दुष्काळ मराठवाडय़ाच्या उंबरठय़ावर!

238

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

राज्यभरात नद्या-धरणे तुडुंब भरून वाहत असताना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मनात दुष्काळ घर करू लागला आहे. हवामान विभागाचा अंदाज थापच ठरली! सव्वा महिना उलटला तरीही दिलासा देणारा पाऊस झालेला नाही. ढगांच्या सावल्यांनी तग धरून असलेली पिके आता माना टाकू लागली आहेत. सोयाबीन, मूग, उडीद पिके हातची गेली. तर कापूस, मका, तूर सलाईनवर लागली आहेत. संपूर्ण खरीप हंगामच करपला असून, दुष्काळ मराठवाड्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

धरणे, प्रकल्पांत २३ टक्के पाणी
मराठवाड्यात पाऊस नसल्याने उर्वरित धरणे व प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. सिना कोळेगाव, येलदरी, सिद्धेश्वर, मांजरा या धरणांत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत १७ टक्के, लघु तलावांत ११ टक्के एवढे पाणी शिल्लक आहे. पाऊस आला नाही तर दिवाळीनंतर ही धरणे कोरडी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शेतकरी आत्महत्येचा आकडा ५३१ वर
कर्जमाफीची घोषणा करून दीड महिना उलटला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यातच पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्याने दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. जुलैपर्यंत मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा ५३१ वर गेला आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर ८६ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे.

हिंगोली जिल्हय़ात तीन लाख हेक्टरवरील पिके धोक्यात!
हिंगोली जिह्यामध्ये तब्बल २२ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, वरुणराजाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे. जिह्यामध्ये २ लाख ९० हजार हेक्टर जमिनीवरील शेतपिकांनी माना टाकायला सुरुवात केली असून, खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा शंभर कोटी रुपयांच्या वरील खर्च आणि पिकांपासून मिळणारा दीड हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या