रसिक हो – साहित्यलक्ष्मीचा तरल आविष्कार!

7530

>>  क्षितिज झारापकर

‘माझी माय सरसोती’ आपल्या मातीतली अनेक व्यक्तिमत्त्वं ही आपल्या कार्यकर्तृत्वाने कालातीत ठरली आहेत. बहिणाबाई चौधरी त्यापैकीच एक.

काही नाटकं अभिजात असतात. त्यांना काळाचं वगैरे बंधन नसतं. ही नाटकं कधीचं कालबाह्य होत नाहीत. त्यांच्या चिरायू असण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ‘नटसम्राट’ हे नाटक त्याच्या सकस लिखाणापेक्षाही त्यातील आप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका जगण्याची प्रथितयश नटांची गरज या कारणाने सतत येतच राहील. कानिटकरांची बहुतांशी नाटकं ही त्यांच्या अतुलनीय क्राफ्टिंगच्या शैलीमुळे पुन्हा पुन्हा भुरळ घालत राहतील. पु.लं.ची नाटकं आंतरराष्ट्रीय नाटय़मूल्यांची नाळ रंजकतेने मराठी रंगभूमीशी जोडतात म्हणून परत परत केली जातील तर संगीत नाटकं नॉस्टॅल्जिया म्हणून पुनरुज्जीवित होत राहतील. भूतकाळात रमणं हे हिंदुस्थानीयांचा आवडता पासटाईम आहे. आपण आपल्या सोयिस्कर इतिहासात रमण्यात आनंद आणि आयडेंटिटी शोधतो. मग रंगभूमी आपल्या पुराण्या ग्लॅमरमध्ये रमली तर हरकत नसावी. एखादं नाटक रिव्हाईव्ह होण्याचं कारण त्याचा विषय असूच शकतो. एखाद्या महात्म्याची गाथा सांगणारं नाटक हे पिढय़ान्पिढय़ा पुनरुज्जीवित होत राहू शकतं. बहिणाबाई चौधरी हे असंच मराठी माणसाला बराच काळ साद घालत राहणारं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या ओव्यांच्या रूपातीत संतकाव्यावर अनेक रंगमंचीय आविष्कार आजवर झालेले आहेत आणि पुढे चिरंतन काळापर्यंत होत राहतील. प्रत्येक पिढीला बहिणाबाईंच्या सांगण्यातून जो बोध होईल तो त्यांच्या दृष्टिकोनातून मांडला जाईल, पण प्रत्येक वेळेस नवीन दृष्टिकोनातून आविष्कार व्हायलाच हवा असं नाही. पुनः पुन्हा चाकाचा शोध लावायचा नसतो. आधी शोधलेलं चाक पुनः पुन्हा वापरायला हरकत नसते. हेचं झालं आहे ‘माझी माय सरसोती’ या नाटकाचं.

