मराठी शाळा ‘कृतिशील’ करायला हवी, मराठीप्रेमी पालक महासंमेलनातील सूर

50

सामना ऑनलाईन । मुंबई

जगभरात व्यवहाराची भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्रजीचा द्वेष करून चालणार नाही. ही भाषा शिकायलाच हवी पण ती शिकण्याचे माध्यम मराठी हवे. त्यासाठी मराठी माध्यमांच्या शाळांनी ‘कृतिशील’ शिक्षणावर भर दिला पाहिजे, असा सूर ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलना’त उमटला. मराठी अभ्यास केंद्र आणि शीव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलच्या वतीने आज आणि उद्या असे दोनदिवसीय महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील पाच हजारांहून अधिक मराठी शाळा डिजिटल करणारे हर्षल विभांडिक यांच्या हस्ते आज या महासंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

महासंमेलनाच्या उद्घाटनानंतर ‘मातृभाषेतील शिक्षण आणि पालकांशी संवाद’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात रवींद्र धनक, मिलिंद चिंदरकर, नामदेव माळी यांनी सहभाग घेतला. माणूस व्यक्त होतो तो आपल्या मातृभाषेतूनच. विचार करणारी पिढी घडवायची असेल तर मातृभाषेतील शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे मत या चर्चासत्रात उपस्थितांनी मांडले. याप्रसंगी शीव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष-विश्वस्त राजेंद्र प्रधान, डॉ. वीणा सानेकर, अ. भि. गोरेगावकर संस्थेचे गिरीश सामंत, आनंद भांडारे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सानेकर यांनी संपादित केलेल्या ‘आपली भाषा, आपल्या शाळा, आपली मुलं’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

शिकणे म्हणजे धड्याखालील प्रश्नांची उत्तरे देणे नव्हे
शिकणे म्हणजे फक्त धडय़ाखालील प्रश्नांची उत्तरे पाठ करणे नव्हे. शिक्षण हे केवळ गुण मिळविण्यापुरतेच मर्यादित नको. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, यापेक्षा महाराजांना स्वराज्याची स्थापना का करावी लागली यावर मुलांना विचार करायला प्रवृत्त करायला हवे. सध्याची शिक्षणपद्धती बदलून प्रत्यक्ष कृती करून मुलांना शिकविण्यावर मराठी शाळांनी भर देऊन आता कात टाकली पाहिजे, असे मतही या चर्चासत्रात मांडण्यात आले.

मराठी पालकांचा महासंघ निर्माण करणार
मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक म्हणजे शिक्षण क्षेत्रातील बिनचेहऱ्याचा असा असंघटित वर्ग आहे. या पालकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. म्हणूनच या महासंमेलनाचे आयोजन केल्याचे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार यांनी सांगितले. आता राज्यपातळीवर दबाव गट म्हणून मराठी पालकांचा महासंघ निर्माण करणार असल्याचे सांगून मराठी शाळांमध्ये पैसा नसल्यामुळेच सर्व राजकीय पक्षांचे नेते या शाळांच्या मागे ठामपणे उभे राहत नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या