मराठवाड्यात नव्या विद्यापीठाची भर! ‘एमजीएम’ झाले विद्यापीठ, डॉ. गव्हाणे पहिले कुलगुरू

1359

मराठवाड्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात एका नव्या विद्यापीठाची भर पडली असून, महात्मा गांधी मिशन संचालित ‘एमजीएम विद्यापीठ’ विधिवत कार्यान्वित झाले आहे. राज्यातील स्वयंअर्थसाह्यित विद्यापीठात एमजीएम विद्यापीठ हे 18 वे आणि मराठवाड्यातील पहिले खासगी विद्यापीठ आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा महात्मा गांधी मिशन ट्रस्टचे सचिव तथा विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. या खासगी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉ. सुधीर गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘एमजीएम’ खासगी विद्यापीठात पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच दर्जेदार व्यावसायिक शिक्षण देण्यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अभियांत्रिकी, वाणिज्य व व्यवस्थापनाशास्त्र, पॅâशन डिझाईन, हॉटेल मॅनेजमेंट, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या, फोटोग्राफी, फिल्म आणि फाईन आर्ट, शास्त्रीय नृत्य, माहिती तंत्रज्ञान-संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान व जैवविज्ञान तसेच विज्ञान व कला शाखेतील ऑनर्स अभ्यासक्रम या विद्यापीठात उपलब्ध राहणार आहेत, असे डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले.

एमजीएमचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टची बैठक होऊन एमजीएम खासगी विद्यापीठ कार्यान्वित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी पहिले कुलगुरू म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांची नियुक्ती केली. अन्य नियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात आल्या. कुलसचिवपदी प्रा. आशिष गाडेकर, परीक्षा विभागप्रमुखाची जबाबदारी कर्नल प्रदीपकुमार आणि अधिष्ठातापदी जेएनईसीचे प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एमजीएम विद्यापीठात गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही तडजोड न करता दर्जेदार व्यावसायिक शिक्षण देण्यावर भर राहणार आहे, हे नमूद करून डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, या विद्यापीठात प्रवेश देताना आरक्षणाचा पुरेपूर विचार केला जाणार आहे. गुणवंत, होतकरू गरीब विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी जेएनईसीच्या माजी विद्याथ्र्यांची मदत घेतली जाणार आहे. या विद्यापीठात परदेशी विद्याथ्र्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. शैक्षणिक शुल्कात मात्र भेदभाव केला जाणार नाही, असे कुलगुरू डॉ. गव्हाणे यांनी सांगितले. राज्यातील खासगी 17 विद्यापीठांपेक्षा आमच्या विद्यापीठात प्रवेश शुल्क कमी असेल, तशी आर्थिक तरतूदच एमजीएम ट्रस्टने केली आहे, असे शैक्षणिक शुल्काबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता कुलपती अंकुशराव कदम, उपाध्यक्ष डॉ.पी.एम. जाधव यांनी सांगितले. यावेळी एमजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे, प्रा. आशिष गाडेकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके आदींची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या