महाराष्ट्रातल्या आजवरच्या आणि इथून पुढे जन्माला येणाऱया सगळ्या महिलांची जिवाभावाची मैत्रीण झालेल्या बहिणाबाई चौधरी यांचा जीवनपट म्हणजे ‘माझी माय सरसोती’. जात्याच्या दांडय़ापासून ते मिक्सरच्या बटणापर्यंत जिचा हात गेला असता जिला अरे संसार संसार हे आठवलं नाही अशी मराठी महिला न सापडणं हे मिथ्या आहे. अशा बहिणाबाईंनी 2005 साली अमेरिकेत लॉस एन्जलीस येथे होणाऱया मराठी अधिवेशनात तिथे कित्येक वर्षे स्थायिक झालेल्या अनुराधा गानू या मराठी महिलेला साद घातली. त्यांनी मग अमेरिकन ब्रॉडवे स्टाईलचं एक मराठी नाटक लिहिलं आणि तिथे सादर केलं. ते नाटक म्हणजे सध्या सादर होत असलेलं ‘माझी माय सरसोती’. हे नाटक हिंदुस्थानातदेखील याआधी झालेलं आहे, पण आता आलेल्या आवृत्तीत एक मूलभूत फरक आहे. आता ‘माझी माय सरसोती’ हे सर्वार्थाने एक ब्रॉडवे म्युझिकलचा फिल देणारं नाटक झालंय. याचं मुख्य कारण आता या नाटकाच्या नृत्यदिग्दर्शिका आहेत सोनिया परचुरे. सोनिया परचुरे यांनी ‘माझी माय सरसोती’मध्ये नयनरम्य जादू साकारली आहे. बहिणाबाईंच्या ओळी निसर्गाच्या कुशीतून येतात. त्यांच्या ओळींमध्ये माती, वार, फुलं, पानं, पाऊस, ऊन ही नैसर्गिक तत्त्व पुष्कळ प्रमाणात आढळतात. सोनियाने ही तत्त्व सांघिक नृत्यातून कमालीच्या व्हिजनने रंगभूमीवर उतरवली आहेत. त्यामुळे ‘माझी माय सरसोती’ या नाटकाचा दृश्य आलेखच (व्हिज्युअल डायमेन्शन) बदलून गेला आहे. ‘माझी माय सरसोती’च्या या दृश्यात्मकतेला सबल जोड मिळते ती सकस अभिनयाची. सुशांत शेलार हा सध्याचा मराठी कलाविश्वातील स्टार सूत्रधारी बाण्यातून आणि अभिनयातून ‘माझी माय सरसोती’ धरून ठेवतो. रंगकर्मी या करीयरमध्ये सुशांतने जवळ जवळ सगळ्या शाखांमध्ये कार्यानुभव मिळवलेला आहे. नाटकातल्या बॅकस्टेज आणि छोटय़ातील छोटय़ा भूमिकांपासून ते मालिका आणि चित्रपटांतील नायक साकारण्यापर्यंत सुशांत शेलारने सर्वकाही केलेलं आहे. ‘माझी माय सरसोती’मध्ये सुशांत शेलार आपल्या असण्याने एक स्थैर्य प्रदान करतो. नाटक बहिणाबाई चौधरी यांच्यावर असल्याने अर्थात ही भूमिका खूप महत्त्वाची होते. ‘माझी माय सरसोती’मध्ये बाल्यावस्थेतल्या आणि प्रौढ अशा दोन बहिणाबाई आहेत. बालपणीची बहिणा मनविता एक अनवट इनोसन्सने साकारते. सर्व गाणी रेकॉर्डेड असताना नृत्य सांभाळून ती बेमालूम लिपसिंक करते. प्रौढ बहिणाबाई अतिषा नाईक थेट आपल्या मनाला भिडवते. अतिषा ही ताकदीची अभिनेत्री इथे आपलं सगळं कौशल्य एकवटून उभी राहते आणि बहिणाबाई मूर्तरूपात आपल्या समोर उभ्या राहतात. बहिणाबाईंच्या शब्दांतले भाव आणि मतितार्थ अतिषा लिलया आपल्या चेहऱयावर प्रकट करते आणि ‘माझी माय सरसोती’ला एक वेगळीच उंची प्राप्त होते.

ब्रॉडवे पद्धतीच्या नाटकात तांत्रिकबाबतीत फार महत्त्वाच्या असतात. मिलिंद जोशी हे संगीतकार इथे खूपच महत्त्वाची कामगिरी समर्थपणे साकारतात. बहिणाबाईंच्या शब्दांना त्यांनी दिलेल्या वेगळ्या चाली अत्यंत वेधक आणि रुचकर आहेत. शीतल तळपदे केवळ प्रकाशयोजनेतून ऋतू आणि भाव स्थापित करण्याचं कौशल्य दाखवतात. अतुल जोशींचं नेपथ्य नाटकाचा प्रमुख भाग नृत्य असल्याचं भान राखून स्थळमहात्म्य उभं करण्यात यशस्वी होतं. दिग्दर्शिका हर्षदा बोरकर ‘माझी माय सरसोती’ आपल्या समोर आणतात. त्यांच्या दिग्दर्शनाचा महत्त्वाचा भाग हा की त्यांनी कुठेही प्रयोग शिथिल होऊ दिलेला नाही आणि म्हणूनच नाटक रंजक होतं. शिवाय निर्मितीतला प्रत्येक घटक त्याच्या महत्त्वाप्रमाणे आणि आवश्यकतेनुसार वापरण्याचं भान ठेवून त्यांनी ‘माझी माय सरसोती’चं दिग्दर्शन केलेलं जाणवतं. दिनू पेडणेकर हा सृजनशील निर्माता असल्याने नाटकाच्या व्यवस्थापनाचा प्रश्न सुटलेलाच आहे. ‘माझी माय सरसोती’हा एक वेगळा, रंजक आणि महत्त्वाचा नाटय़ानुभव आहे.

  • नाटक – माझी माय सरसोती
  • निर्मिती – जीवनकला, अनामिका, साईसाक्षी
  • संकल्पना, लेखन – अनुराधा गानू
  • नृत्य दिग्दर्शन – सोनिया परचुरे
  • संगीत – मिलिंद जोशी
  • नेपथ्य – अतुल जोशी
  • प्रकाश – शीतल तळपदे
  • दिग्दर्शन – हर्षदा बोरकर
  • कलाकार – सुशांत शेलार, सुहास काळे, हर्ष वानवे, अतिषा नाईक
  • दर्जा – ***
आपली प्रतिक्रिया द्या