एक विशेष होते. जागतिक प्रवाह त्यांनाही समजावेत त्यातून त्यांच्यातही काही बदल घडवता यावेत. त्यांना नव्या जागतिक आव्हानांची कल्पना यावी या दृष्टीने झालेल्या मुलाखती उपयुक्त ठरल्या. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, यशवंतराव गडाख, राजेश मंत्री, सचिन इटकर आदींच्या पुढाकाराने आणि अलिबागमधील जयंत पाटील, मीनाक्षी पाटील यांच्या सहकार्याने हे तीनदिवसीय संमेलन मोठय़ा उत्साहात पार पडले. एकूणच हे तीन दिवसांचे संमेलन वैचारिकदृष्टय़ा समृद्ध करणारे तर ठरलेच, परंतु त्याचबरोबर सातासमुद्रापार असलेल्या मराठी बांधवांशी आपली नाळ अधिक दृढ करणारे ठरले.

(लेखक मुक्त पत्रकार आणि अनुवादक आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या