
वर्ध्यात सुरू असलेल्या 96 व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यंदा निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर भूषवत आहेत. संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या व्हीव्हीआयपींच्या ताफ्यांच्या सुरक्षेचा फटका समेंलनाध्यक्षांनाच बसला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येणार म्हणून संमेलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी चक्क संमेलनाध्यक्ष चपळगावकर यांचीच गाडी अडवली. नरेंद्र चपळगावकर यांची मुलगी भक्ती चपळगावकर हिने फेसबुकवर पोस्ट लिहून ही माहिती दिली.
”गेली दोन दिवस सरकारी सुरक्षा व्यवस्थेमुळे माझ्या पंच्याऐंशी वर्षांच्या बाबांना आणि त्यांच्या 88 वर्षांच्या मित्राला डी. सुधीर रसाळ यांना वेळोवेळी अडवण्यात आले. मुख्यमंत्री आले तेंव्हा 900 पोलीस होते, आज उपमुख्यमंत्री येणार म्हणून आहेत. मी प्रत्येकवेळी पोलिसांना समजाऊन, विनंती करून, ओरडून मार्ग काढला. आज धीर संपला आणि पोलिसांना ओरडले, चालणार नाहीत ते. चालू शकणार नाहीत एवढं. बिचारे पोलीस ते आदेशाचे पालन करत होते. बावचळले आणि जा म्हणाले. गंमत आहे सगळी. या सगळ्याचा बाबांना काहीही फरक पडला नाही. गाडी बुक स्टॉलकडे वळली, ते त्यांच्या विश्वात रमले आहेत” अशी पोस्ट भक्ती चपळगावकर यांनी शेअर केली आहे.