सीमा भाग केंद्रशासित करा! शिवसेनेची मागणी

135

सामना ऑनलाईन, मुंबई

कर्नाटकात भाजपच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत, पण येणारं सरकार हे केवळ सत्तेसाठी नसावं तर सीमावासीयांना न्याय देणारं सरकार असावं, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सीमावासीयांच्या पाठीशी आहे असा ‘शब्द’च सीमावासीयांना दिला. सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेल तेव्हा लागेल, तोवर सीमा भाग केंद्रशासित करावा अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. सीमावासीयांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी त्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रात, महाराष्ट्रात आणि आता कर्नाटकात भाजपचं सरकार आल्यास बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. न्यायालयात हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित जाहीर करण्यात यावा अशी मागणी घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. यावेळी कानडी सरकारच्या अन्यायाचा पाढाच उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाचण्यात आला. यावर मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लढा अधिक तीव्र करावा लागेल. लढा तीक्र केल्याशिवाय न्याय मिळणार नाही. तरुण पिढीलाही या लढय़ात सामील करून घ्या. महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये या तरुणांना सामावून घ्या. न्यायालयात या प्रकरणावर निर्णय होण्यास उशीर आहे. तोपर्यंत हा सीमाभाग केंद्रशासित घोषित करायलाच हवा.

शिवसेना सीमावासीयांच्या हृदयात

कर्नाटकात शिवसेनेला कोणतीही निवडणूक लढवायची नाही किंवा सत्तेची साठमारी करायची नाही. शिवसेना आणि सीमावासीय हे नातं राजकीय नाही. शिवसेना सीमावासीयांच्या हृदयात आहे. त्यामुळेच इथे कोणतीही शाखा नसतानाही सीमाभागात ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा घुमतात. मराठी माणसाचा वसा घेऊन शिवसेनेसोबतच ‘मार्मिक’, ‘सामना’मधून सीमावासीयांची बाजू लावून धरली जात आहे. हा वसा घेऊनच पुढे वाटचाल करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी  बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, माजी आमदार बी. आय. पाटील, दिगंबर पाटील यांच्यासह येथील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेचे खासदार आवाज उठविणार

शिवसेनेचे खासदार लोकसभेत सीमावासीयांची बाजू उचलून धरतील. त्याचप्रमाणे सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार करून सीमावासीयांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेता येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कर्नाटक सीमेवरील गावागावात लढय़ाविषयी जनजागृती करा !

जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही. तेव्हा कर्नाटकी सरकारच्या अन्यायाविषयी सीमाभागातील गावागावात जनजागृती करा. सीमाभागात होणाऱ्या कानडी जुलूमशाहीविरोधात महाराष्ट्रातील जनताही आवाज उठवेल. यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम तयार करा. शिवसेना  सीमाभागातील जनतेच्या कायम पाठीशी आहे. येथील जिह्यांत, गावांत सभा घेऊन येथील जुलूमशाहीविरोधात आवाज उठवू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

कानडी सरकारची जुलूमशाही

कर्नाटक सरकार येथील मराठी माणसाच्या जमिनी बळकावत आहे. त्याचप्रमाणे सातबाराही कानडी भाषेतच दिला जात आहे. येथे महापौरांकडून मराठी माणसावरील जुलूमशाहीविरोधात निषेध नोंदविण्यात आल्यानंतर सीमाभागातील महापालिकाच बरखास्त करण्यात आली. येथील सीमावासीयांचा लढा दडपण्यासाठी मराठी माणसांमध्येच फूट पाडली जात आहे. त्यामुळे शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवून सीमाभाग केंद्र शासित करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निवेदन उद्धव ठाकरे यांना यावेळी देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या