आता नेटवर्कशिवाय करता येणार फोनकॉल

31

सामना ऑनलाईन । मुंबई

मोबाईल हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनला असला तरीही नेटवर्क हा मोबाईलचा प्राण असतो. नेटवर्कशिवाय कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. खास करून प्रवासात अनेकदा नेटवर्कच्या समस्या उद्भवतात. नेटवर्क नसल्याने कॉल करणे कठीण होऊन बसते. पण आता ही चिंताही दूर होणार आहे. तुमच्या मोबाईलला नेटवर्क असो किंवा नसो, आता तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही मोबाईल किंवा लँडलाईन नंबरवर संपर्क साधता येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) इंटरनेट टेलिफोनीला मंजूरी दिली आहे.

इंटरनेट टेलिफोनी सेवेअंतर्गत ग्राहकांसाठी ही विशेष सेवा सुरू करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी मोबाइलला नेटवर्क मिळत नाही. तसेच खराब नेटवर्क असल्याने फोनवर बोलण्यास अडचणी येतात. या समस्येवर उपाय म्हणून ट्रायने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे या सेवेचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र सिमकार्डचीही गरज नसून या नवीन पद्धतीला प्रत्यक्षात आणण्यासाठी ट्रायला आता टेलेकॉम मंत्रालयाकडून होकार मिळण्याची गरज आहे.

ट्रायच्या या निर्णयामुळे अनेक टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. ही सेवा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली तर व्हाइस कॉल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. परंतू, ग्राहकांना मात्र या सेवेचा चांगलाच फायदा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या