नाटक सादर करताना माझगाव डॉकच्या कलाकाराचा मृत्यू

33

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

राज्य शासनातर्फे तापडिया नाटय़ मंदिरात सुरू असलेल्या ५७व्या हिंदी नाटय़ स्पर्धेत आज नाटक सादर करताना कलाकाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. विनायक राणे (५३) असे या कलाकाराचे नाव आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. रंगमंचावरच या कलाकाराची अकाली एक्झिट झाल्याने रसिकही सुन्न झाले.

राज्य सरकारतर्फे तापडिया नाटय़ मंदिरात ५७वी हिंदी नाटय़ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज सायंकाळी ७ वाजता मुंबईतील माझगाव डॉक स्पोर्ट्स क्लबच्या कर्मचारी संघटनेच्या नाटय़ संस्थेचे अजहर वजाहद लिखित आणि स्वप्नील खोत दिग्दर्शित ‘जिस लाहोर नही देख्या’ हे हिंदी नाटक सुरू झाले. देशाच्या फाळणीवर आधारित या नाटकात सिकंदर मिर्झा ही मध्यवर्ती भूमिका साकारणारे विनायक राणे विंगेकडे निघाले. निघताच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते मंचावरच कोसळले. पाठोपाठ रंगमंचावर पळापळ झाली. प्रेक्षकांना हे नाटकातील काहीतरी असावे असे वाटले. मात्र ध्वनी आणि लाईटमनही रंगमंचावर धावत गेल्याने काहीतरी गडबड झाल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले. विनायक राणे मंचावर कोसळल्याचे समजताच त्यांना मुंबईतील सहकारी आणि स्थानिक तरुणांनी ग्रीन रूममध्ये नेले. तेथे पंपिंग आणि माऊथ ब्रिदिंगचे उपचार केले. त्यानंतर तातडीने रिक्षाने  समर्थनगर येथील साई हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना घाटीत हलवण्याचा सल्ला दिल्यानंतर राणे यांना घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. घाटीतील डॉक्टरांनी विनायक राणे यांना तपासून मृत घोषित केले. या यामुळे आजचा प्रयोग रद्द केला.

समंजस कलावंत

या नाटकाचे दिग्दर्शक स्वप्नील खोत म्हणाले की, मुंबईच्या अंधेरीत राहणारे विनायक राणे माझगाव डॉकमध्ये पेंटिंग विभागात पेंटर म्हणून कार्यरत होते. १९८०पासून त्यांनी अनेक नाटकांत काम केले. आम्हा सर्व कलाकारांचे ते आदर्श होते. अत्यंत अनुभवी आणि समंजस तसेच भूमिकांत शिरून काम करणारे हरहुन्नरी कलाकार म्हणून ते स्पोर्ट्स क्लबमध्ये परिचित होते. मोठय़ा ब्रेकनंतर ते पुन्हा रंगमंचावर आले होते. दीड महिना रिहर्सल करून बसवलेले नाटक घेऊन मंगळवारी रात्री १०.३०च्या सुमारास नाटकातील २३ जणांची टीम मुंबईहून शहरात दाखल झाली. उद्या गुरुवारी सकाळी त्यांचे कुटुंबीय शहरात दाखल होतील.

आपली प्रतिक्रिया द्या